रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (16:05 IST)

कोकणातील लोकप्रिय दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचे निधन

सिंधुदुर्ग: कोकणातील लोकप्रिय दशावतारी कलावंत शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण यांचं आज निधन झालं. पहाटे ३ वाजता त्यांनी गोव्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधीर कलिंगण यांनी वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी एक्झिट घेतल्याने दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील दशावतारी परंपरा जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. कलिंगण म्हणजे दशावतारातील हिरा होते. त्यांच्या जाण्याने दशावतार पोरके झाले आहे, अशी प्रतिक्रिया दशावतारी कलावंत व्यक्त करत आहेत.
 
सुधीर कलिंगण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य होते. तसेच दशावतार चालक-मालक संघाचे सचिव होते. प्रसिद्ध दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पुत्र होते. बाबी कलिंगण यांनी दशावतारी कला नुसतीच जिवंत ठेवली नाही तर समृद्ध केली. त्यांनी १९८३ मध्ये स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी काढली होती. त्यापूर्वी १९८४-८५ मध्ये त्यांनी खानोलकर दशावतार कंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात सुधीर कलिंगण आणि त्यांचा भाऊही काम करायचा. कधी कधी सुधीर स्त्री पात्रही रंगवायचे. वडिलांनी जिवंत ठेवलेली ही कला सुधीर यांनी पुढे नेली. दिवसभर एसटी विभागात चालक म्हणून काम करायचं आणि त्याचबरोबर दशावतारी नाट्य प्रयोगही करायचे अशी तारेवरची कसरत त्यांनी केली होती.
 
सुधीर यांची वनराज नाटकातील बाल वनराजाच्या भूमिकेपासून रंगभूमीवर सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी चिलियाबाळ आणि रोहिदास आदी भूमिकाही केल्या. नवोदित कलाकारांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. सुधीर यांनी ही कला केवळ कोकणापूरती मर्यादित ठेवली नाही. तर सिंधुदुर्ग, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं आणि गोव्यात दशावतारी प्रयोग करून रसिकांची मने जिंकली. प्रत्येक कोकणी माणसाच्या ओठी सुधीर कलिंगण यांचं नाव होतं. इतके ते कोकणी माणसात प्रसिद्ध होते. कोकणात तर ते लोकराजा आणि नटसम्राट म्हणून लोकप्रिय होते.