स्वतःच्या जगण्याच्या व्याख्या स्वतःच निर्माण करा: अतुल कुलकर्णी

alok jatratkar atul kulkarni
Last Modified मंगळवार, 24 मार्च 2015 (11:53 IST)
('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमांतर्गत मुलाखतीचे दुसरे पुष्प अत्यंत गुणी व सहृदयी अभिनेते श्री. अतुल कुलकर्णी यांनी गुंफले. त्यांनी साधलेल्या संवादाचे शब्दांकन...)

सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' ही संकल्पनाच मला खूप आवडली. स्वतः अभिनेता असून अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींच्या बाबतीत विद्यार्थ्यांशी, उपस्थितांशी संवाद साधायचा, ही माझ्यासाठी एक वेगळी पण आकर्षणाची बाब ठरली. त्यामुळंच मी आज याठिकाणी उपस्थित आहे.
खरं तर ऊर्जा हे एकूणातच विश्वाच्या अस्तित्वाचं खरं स्वरुप आहे. ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही. केवळ एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये तुचं रुपांतरण होत असतं. त्यामुळंच ही अक्षय ऊर्जा विश्वाचं अस्तित्व टिकवून ठेवते, विश्व प्रवाहित ठेवते, असं म्हणता येईल. मानवाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टी मिळविण्यासाठी त्याला प्रेरित करणारा 'बेसिक फोर्स' म्हणजे ऊर्जा, असं म्हणता येईल. आपल्या अस्तित्वासाठीची, स्वतःला सिद्ध करण्यासाठीची धडपड ही त्यातूनच निर्माण होते. पण, हे केवळ तितकंच आणि तेवढ्यासाठीच आहे, हे मात्र मानवाच्या बाबतीत खरं नाही. अन्य प्राण्यांपासून मानवाला वेगळं ठरविणाऱ्या इतर कला, क्रीडा, छंद यांच्या समावेशानं जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी करण्याची प्रेरणा ही खरी मानवी आस्तित्वाची ऊर्जा आहे, असं मला वाटतं.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही या प्रेरणा खूप महत्त्वाच्या ठरल्या. तसं पाहता मी एक बारावी नापास विद्यार्थी. घासून कसाबसा पास झालो. तिथून इंजिनिअरिंगला
अॅडमिशन घेतली. पण, मुळातच आवड नसल्यानं तिथं पास व्हायची शक्यता नव्हतीच. झालंही तसंच. नापास झालो आणि सोलापूरला घरी परतलो. अत्यंत निराश, आत्मविश्वासरहित अवस्थेत तिथंच बीएला प्रवेश घेतला. ढकलल्यासारखं शिक्षण सुरू होतं. मात्र, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एका एकांकिकेत अभिनय केला. आणि दुसऱ्या दिवसापासून कॉलेजमध्ये विद्यार्थी, शिक्षक मला ओळखू लागले. तोपर्यंत खांदे पाडून चालणाऱ्या माझी मान आपोआपच वर झाली आणि छाती पुढे आली. जगण्याला नवी उभारी देणारा, नवी ऊर्जा प्रदान करणारा तो प्रसंग होता. मी सुद्धा कोणीतरी आहे. काही तरी करू शकतो, हा आत्मविश्वास त्या प्रसंगानं माझ्यात पेरला आणि ही ऊर्जा मनाशी घट्ट धरून ठेवतच मी नाटकाला आपलंसं केलं. एकदा ठरवल्यानंतर मग त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं आणि दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि करिअरला सुरवात केली. तिथल्या प्रशिक्षणानं प्रत्येक भूमिकेचा, तिच्या प्रत्येक पैलूचा मानवी स्थायीभावाच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची सवय लावली.

काही लोकांना मी उद्धट वाटतो. हो, आहे मी उद्धट. पण, माझा हा उद्धटपणा- सकारात्मक उद्धटपणा आहे. आणि तो प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे, असं माझं मत आहे. जगाच्या प्रचलित व्याख्या मान्य न करता माझं जगणं, जर मला योग्य वाटेल त्या पद्धतीनं मी जगायचं ठरवलं असेल; माझ्या जगण्याची, वागण्याची चांगली व्याख्या जर मी ठरविली असेल, तर त्यात गैर काय? कोणाला पटो, अगर न पटो, मी स्वतः माझ्या वागण्याशी, भूमिकेशी शंभर टक्के प्रामाणिक असेन, तर त्यात चुकीचे काहीच नाही. कदाचित, त्यामुळेच मी एक चांगला अभिनेता, माणूस म्हणून स्वतःला घडवू शकलो, असं मला वाटतं. जगाच्या व्याख्येनुसारच जर करायचं ठरवलं असतं, तर ते शक्यही झालं नसतं, कदाचित.

शून्यातून एखादी गोष्ट निर्माण करण्याची प्रक्रिया मुळातच खूप गंमतीची असते. ही प्रक्रियाच खऱ्या अर्थानं आपल्याला जगायला शिकवते. या साऱ्या प्रवासात कित्येकदा निराशाही वाट्याला येते. पण, तुम्हाला सांगतो, जगात इतकी सॉलिड, फँटॅस्टिक आणि कमाल माणसं आणि सुंदर पुस्तकं आहेत की, या साऱ्या निराशेतून तुम्हाला सावरायला मदत करतात; पुन्हा उभं राह्यला शिकवतात. एक उदाहरण देतो, 'गांधी विरुद्ध गांधी'च्या वेळी मी सर्वप्रथम गांधी वाचायला हातात घेतले. तुम्हाला खरं सांगतो, इतका महान विचारांचा आणि कृतीचा माणूस जगात आजतागायत दुसरा झाला नाही. आजकाल तर गांधींना नावं ठेवून मोठे व्हायचे दिवस आलेत, तेही पुन्हा त्यांचं प्रत्यक्षात काहीही न वाचता आणि कोणी तरी सांगतो म्हणून. हे चुकीचं आहे. तो माणूस काय म्हणतो हे आधी वाचाल तरी?, त्याचं सांगणं काय आहे, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे, हे समजून तरी घ्याल? पण नाही. आपण अख्ख्याच्या अख्खा माणूसच नाकारुन रिकामे होतो. ठीक आहे, त्यांच्या काही भूमिका, काही तत्त्वं पटत नसतीलही एखाद्याला. पण, तेवढे दोन मुद्दे ठेवा ना बाजूला. बाकीचं चांगलं आहे, ते तरी स्वीकाराल की नाही? हा स्वीकार, आपली स्वीकारार्हता किती अत्युच्च कोटीची आहे, यावरुन तुमची संवेदनशीलता आणि तरलता किती आहे, हे निश्चित होते.
आजकाल तर पालकच आपल्या मुलांना रेसच्या घोड्याप्रमाणं पळवायला लागले आहेत. मान्य आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. पण, तुम्ही कशाला आणखी त्या मुलांचा जीव घेताय? सातवी-आठवीपासूनच 'आयआयटी'च्या ट्रेनिंगला पाठवणारे पालक आहेत. काय म्हणावं त्यांना, मला कळत नाही? मान्य आहे, जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. मी नाकारत नाही. आयुष्यात स्थैर्यही हवं. पण, केवळ या भौतिक सुखांच्या मागं लागणं, हा त्यावरचा उपाय नाही, नक्कीच.

atul kulkarni
व्यक्तिगत आयुष्यात आपल्या गरजा मर्यादित राखता आल्या तर, या भौतिक सुखांची गरज आपोआपच कमी होते. माझ्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये आजही सोफा, टीव्ही, एसी, मायक्रोवेव्ह, अगदी डबलबेड सुद्धा नाही. त्यांची कधी गरजही भासत नाही आम्हाला. आमचा मामा कधी घरी आला की, 'आलो संताच्या घरी' असं म्हणत असतो. माझ्या घरी येणाऱ्याला आजही मांडी घालूनच जमिनीवर बसावं लागतं. त्यामुळं गुडघेही ठणठणीत आहेत आमचे. सकाळी झोपून उठलो की आम्ही सतरंजी घडी घालून कपाटात टाकून देतो की वापरायला प्रशस्त अशी जागा आम्हाला उपलब्ध होते. जगाचं खरं सौंदर्य हे मोकळेपणात, स्पेसमध्ये आहे, असं एक विचारवंत म्हणतो. ते खरंही आहे. आणि या सर्व गोष्टींशिवाय आमचं काही अडत नाही- अजिबातच. आज पंधरा वर्षानंतर माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो की, जमिनीवरही आम्हाला अतिशय चांगली, गाढ झोप लागते. पुढं-मागं कधी गरज लागली तर पाहता येईल.
खरं तर, पालकांनी मुलांना ज्या त्या वयात, ज्या त्या गोष्टी करायला दिल्याच पाहिजेत. नाही तर ती मुलं लंगडीच होतील. कितीही डिग्र्या, कितीही पैसा मिळवला तरीही, ती मुलं जगणं काय असतं, हे आयुष्यात शिकणारच नाहीत. नोकरी, व्यवसाय हे जगण्याचं साधन आहे आणि ते मान्य करायलाच हवं. पण, तेच सर्वस्व आहे, असं समजण्याची चूकही करता कामा नये. तसं पाहता, माणसाचं पिल्लू हे जगातल्या सर्वांत बुद्धू आहे, असं म्हणावं लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहायला ते वयाची एकवीस वर्षं घेतं. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर पालकांनी त्यांना बाहेरच्या जगात सोडलं पाहिजे- कोणत्याही अपेक्षांशिवाय. जगाचा अनुभव त्यांना घेऊ दिला पाहिजे. सुरक्षित कवचाबाहेर एक असुरक्षित जग आहे, याची जाणीव, अनुभव त्यांना यायला हवा. मुंबईतला लोकलचा प्रवास करा एकदा. म्हणजे आपली खरी जागा आपल्याला समजते. या जगातलं आपलं नेमकं आस्तित्व किती क्षुल्लक आहे, याची जाणीव होते. मोठ्या शहरांत राहण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अनेक प्रकारची माणसं आपल्याला पदोपदी भेटतात. आणि त्या सर्वांकडून काही ना काही सकारात्मक गोष्टी आपल्याला शिकता येतात.

माणूस कितीही टॅलेंटेड असला तरी त्या टॅलेंटला टेंपरामेंटची जोड असल्याखेरीज कोणतंही यश मिळवता येत नाही. नावं घेतली नाहीत, तरी अशी कितीतरी नावं आपल्या डोळ्यासमोर येतील की दोघांमध्येही समान प्रतीचं टॅलेंट खचाखच भरलेलं होतं. एकजण आपल्या टेंपरामेंटच्या बळावर टिकून राहतो. यशस्वी होतो, आणि दुसरा मात्र टेंपरामेंटअभावी वाहवत जातो. यशस्वी होण्यासाठी आणि त्या पेक्षाही ते टिकविण्यासाठी कष्ट, जिद्द आणि चिकाटी या गोष्टींची सदोदित साथ ठेवावी लागते. विजय तेंडुलकर हे खूप गंभीर आजारी होते. मात्र, अगदी निधनाच्या दोन दिवस आधीपर्यंत नवीन आलेला चित्रपट डाऊनलोड करून पाहात होते. किंवा अमिताभ बच्चन हे एखाद्या वाहिनीला चार ओळींच्या मराठीतून शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा घरात त्याचा सराव करताना दिसतात. ही उदाहरण आपल्यातलीच आहेत. त्यांच्याकडून आपण कधी शिकणार?

मायकल एंजेलोच्या अप्रतिम मूर्ती पाहून एकानं त्यांना विचारलं, या ओबडधोबड दगडांतून इतक्या सुरेख मूर्ती आपण कशा काय बरं घडवता?, त्यावर त्यानं खूप मार्मिक उत्तर दिलं. म्हणाला, त्या दगडात ती मूर्ती आधीच असते. मी फक्त तिच्यावरचा अनावश्यक भाग बाजूला करतो, इतकंच!

आपल्या सर्वांच्यात सर्व गोष्टी असतात. पण, त्यावरची आच्छादनं काढून त्या खुल्या मात्र करता आल्या पाहिजेत आपल्याला. आपल्यातलं जे हवं ते घेताना नको त्या गोष्टी काढून टाकण्याचं कसब मात्र आपल्यालाच आपल्यात विकसित करावं लागेल.
या पार्श्वभूमीवर आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं; ज्या निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय, त्या निसर्गाचं, काही तरी देणं लागतो आहोत. त्यासाठी काही तरी केलं पाहिजे, ही जाणीवही मनात ठेवली पाहिजे. या जाणीवांतूनच माझे मित्र नीलेश निमकर आणि इतर काही मित्रांच्या साथीनं आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी 'क्वेस्ट' या एनजीओची स्थापना केली. मुंबईसारख्या महानगरापासून अगदी दीडशे किलोमीटर असलेल्या या गावांत राहणारे आदिवासी आजही प्रगतीपासून कित्येक पिढ्या मागे आहेत. त्यांना मूलभूत शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. हे काम चांगल्या तऱ्हेनं करण्याचा, करत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातल्या वनकुसवडे या गावात आम्ही काही मित्रांनी मिळून २४ एकर नापीक जमीन विकत घेतली आहे. त्यावर जंगल उगवण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. त्यासाठी अथकपणे काम करीत आहोत. आमच्या हयातीत सुद्धा हे जंगल वाढेल, याची शक्यता नाही. मात्र, आम्ही आहोत, तोवर हे काम करत राहणारच. पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आपल्यातल्या प्रत्येकानं हे करायलाच हवं.
(शब्दांकन: आलोक जत्राटकर)


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार
सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी