बालगंधर्वांचा आज स्मृतिदिन
‘रतीचे जा रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे। सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे।’ अशा शब्दांत महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. मां.नी ज्यांचा गौरव केला त्या बालगंधर्वांचा आज स्मृतिदिन.26
जून 1888 रोजी पुणे येथे नाराणराव श्रीपाद राजहंस यांचा जन्म झाला. त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी लोकमान्यांनी ‘बालगंधर्व’ असे संबोधले. प्रथम किर्लोसकर नाटक मंडळीत काम करणार्या बालगंधर्वांनी पुढे स्वत:ची ‘गंधर्व संगीत नाटक मंडळी’ काढली. मानापमानातील ‘भामिनी', विद्याहरणमधील ‘देवयानी’, स्वयंवरामधील ‘रुक्मिणी’, एकच प्यालातील ‘सिंधू’ या त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका. पुणे येथील 1929च्या महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्क्षपद भूषविलेल्या बालगंधर्वांना अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचे ‘राष्ट्रपती पदक’ही लाभले होते. ‘पद्मभूषण’ विभूषित बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला पडलेले इंद्रधनुष्यी स्वप्न होते. एकंदर 27 नाटकांत 36 भूमिका केलेला हा ‘राजहंस’ म्हणजे, ‘जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा। तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे।’