गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (11:35 IST)

टोकियो ऑलिम्पिकची डायरी – जपानीतून मराठीत आलेले हे शब्द तुम्हाला माहिती आहेत का?

- जान्हवी मुळे
तुम्हाला माहिती आहे का, की मराठीत असे काही शब्द आहेत जे मूळचे जपानी भाषेतून आले आहेत? थोडं आश्चर्य वाटेल, पण आज अशाच काही शब्दांविषयी लिहिणार आहे.
 
खरं तर कमलप्रीत कौरची फायनल पाहण्यासाठी टोकियोच्या नॅशनल स्टेडियममध्ये आले होते. डिस्कस थ्रो (थाळीफेक) प्रकारात तिला सहाव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. रिकाम्या स्टेडियममध्ये असं ॲथलेटिक्सचे सामने पाहताना थोडं वेगळं वाटतं इथे.
 
त्यात पाऊस आल्यानं थोडा वेळ अशीच बसले होते, तेव्हा ही डायरी लिहायला सुरूवात केली.
 
तर, टोकियोत आल्यापासून तुमच्यापैकी अनेकांनी मला दोन प्रश्न विचारले आहेत - तुला जपानी भाषा येते का, भाषेची काही अडचण होते का? आणि तिथे खाण्याचं काय करतेस?
 
खाण्याविषयी प्रश्नाचं अर्ध उत्तर मी शनिवारी दिलं होतं. इथल्या खाद्यसंस्कृतीविषयी थोडं निवांतपणे लिहायचं आहे. पण आज भाषेविषयी बोलावसं वाटलं.
 
मला जपानी भाषा येत नाही. शिकायचा प्रयत्न केला होता, पण काही व्यवहारातल्या काही एक-दोन शब्दांच्या आणि वाक्यांच्या पलीकडे गेलेले नाही.
 
ऑलिंपिकसाठी टोकियोला जायचं म्हटल्यावर मात्र जरा तयारी म्हणून एका जपानी बोलू शकणाऱ्या मैत्रिणीकडे मदत मागितली होती. तिच्याशी बोलताना भाषेतल्या या देवाणघेवाणीविषयी आणखी रंजक माहिती मिळाली.
 
तसं इकेबाना (जपानी पुष्परचना), ओरिगामी (कागदाला घड्या घालून वेगवेगळे आकार बनवण्याची पारंपारिक जपानी कला), त्सुनामी (भूकंप किंवा तशा कारणांमुळे समुद्रात उठणाऱ्या महाकाय लाटा), सामुराई आणि निंजा योद्धा आणि सुशी, निगरी, मिसो यांसारखे खाद्यपदार्थ यांसाठीचे शब्द कदाचित तुम्हाला माहिती असतील.
 
हे शब्द जपानी भाषेतून आले आहेत आणि तसेच्या तसे जगातल्या बाकीच्या भाषांत वापरले जातात.
 
पण अगदी जपानीतून आलेला आणि भारतीय बनून गेलेला एक शब्द आपल्यापैकी अनेकजण रोज वापरतात. तो शब्द आहे 'रिक्षा'.
 
जपानमध्ये साधारण 19 व्या शतकापासून जिनरिक्षा म्हणजे माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला. त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियात आणि तिथून भारतातही पोहोचला.
 
हाराकिरी हा शब्दही जपानी भाषेतून आला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी मात्र रक्तरंजित आहे.
 
युद्धात पराभव समोर दिसू लागला, की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव देत असत. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं, तर त्यासाठी वापरला जातो.
 
एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन 'टायकून' असं केलं जातं. हा शब्दही जपानी भाषेतून इंग्रजी मार्गे मराठीतही प्रचलित झाला आहे. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता.
 
हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार मराठीतही प्रसिद्ध आहे. व्हॉट्सॲपवर आपण ज्या स्माईलीजचा वापर करतो, त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणार इमोजी हा शब्दही जपानी भाषेतून आला आहे.
 
तुम्ही संगीताचे चाहते असाल आणि रिॲलिटी शोज पाहात असाल, तर कदाचित कराओकेविशयी तुम्हाला माहिती असेल.
 
कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्यसंगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल गाता येतात. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणूनही जगभर कराओके प्रसिद्ध आहे.
 
झेन हा शब्द मात्र भारतातून बौद्ध धर्मासोबत चीनमार्गे जपानी भाषेत आला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पालीतील झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची, विचार करण्याची एक पद्धतीही आहे, ज्यानं आजवर अनेक कलाकारांनाही प्रेरणा दिली आहे.