रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

त्वचादान कसं करतात? त्वचादानामुळे लोकांचे प्राण कसे वाचू शकतात? महत्त्वाची माहिती

भोपाळच्या करोंद परिसरात सात वर्षांचा चित्रांश घराच्या छतावर खेळत होता. त्या छताच्या वरून वीजेची एक हाय टेंशन वायर जात होती. चित्रांशच्या आई मनिषा दांगी तिथं जवळंच कपडे वाळायला टाकत होत्या. अचानक एक मोठा स्फोट झाला आणि मनिषा यांनी वळून पाहिलं तेव्हा त्या स्तब्ध झाल्या. त्या मोठ्यानं किंचाळल्या आणि धावत जाऊन त्यांनी चित्रांशला पकडलं. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी चित्रांशला रुग्णालयात नेलं.
चित्रांशचे वडील गजेंद्र दांगी म्हणाले की, "आम्ही एका दिवसाआधीच याठिकाणी राहायला आलो होतो. माझा मुलगा लोखंडी सळई हवेत फिरवत खेळत होता. ती सळई हाय टेंशन वायरला लागली त्यातून ठिणग्या उडाल्या आणि चित्रांश त्यात होरपळला." "मी आणि माझ्या पत्नीला काही बोलताही येत नव्हतं. मुलाला अशाप्रकारे वेदनांनी विव्हळताना पाहणं आमच्यासाठी फारच कठीण होतं," असंही ते म्हणाले. या मुलावर उपचार केलेले कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. सुनील राठौर बन्सल यांनीही याबाबत आम्हाला माहिती दिली. "जेव्हा हे मूल आमच्याकडं आलं तेव्हा त्याचं शरीर 60 टक्के भाजलं होतं. फक्त पाठ आणि पायाचा भाग त्यातून वाचला होता. हे बाळ अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होतं," असं ते म्हणाले.
 
त्वचादानाबाबत संकोच
"आम्ही मुलाच्या जखमांवर आधी त्याच्याच त्वचेचा वापर करून ग्राफ्टिंग केलं होतं. पण त्याची त्वचा पुरेशी नव्हती. त्यानंतर आम्ही त्याच्या वडिलांचं समुपदेशन केलं आणि त्यांच्या एका पायाची त्वचा वापरली. आम्ही मुलाच्या एका हाताची त्वचा इतर ठिकाणी वापरण्यासाठी वाचवली. मुलाला अजूनही ड्रेसिंग केलं जात आहे.
त्याची हाताची त्वचा चिकटू नये याची काळजी घेतली जात आहे. पण पुढंही मुलाची शस्त्रक्रिया करण्याची गरज लागेल," असंही डॉ. बन्सल म्हणाले. त्यांच्या मते, साधारणपणे जेव्हा मुलांबरोबर अशा घटना घडतात तेव्हा पालक आणि विशेषतः वडील त्वचा दान करायला तयार होतात. पण त्यांचं वय जास्त असेल तर मात्र ते त्वचा दान करण्यासाठी संकोच करतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडलेल्या आणि बर्न सर्व्हायवर स्नेहा जावळे म्हणाल्या की, "जे लोक एखाद्या घटनेमुळं भाजतात तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसलेला असतो आणि त्यांना खूप वेदनांचाही सामना करावा लागतो. अशावेळी त्यांचीच त्वचा वापरणं हे त्यांच्यासाठी आणखी वेदना वाढवणारं ठरू शकतं. त्यामुळं नातेवाईक आणि इतरांनी पुढं येऊन त्वचादान करायला हवं." त्यांच्या शरीराचा 40 टक्के भाग भाजला होता आणि त्यांच्यासाठी कोणीही त्वचादान करायला पुढं आलं नाही, असं त्या म्हणाल्या. त्यामुळं शक्य असल्यानं त्यांचीच त्वचा वापरली. त्याऐवजी दुसरी कोणी त्वचादान केली असती तर त्यांना नंतरच्या वेदना सहन कराव्या लागल्या नसत्या आणि त्या लवकर बऱ्याही झाल्या असत्या. रुग्णासाठी त्वचादानाचं महत्त्वं लक्षात घेऊन नॅशनल बर्न्स सेंटरमधील वैद्यकीय संचालक तसंच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉ. सुनील केसवानी म्हणाले की, त्वचा हा एक मोठा अवयव आहे. त्वचा व्यक्तीला बाह्य संसर्ग, उष्णता, थंडीपासून वाचवते आणि शरीरातील द्रवपदार्थ बाहेर येण्यापासून वाचवते. त्यामुळं त्वचा आपल्या संरक्षणाचं काम करते. मुंबईत राहणारे डॉक्टर केसवानी यांनी बीबीसीशी बोलताना याबाबत मत मांडलं. "जेव्हा एखाद्या महिलेची किंवा पुरुषाची त्वचा भाजली जाते तेव्हा त्या व्यक्तीला त्वचेमुळे होणारं संरक्षण मिळणं बंद होतं. त्यामुळं जीवाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळं संसर्ग होतो. त्यामुळं व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्वचादान करायला हवं," असं ते म्हणाले.
 
भारतात लोक होरपळण्याच्या घटना
जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डबल्यूएचओच्या मते, दरवर्षी भारतात 10 लाख लोक भाजण्याच्या घटनेचे बळी ठरतात. त्यात सौम्य आणि गंभीर भाजलेल्यांचा समावेश आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या बर्न अँड प्लास्टिक) विभागातील विभागप्रमुख डॉ. शलभ कुमार म्हणाले की, आकड्यांचा विचार करता अनेक घटनांची तर नोंदही होत नाही. कारण रुग्ण काही लहान दवाखान्यांमध्ये जातात. त्यामुळं आकडे योग्यप्रकारे समोर येत नाहीत. रुग्णालयात वर्षभरात सुमारे 7 हजारपेक्षा जास्त भाजलेले रुग्ण येतात. त्यात बहुतांश प्रकरणं स्वयंपाकघरातील दुर्घटनेची असतात, असं ते म्हणाले. त्याशिवाय फॅक्टरी किंवा इतर ठिकाणी होणारे अपघात आणि अॅसिड हल्ल्यांतील रुग्णदेखील असतात. डॉक्टरांच्या मते, भारतात जीवंत व्यक्तीला त्वचादान करता येत नाही. कारण तसं करणं अवैध आहे.
 
भारतात स्किन बँक
डॉ.सुनील केसवानी यांनी याबाबत अधिक स्पष्टपणे माहिती दिली. "भारतात स्किन बँकांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्या भागांमध्ये स्किन बँक नाहीत, त्याठिकाणी जीवंत व्यक्तीला त्वचादान करता येतं." त्यामुळं भोपाळमध्ये गजेंद्र यांनी मुलाला अशाप्रकारे त्वचा देणं अवैध ठरलं नाही. कारण तिथं स्किन बँक नाही. डॉ. सुनील केसवानी म्हणाले की, गेल्या महिन्यापर्यंतचे आकडे पाहिले तर भारतात आतापर्यंत 27 स्किन बँक सुरू झाल्या आहेत. भारतात या स्किन बँक बहुतांश महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्यांमध्ये आहेत. तर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उत्तर भारतातील पहिली स्किन बँक सुरू झाली. पण आता अनेक राज्यांमध्ये अशा स्किन बँक सुरू झाल्या आहेत.

त्वचादान कोण करू शकतं?
मृत व्यक्तीची त्वचा दान करण्यासाठी देता येऊ शकते.
मृत व्यक्तीची त्वचा सहा ते आठ तासांपर्यंत दान करता येऊ शकते.
दान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असता कामा नये.
त्या व्यक्तीला त्वचेचा कोणताही आजार असता कामा नये
त्या व्यक्तीला त्वचेचा कॅन्सर असता कामा नये
100 वर्षांची व्यक्तीही त्वचादान करू शकते
दान करणाऱ्याला एचआयव्ही, हेपॅटायटिस बी आणि सी असू नये
 
त्वचेचं बँकेत कसं संवर्धन केलं जातं?
डॉ. सुनील केसवानी आणि डॉ. शलभ कुमार म्हणाले की, स्किन बँकेत एका केमिकलचा वापर होतो त्याला ग्लिसरॉल (glycerol)म्हटलं जातं. या केमिकलमध्ये 4 ते 6 अंश सेल्सिअसमध्ये त्वचेवर 45 दिवस प्रक्रिया केली जाते. याठिकाणी पाच वर्षांपर्यंत त्वचा ठेवली जाते असं ते म्हणाले. पण त्वचा एवढा काळ ठेवण्याची गरज लागत नाही, कारण त्याची मागणी खूप जास्त असते.
 
स्किन ट्रान्सप्लांट तुलनेनं सोपं
डॉक्टरांच्या मते, यकृत किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी रुग्ण आणि दान करणाऱ्यांचे टिश्यू मॅच केले जातात. पण त्वचेच्या प्रत्यारोपणासाठी याची गरज नसते. डॉ. सुनील राठौर बन्सल म्हणाले की, यालाही प्लास्टिक सर्जरी म्हटलं जातं. पण ती सुंदर बनवण्यासाठी नव्हे तर जीवन वाचवण्यासाठी स्किन ग्राफ्टिंग केलं जातं. ते म्हणाले की, त्वचेमध्ये दोन थर असतात. एपिडरमिस आणि डरमिस आणि त्याच्याच वरच्या भागाला त्वचेच्या प्रत्यारोपणासाठी काढलं जातं.

त्यांच्या मते, त्वचादान करणाऱ्यांना -
सुरुवातीला चालायला थोडा त्रास होतो.
जखम भरायला तीन आठवडे लागतात.
दोन आठवड्यांत वेदना कमी होतात.
त्यानंतर तुम्ही दैनंदिन कामं करू शकता
 
जागरुकता पसरवण्याची गरज
डॉक्टरांच्या मते, स्किन ट्रान्सप्लांटमुळं कोणताही अवयव किंवा स्नायूवर परिणाम होत नाही. तसंच त्यामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी येत नाही. अभ्यासकांच्या मते, त्वचादानाबाबत लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. त्याचबरोबर सरकारनं राष्ट्रीय आरोग्य धोरणातही बदल करणं गरजेचं आहे. डॉक्टर सुनील केसवानी म्हणाले की, एखादी व्यक्ती जेव्हा अशा घटनेची बळी ठरते तेव्हा त्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो. त्यामुळं यासाठी निधीमध्ये वाढ करायला हवी. दिल्लीतील 'ऑर्गन इंडिया'चे डॉ. सौरभ शर्मा म्हणाले की, त्यांच्याकडं किडनी, डोळे किंवा देहदानाबाबत जास्त फोन येतात. पण त्वचादानाबाबत फोन येत नाही. कारण जागरुकतेचा अभाव आहे. पण याबाबत माहिती देऊन जागरुकता निर्माण करण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
तज्ज्ञांच्या मते, एका मृत शरिराद्वारे आठ लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालयं आणि संस्थांमध्ये जाऊन सामाजिक संस्थांच्या मदतीनं लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याची गरज आहे. त्यामुळं लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो.
 
Published By- Dhanashri Naik