गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (08:39 IST)

मायग्रेनची लक्षणं कशी ओळखायची? या नवीन औषधामुळे हा त्रास होऊ शकतो कमी...

सप्टेंबर 2023 मध्ये युकेने अशी एक घोषणा केली आहे की ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ शकतो.नवीन औषधांना मंजुरी देणाऱ्या युकेची संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस (NICE) ने काही महिन्यांपूर्वी मायग्रेनपासून बचाव करण्यासाठी एक नवीन औषधाला मंजुरी दिली आहे.
 
मायग्रेन म्हणजे प्रचंड डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जवळपास एक कोटी लोक त्यामुळे प्रभावित होते.
 
हा एक असा आजार आहे ज्यामुळे डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं.
 
यामुळे अगदी नातेसंबंधांवर मोठा परिणाम होतो. ही औषधं मायग्रेनने पिडीत रुग्णांना देता येईल, असा नाईसने निर्णय घेतला आहे.
 
मायग्रेनच्या उपचारांमध्ये काय बदल होणार आहे याचा उहापोह या लेखातून करू या.
 
मायग्रेनची लक्षणं
अमेरिकेतील स्कॉट्सडेल येथे असलेल्या मेयो क्लिनिकमध्ये न्यूरॉलॉजिस्ट आणि डोकेदुखीच्या तज्ज्ञ डॉक्टर अमाल स्टार्लिंग सांगतात की, मायग्रेन फक्त डोकेदुखी नाही मात्र आपल्या मेंदूचं काम प्रभावित होतं.
 
ते सांगतात, “ज्या व्यक्तीला मायग्रेनचा अटॅक येतो त्याचा उपचार फक्त अस्पिरिन घेऊन होत नाही. मायग्रेनमुळे इतकं डोकं दुखतं की मेंदूची काम करण्याची क्षमता अतिशय कमी होते.”
 
मायग्रेनचे अटॅक टप्प्यात येतात.
 
डॉ. अमाल स्टर्लिंग म्हणाले, “मायग्रेनच्या अटॅकमध्ये पहिल्या टप्प्यावर काही ना काही खायची इच्छा होते किंवा चिडचिड होते. थकवा जास्त येतो. जांभया येतात आणि मानेत वेदना सुरू होतात.”
 
“डोकेदुखी पहिल्या टप्प्यानंतर काही तासांनंतर सुरू होते. डोकं दुखत असताना उजेडाचा त्रास होतो. शरीरात झिणझिण्या आल्यासारखं होतं. वास घेण्याची क्षमता प्रभावित होते, उलटी आल्याची भावना होते.”
डॉ. अमाल स्टर्लिंग म्हणतात की, सगळ्याच रुग्णांची लक्षणं सारखी नसतात. काही लोकांमध्ये यापैकी काहीच लक्षणं दिसतात.
 
मात्र वेदना कमी झाल्यावर मेंदू हलका हलका वाटतो आणि अतिशय थकवा येतो. पुरुषांच्या तुलनेत मायग्रेनचा त्रास स्त्रियांना जास्त होतो.
 
एका संशोधनानुसार 15 ते 49 या वयोगटातील महिलांमध्ये मेंदूविकारचं सगळ्यात मोठं कारण मायग्रेन आहे.
 
डॉक्टर अमाल स्टार्लिंग यांच्यानुसार अमेरिकेत मायग्रेनमुळे काम न करू शकल्यामुळे 11 अब्ज डॉलरचं नुकसान होतं.
 
मायग्रेनच्या वेदना विसरणं अतिशय कठीण होतं आणि रुग्णांना कायम चिंता असते की पुढचा अटॅक कधीही येऊ शकतो.
 
याच भीतीमुळे पुढच्या दोन तीन दिवसात काय काम करायचं, कुठे जायचं असेल तर कसं जायचं याचं नियोजनही करता येत नाही.
 
क्रॉनिक आणि एपिसोडिक मायग्रेन: कसं ओळखाल?
डॉक्टर अमाल स्टर्लिंग म्हणतात, “हा आजार अनुवांशिक आहे की जनुकीय आहे हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मायग्रेनचे अटॅक अस्थमासारखे असतात. ते आठवड्यातून एकदाही येतात किंवा वारंवार येतात.
 
ज्या लोकांना महिन्यातून 8 ते 15 दिवस मायग्रेन होतो ते क्रॉनिक मायग्रेनच्या श्रेणीत येतं. ज्यांना आठ दिवसातून एकदा अटॅक येतो त्यांना एपिसोडिक मायग्रेनच्या श्रेणीत ठेवलं जातं. मात्र त्याचं निदान करणं अतिशय कठीण होतं.
 
डॉ. स्टर्लिंह म्हणतात की त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आई किंवा बहिणीला डोकेदुखीचा त्रास असायचा. दुसऱ्या लोकांनाही हा त्रास असायचा. त्यामुळे ती काही फार विशेष बाब नाही. जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हाच मायग्रेनचं निदान होतं.
 
दुसरं आव्हान आणि गैरसमज असा आहे की डोक्याच्या एकाच बाजूला वेदना असतील तर मायग्रेन आहे असं समजलं जातं. मात्र ते खरं नाही. मायग्रेनमुळे डोक्याच्या दोन्ही बाजूला वेदना होते. मायग्रेनच्या लक्षणांच्या बाबतीत सुद्धा बराच गोंधळ आहे. बरेचदा मान किंवा सायनसमुळे होणाऱ्या डोकेदुखी आणि मायग्रेनमध्ये फारसा फरक दिसत नाही.
 
डॉ. स्टर्लिंग म्हणतात, “अनेकदा मायग्रेनची लक्षणं स्पष्ट नसतात. मात्र चक्कर येणं हेसुद्धा एक स्थायी आणि मुख्य लक्षण आहे. काही लोकांना असं वाटतं की कानात काही बिघाड झाल्यामुळे चक्कर येतात. मात्र कानाची टेस्ट केली तर त्यात लक्षात येतं की त्यात कोणतीही समस्या नाही.”
 
“खरंतर समस्या अशी आहे की कान जेव्हा मेंदूला सिग्नल पाठवतो तोव्हा मायग्रेनमुळे प्रभावित मेंदू त्या पद्धतीने प्रोसेस करू शकत नाही ज्या पद्धतीने शरीरात असंतुलनामुळे अस्थिरता येते आणि चक्कर येते.”
 
“मायग्रेनवर वेळीच उपचार केले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि मायग्रेन क्रॉनिक मायग्रेनमध्ये रुपांतरित होऊ शकतो. आतापर्यंत मायग्रेनसाठी विशेष औषध उपलब्ध नाही. दुसरं म्हणजे प्रत्येक रुग्णामध्ये वेगळ्या प्रकारचा मायग्रेन होतो. त्यामुळे कोणत्या औषधाने कोणाला लाभ होईल हे सांगता येत नाही.”
 
उपचारांमध्ये नवीन प्रयोग
इराणचे डॉक्टर फरायदून, न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या जॉर्जिन इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे संशोधक आहेत.
 
ते सांगतात की मायग्रेनचे उपचार दोन पद्धतींनी होतात. एकाला आपण अक्यूट ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे ज्या रुग्णांना सध्या मायग्रेनचा अटॅक येतो. दुसरं आहे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ज्या व्यक्तीला अद्याप दौरा पडलेला नाही मात्र भविष्यात मायग्रेन पासून बचाव करण्यासाठी उपचार केले जातात. दोन्ही उपचारपद्धतीत वेगवेगळ्या औषधांचा समावेश आहे.
 
“मायग्रेनला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्या व्यवस्थापनासाठी आम्ही पॅरासिटामॉल किंवा आयब्रुफेनसारख्या औषधांचा वापर करतो. मात्र अक्युट मायग्रेन मॅनेजमेंटसाठी ट्रिपटॅनचा वापर करतो.”
 
जेव्हा डोकेदुखी सुरू होते तेव्हा ट्रिपटॅन दिलं जातं. मायग्रेन नियंत्रित करण्यासाठी अँटी डिप्रेसंट गोळ्या किंवा ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याच्या गोळ्यांचा वापर केला जातो.
 
डॉक्टर फरायदून यांचं म्हणणं असं आहे की ही औषधं अगदी सहज उपलब्ध होतात.
 
डॉक्टर फरायदून म्हणतात, “मी इराणची आहे. तिथेही ही औषधं अगदी आरामात मिळतात. भारतातही असंच आहे. ही औषधं स्वस्त आहेत. मात्र मायग्रेन मॅनेजमेंटसाठी तयार केलेल्या गोळ्या इतक्या सोप्या पद्धतीने उपलब्ध नाहीत. त्यासाठी जे उपलब्ध आहेत त्यानेच काम चालवावं लागेल.
 
मात्र अँटी डिप्रेसंट आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या सर्व रुग्णांना देता येत नाहीत.
 
ते म्हणतात, याशिवाय मायग्रेन नियंत्रित करण्याचे अन्य काही उपाय आहेत.
 
ते म्हणतात, “नियमित व्यायाम केल्यानेसुद्धा मदत मिळू शकते. त्यामुळे मानेच्या वेदना कमी होतात. एरोबिक व्यायाम केल्यामुळे मायग्रेन नियंत्रित होण्यास मदत होते. मात्र एक दोनदा डॉक्टरना भेटून हे उपचार होत नाहीत.”
 
“त्यामुळे संयम असणं अत्यावश्यक आहे. कारण अनेक पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. तो एक ट्रायल अँड एररचा भाग आहे. त्यामुळे लक्षात येतं की कोणता उपाय कामास येतोय आणि कोणता नाही.”
 
मात्र शल्यचिकित्सक अशा औषधांची वाट पाहत आहेत जी फक्त मायग्रेनसाठी वापरली जाऊ शकतात.
 
नवीन औषध आल्यामुळे अपेक्षा वाढल्या
प्रोफेसर पीटर गोड्सबी लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये न्यूरॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. मायग्रेनचं नवीन औषधं शोधण्यासाठी जे संशोध केलं आहे त्यात ते सहभागी आहेत.
 
ते म्हणतात की मायग्रेनपासून बचाव करण्यासाठी पहिल्यांदा एक औषध तयार झालं आहे जे बऱ्यापैकी प्रभावी आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यात बरीच सुधारणा होते. मात्र हे औषध काम कसं करतं?
 
ते म्हणतात, “हे औषध सीजीआरपी नावाच्या रसायनाचा प्रभाव थांबवतं. या रसायनामुळे डोक्यात तीव्र वेदना होतात. हे औषध मायग्रेनवरच्या उपायासाठी तयार करण्यात आलं आहे. ते शरीरात लवकर शोषलं जातं आणि वेदना सुरू होण्याआधी थांबवू शकतो.”
 
पीटर गोड्सी सांगतात की या नवीन औषधांचा वापर मायग्रेनचा अटॅक आल्यावर किंवा तो टाळण्यासाठी केला जातो.
 
रिमेजीपेंट नावाचं हे औषध वापरण्याला मंजुरी मिळाली आहे आणि अमेरिकेसकट 80 देशात त्याचा वापर सुरू झाला आहे.
 
मायग्रेनचा अटॅक टाळण्यासाठी आणि अटॅक आल्यावर मायग्रेन नियंत्रित करण्यासाठी या औषधाला युकेमध्ये मंजुरी मिळाली आहे. मात्र काही विशिष्ट परिस्थितीतच हे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
गोड्सबी म्हणतात, “खरंतर हे औषध मायग्रेन टाळण्यासाठी दिलं जात आहे. मात्र जेव्हा रुग्णाला चार किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मायग्रेनमुळे वेदना होतात आणि मायग्रेनसाठी ट्रिप्टेनमुळे होणारे उपाय अयशस्वी होतात तेव्हा रिमेजीपेंट दिली जाते.
 
रिमेजिपेंट एक मोठं यश आहे. पण त्यापेक्षा जास्त चमत्काराची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
 
पीटर गोड्सबी म्हणतात, “रिमेजीपेंट हो कोणतंही चमत्कारिक औषध नाही. अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे मात्र ते सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. चांगली गोष्ट ही आहे की याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही.”
 
ते म्हणतात, “ट्रायल दरम्यान असं लक्षात आलं आहे की केवळ एक दोन टक्के लोकांना उलट्या झाल्या आहेत. अनेकांना मायग्रेनच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांचं आयुष्य बदललं आहे. गेल्या काही वर्षांपासून औषधं तयार करण्याच्या संशोधनात सहभागी होणं ही माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची उपलब्धी आहे.”
 
मात्र मायग्रेन नियंत्रणाच्या दिशेने आणखी बरंच काम होणं बाकी आहे आणि नवी औषधं तयार करण्याची गरज आहे.
 
अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं अद्याप बाकी
मायग्रेनच्या उपायांसाठी आणखी काही उपाय शोधले जात आहेत. त्यासाठी बीबीसीने लीसा रेस्टेड ओये यांच्याशी संवाद साधला. ते न्यूरॉलॉजिस्ट आहेत आणि नॉर्वेजियन सेंटर फॉर हेडेक रिसर्च म्हणजे नॉरहेडचे संशोधक आहेत.
 
त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन औषधांमुळे मायग्रेनमुळे पीडित लोकांना डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते.
 
“आम्हाला मायग्रेनच्या व्यक्तिगत प्रकरणांची नीट चर्चा झाली पाहिजे. काही लोकांना मायग्रेन होतो आणि काही लोकांना का होत नाही हे आम्हाला माहिती नाही. मायग्रेनचा अटॅक का येतो, त्याचा ट्रिगर का येतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाही.”
 
या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही चांगले पर्याय समोर येऊ शकतात.
 
लीसा रेस्टेड म्हणतात, “मी नॉरहेडमझध्ये माय्रगेनच्या उपचारासाठी औषधांशिवाय इतर पर्यायांचा शोध घेत आहोत. अनेक लोक असं मानतात की मायग्रेनचा संबंध तणावाशी आहे आणि त्यामुळेच अटॅक येतो. आम्ही मायग्रेन नियंत्रणात आणण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील याचा शोध घेत आहोत.”
 
नॉरहेड जगातल्या अनेक भागात संशोधकांबरोबर मिळून काम करत आहेत. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर केला जातो.
 
इंटरनेटवर मायग्रेनबद्दल बरीच माहिती अपलोड करून संशोधन केलं जात आहे. त्यामुळे मायग्रेनचे प्रकार आणि लक्षणांच्या सुरुवातीबद्दल जास्त माहिती मिळेल अशी आशा आहे.
 
लीसा रेस्टेड ओये म्हणाल्या, “उदाहरणच सांगायचं तर अँडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीने मायग्रेनच्या प्रभावाचा नीट अभ्यास होईल. कोणतं लक्षण दिसण्यायच्या आधी मायग्रेनवर उपाय केला जाऊ शकतो हेही आम्हाला समजेल.”
लीसा रेस्टेड ओयेच्या मते, “मायग्रेनचा संबंध एखाद्या जनुकाशी संबंध आहे की नाही हेही आम्हाला समजेल. यामुळे कोणत्या रुग्णासाठी कोणतं औषध चांगलं आहे हेही आम्हाला कळेल.”
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सध्याच्या औषधात फेरबदल करून मायग्रेनच्या उपचारांसाठी नवी औषधं तयार केली जाऊ शकतात.
 
लीसा रेस्टेड ओये म्हणाल्या की असंच एक औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये सुद्धा सामील आहे. हे औषध उच्च रक्तदाबाच्या उपाचारांसाठी वापरण्यात येतं. ते स्वस्त आहे आणि सहज उपलब्ध होतं.
 
आम्ही जर हे सिद्ध केलं की हे औषध मायग्रेनच्या उपचारांसाठी उपयुक्त आहे तर जगभरात मायग्रेनच्या उपचारांसाठी औषधांचा वापर सुरू केला जाऊ शकतो.
 
मायग्रेनसाठी नवीन औषध तयार करण्यापेक्षा जुन्या औषधात फेरबदल केले तर उपचारांचे पैसे वाचतील आणि वेळही.
 
मुख्य प्रश्न असा आहे की मायग्रेनच्या उपचारांमध्ये बदल होणार आहे का?
 
दशकानुदशकं अनेक औषधं उपलब्ध करून दिल्यावर रिमेजीपँट औषधाला मंजुरी मिळाली आहे. मात्र ते सगळीकडे उपलब्ध नाही आणि सर्व रुग्णांना त्याचा फायदा होतोच असं नाही. मायग्रेनच्या उपचारासाठी पर्याय उपलब्ध आहेतच.
 
मायग्रेनपासून मुक्ती मिळवण्यासाठी बराच वेळ लागेल. मात्र त्यासाठी संशोधन सुरू आहे आणि आशा वाढत आहे
 
Published By- Priya Dixit