बांगलादेश: 'आगीचा लोळ माझ्या अंगावर आला', ढाक्यातील आगीमध्ये 43 मृत्युमुखी
बांगलादेशातील एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान 43 जणांचा मृत्यू झाल्याचं देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी ढाकामध्ये गुरुवारी (29 फेब्रुवारी) स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. त्यानंतर आग संपूर्ण इमारतीमध्ये झपाट्याने पसरली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, यामागचे कारण शोधले जात आहे.
बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी सांगितले की, आतापर्यंत ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात महिला आणि मुलांसह किमान 33 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर शहरातील इतर रुग्णालयात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डझनभर लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत, असंही सेन यांनी सांगितले. बांगलादेशातील जे डेली या वर्तमानपत्रानुसार, ज्या 'कच्ची भाई' रेस्टॉरंटमध्ये आग लागली ते सातव्या मजल्यावर होतं.
या इमारतीमध्ये इतर रेस्टॉरंट्स तसेच अनेक कपड्यांची आणि मोबाईल फोनची दुकाने आहेत. एफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोहेल नावाच्या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने सांगितले की, “आम्ही सहाव्या मजल्यावर होतो. तेव्हा आम्ही जिन्यांमधून धूर निघताना पाहिला. बरेच लोक वरच्या मजल्यावर धावत आले. पण आम्ही पाण्याच्या पाईपचा वापर करून खाली उतरलो. आमच्यापैकी काही जण वरच्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाले आहेत."
आगीमधून वाचलेल्या मोहम्मद अल्ताफने रॉयटर्सला सांगितले की, एका तुटलेल्या खिडकीतून आगीचा लोळ त्याच्या अंगावर आला. पण तो थोडक्यात बचावला. आपल्या दोन सहकाऱ्यांनी लोकांना बाहेर काढण्यास मदत केली होती. पण त्या दोघांचाही नंतर मृत्यू झाल्याचं, मोहम्मद अल्ताफने सांगितलं. बांगलादेशमध्ये व्यावसायिक आणि निवासी इमारतींना मोठी आग लागणं सामान्य गोष्ट झाली आहे. सुरक्षाविषयक जागरुकता आणि नियमांची अपुरी अंमलबजावणी यामुळे या घटना घडत असल्याचं सांगितलं जातं.
Published By- Dhanashri Naik