शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By राकेश रासकर|

दिलीप प्रभावळकर : झळाळती 'प्रभावळ'

दिलीप प्रभावळकर हे नाव आता फक्त मराठी चित्रपटांपुरतेच मर्यादीत राहिलेले नाही. ते देश, परदेशात पोहोचले आहे. लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटात त्यांची महात्मा गांधीची भूमिका लक्षात राहिल अशी होती. वास्तविक ही त्यांची सर्वोत्कृष्ट भूमिका नव्हे, त्या भूमिकेमुळे मराठीबाहेर या अभिनेत्याला ओळख मिळाली हे या भूमिकेचे योगदान म्हणता येईल.


वास्तविक कसदार अभिनयाने गेली तीस वर्षे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणाऱया या कलाकाराची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीला दुर्देवाने फार उशिरा झाली, असे म्हणता येईल. वैविध्यपूर्ण भूमिका जीव ओतून करणारा कलावंत ही सुद्धा त्यांची एक ओळख आहे.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अँटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली.

पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित 'लोभ नसावा ही विनंती' या नाटकातून झाला. या नाटकाचे मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर नाटक करण्यास सुरूवात केली. 'अलबत्या गलबत्या' या बालनाट्यात त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत. आरण्यकमध्ये केलेल्या विदुराच्या भूमिकेला त्यांना सर्वोत्कृष्ट हास्य अभिनेत्याचा महाराष्ट राज्याचा पुरस्कारही मिळाला.

रंगभूमीवर त्यांनी केलेल्या भूमिका लक्षात रहाण्यासारख्या आहेत. वासूची सासू, संध्याछाया, नातीगोती, जावई माझा भला, कलम ३०२, घर तिघांचे हवे या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत. 'हसवाफसवी' हे नाटक तर सबकुछ दिलीप प्रभावळकर आहे.

त्यात त्यांनी सहा भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक भूमिका महिलेची आहे. यात सहा भूमिकांत त्यांच्या अभिनयाचा कस लागला आहे. दूरदर्शनचे आणि नंतर खासगी वाहिन्यांचे युग आल्यानंतर तेथेही त्यांनी आपलला ठसा उमटवला. 'चिमणराव' या विनोदी मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

या मालिकेला अपेक्षेपक्षा जास्त यश मिळाले. टुरटुर आणि श्रीयुत गंगाधर टिपरे या अलीकडच्या काळातील काही मालिका. यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. टिपरेआबा तर घराघरात लोकप्रिय झाले. चित्रपटसृष्टीतही त्यांनी ठसा उमटवला. चि. वि. जोशी यांच्या अजरामवर चिमणराव गुंड्याभाऊ या पात्रांवर काढलेल्या त्याच नावाच्या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

'चौकट राजा' या चित्रपटातील त्यांची मनोरूग्णाची भूमिका म्हणजे अभिनयाचा वस्तुपाठ आहे. या भूमिकेने त्यांच्यातील ताकदवान अभिनेत्याचा प्रत्यय आला. या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांनी वेड्याच्या इस्पितळात जाऊन तेथील लोकांचा अभ्यास केला होता.

एक डाव भुताचा, एक होता विदूषक याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट केले. 'सरकारनामा' मधील त्यांचा कोकणी मंत्री छाप पाडून गेला. रात्र आरंभ'मधील वैशिष्ट्यपूर्ण खलनायकी भूमिकेतही त्यांच्या कसदार अभिनयाची झलक पहायला मिळाली. एन चंद्रांच्या बेकाबू या ‍िचत्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले.

तेथेही त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. हिंदीत त्यांनी कमी चित्रपट केले मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. गुगली, हसगत या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. असा हा अभिनेता सामाजिक कार्यातही मागे नाही. ते अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत.


दिलीप प्रभावळकर अभिनित नाट्य, चित्रपट व मालिका :


नाटक :

1. अलबत्या खलबत्या (1972)
2. आरण्यक (1974)
3. पोट्रेट (1977)
4. सूर्याची पिल्ले (1978)
5. पळा पळा कोण पुढे पळेल तो (1983)
6. विठ्ठला (1985)
7. वासूची सासू (1987)
8. एका जून्या वर्षी (1988)
9. नातीगोती (1989)
10 घर तिघांचे हवे (1990)
11. एक हाती मुलगी (1990)
12. हसवाफसवी (1991)
13. कलम 302 (1991)
14. संध्याछाया (1993)
15. जावई माझा भला (1994)
16.चुक भूल द्यावी घ्यावी (1996)
17. बटाट्याची चाळ (2001)
18. नांदा सौख्य भरे (2001)
19. वाटचाल (2004)
20. अप्पा आणि बाप्पा (2005)

मालिका :

1.चिमणराव (1977)
2. झोपी गेलेला जागा झाला (1986)
3. काम फत्ते (1987)
4. चिरंजीव (1989 )
5. नो प्रॉब्लेम (1989)
6. बेरीज वजाबाकी (1990)
7. एका हाताची टाळी
8. राजा राजा
9. कथानी (1992)
10. साळसूद (1997)
11. नॉक नॉक कौन है (1998)
12. छोटा मुह और बडी बात (1998)
13. अपना अपना स्टाईल हिंदी (2000)
14. घरकूल (2000)
15. टूरटूर
16. श्रीयुत गंगाधर टिपरे (2001)

चित्रपट :

1. चिमणराव गुंड्याभाऊ (1979)
2. एक डाव भुताचा (1981)
3. छक्के पंजे (1985)
4. झाकली मुठ सव्वालाखाची (1986)
5. धरलं तर चावतंय (1990)
6. चौकट राजा (1991)
7. एक होता विदुषक (1992)
8. झपाटलेला ( 1993)
9. आपली माणसे (1993)
10. बेकाबू (1994)
11. कथा दोन गणपतरावांची (1996)
12. सरकारनामा (1997)
13. रात्र-आरंभ (1999)
14. आधारस्तंभ (2002)
15. एन-काउंटर दी किलर (2002)
16. चुपके से (2003)
17. गॉड ओन्ली नोज (2003)
18. पछाडलेला (2004)
18. अगबाई अरेच्चा (2004)
19. फोनेक्स (2005)
20. कवडसे (2005)
21. पहेली (2005)
22. लगे रहो मुन्नाभाई (2006)
23. शिवा (2006)