मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (12:43 IST)

भुवयांच्या खाली दुखत असेल तर....

अनेकांना भुवयांचा खालचा भाग दुखत असल्याची संवेदना अनेकदा होते. या भागाच्या दुखण्याकडे किरकोळ म्हणत दुर्लक्ष करू नका. याचे कारण भुवयांच्या खालचा भाग दुखणे ही आरोग्याची गंभीर समस्या ठरू शकते. हा भाग दुखण्यामागे अनेक कारणे असतात. ही कारणे जाणून घेऊन त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक ठरते. काही रूग्णांमध्ये अर्धशिशीसारख्या व्याधीमुळे भुवयांच्या खालचा भाग दुखू शकतो. अशा रूग्णांना दिवसातून अनेकवेळा भुवयांच्या खालच्या भागात आत्यंतिक वेदना जाणवतात. या वेदना काही आठवड्यांपर्यंत, काही महिन्यांपर्यंत जाणवत राहतात. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अशा प्रकारच्या डोकेदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.

लहानपणापासून अथवा वयाच्या चाळीशी-पन्नाशीमध्ये अशा प्रकारची डोकेदुखी सतावू लागते. ही डोकेदुखी होण्यामागच्या नेमक्या कारणांचा अजून शोध लागलेला नाही. मात्र शरीरातील हिस्टामाइन आणि सेरोटोनिन यांचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही डोकेदुखी होते, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. डोळ्याजवळ अथवा डोळ्यामध्ये संसर्ग झाला असेल तर त्याचा परिणाम भुवयांखालचा भाग दुखण्यात होतो. मनावर दडपण असेल तर अनेकांचे डोकेदुखू लागते. काहीजणांना तणाव वाढल्यामुळे डोळ्याच्या आसपासच्या भागात दुखू लागते. डोळ्याची सहज उघडझाप करणे अवघड होऊन जाते.

काहीजणांना आपले डोके कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी भावना होत आणि डोके दुखू लागते. तणाव वाढल्यामुळे डोके का दुखते, यामागची कारणे अजून कळू शकलेली नाहीत. कमी झोप, फ्लू यामुळे तणावाच्या स्थितीत डोके दुखू लागते, असे दिसले आहे. ग्लुकोमा हे डोळ्याच्या खालचा भाग दुखण्याचे कारण ठरू शकते. नेत्रपटलावरील दबाव काही कारणांमुळे वाढल्यामुळे डोळ्यांना रक्तपुरवठा करणार्‍या पेशी व्यवस्थित काम करत नाहीत. त्याचा परिणाम पुढे आपली दृष्टी कमजोर होण्यात होतो. डोळ्याजवळच्या भागातील रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होणे यामुळे भुवयांच्या खालचा भाग दुखू शकतो. थंडी वाजल्यामुळेही ही समस्या उद्‌भवू शकते. थंडी अथवा अ‍ॅलर्जीमुळे सायनेस ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे डोक्यावरचा दाब वाढतो आणि त्याचा परिणाम भुवयांच्या खालच्या भागात वेदना होण्यात होतो. भुवयांच्या खालचा भाग दुखत असेल तर डोळे बंद करून अंधार्‍या खोलीत शांत बसून राहावे.

डॉ. मनोज कुंभार