गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (15:11 IST)

खाण्याचा, चघळण्याचा, खाजवण्याचा आवाज आल्यावर तुम्ही अस्वस्थ होत असाल, तर हे वाचा

mental health
मेट्रो, लोकल, बस असो वा रिक्षा तुम्ही अनेकवेळा लोकांना हेडफोन लावून प्रवास करताना पाहिलं असेल.
अर्थात ते स्वमर्जीनं हेडफोन वापरतात हे निश्चित परंतु हेडफोन लावणं हे त्यांच्यासाठी आवश्यकच असेल तर? म्हणजे त्यांच्या मर्जीविरोधात हेडफोन लावावा लागत असेल तर?
 
हो! काही लोकांना हेडफोन लावावाच लागतो. 28 वर्षांच्या मार्गोट नोएल यांना हेडफोन लावावाच लागतो. एका विशेष त्रासाापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ते करावंच लागतं.
 
मार्गोट नोएल यांना मिसोफोनिया आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मिसोफोनिया ही एक डिसॉर्डर आहे. यामध्ये वरवर सामान्य वाटणाऱ्या आवाजांनी या लोकांना राग येतो आणि त्यांची चिडचिड होते.
 
यामुळे ते नाराज होतात, कधी ते भयभीतही होतात, कधी त्यांना पॅनिक अटॅकही येऊ शकतो.
काही आवाज ऐकल्यावर त्यांच्या मेंदूतील इंद्रियांच्या संवेदनांशी जोडणारा भाग एकदम वेगानं सक्रीय होतो.
 
आपल्याजवळ कोणी श्वासोच्छवास करतंय, खाजवतंय, खाताना होणारा आवाज, ओरखडे काढणे, पेनाचा आवाज अशा सामान्य लहानशा आवाजांनी काही लोक चिडचिडे होतात, त्यांना राग येऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?
 
ज्या लोकांना ही डिसऑर्डर असते त्याला मिसोफोनिया म्हणतात.
 
मिसोफोनिया काय आहे?
मिसोफोनिया ही स्थिती राग, चिंता आणि घृणेशी जोडली जाते.
 
मिसोफोनिया ही एक मज्जासंस्थेशी निगडित डिसऑर्डर आहे. कोलाहलाची किंवा गोंगाटाची घृणा असं त्याला म्हणता येईल.
 
या स्थितीत काही विशेष आवाज किंवा त्या संबंधी गोष्टी-वस्तूंबद्दल तुमची सहनशीलता कमी होते. त्यामुळे व्यक्तीला राग येऊ लागतो, भीती-चिंता वाटू लागते.
 
एका सेकंदाच्या हजाराव्या भागापेक्षाही कमी कालावधीत हे आवाज तुमच्या मेंदूला काहीतरी चुकीचं आहे असा संदेश देतात.
 
हे आवाज एका संकटाच्या रुपाने तुमच्या मेंदूतल्या अलार्म सिस्टिम 'अमिग्डला'ला जागं करतात.
 
त्याला प्रतिक्रिया द्यायला तात्काळ अॅड्रिनल ग्रंथी आण कॉर्टिसोल हार्मोन सज्ज होतात.
 
सामान्य व्यक्तीसाठी एरव्ही हे आवाज कधीही धोकादायक नसतात.
 
किती लोकांना याचा त्रास होतो हे माहिती नाही, मात्र ओसीडी म्हणजे मंत्रचळ, टिनिटस म्हणजे कानात विचित्र आवाज येत राहाणं, हायपरेक्युसिस म्हणजे सामान्य पातळीचा आवाजही मोठा ऐकू येणं, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, सेन्सरी प्रोसेसिंग डिसॉर्डर अशा आजारांनी-मानसिक अवस्थांनी त्रस्त असणाऱ्यांमध्ये मिसोफोनिया असणं अगदी सामान्यच आहे.
 
हे का होतं याचं कारण आजही स्पष्ट नाही. मात्र ही स्थिती मेंदू किंवा मनोविकाराशी जोडलेली असू शकते असं शोधकांचं म्हणणं आहे.
 
किंग कॉलेज लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासात या स्थितीची लक्षणं ब्रिटनमध्ये 18.4 टक्के लोकांत दिसून आली. म्हणजे प्रत्येक पाच लोकांत एका व्यक्तीला इतरांच्या खाण्याचा आवाज, च्युइंगम चघळणं किंवा घोरण्याच्या आवाजाचा त्रास होतो.
 
लेखिका डॉ. सिलिया व्हिटोरतौ सांगतात, बहुतांशवेळा मिसोफोनियाग्रस्त व्यक्तीला आपण एकटं पडल्याचं वाटतं. मात्र वास्तविक स्थिती अशी नाही. ती लक्षात घेऊन आपल्या जीवनाशी तिचा ताळमेळ लावला पाहिजे.
 
मिसोफोनियाचा रोजच्या जगण्यावर परिणाम
केंट इथल्या ओलाना टॅन्सली हँकॉक सांगतात, की त्यांना मिसोफोनियाची लक्षणं वयाच्या 8व्या वर्षापासून जाणवतात.
 
त्या सांगतात, "मला श्वासांचा आवाज, खाताना होणारा आवाज, सुक्या पाचोळ्यातून किंवा कागदाचा होणारा आवाज ट्रिगर करतो."
 
ओलाना सांगतात, "हे आवाज आले तर ते तात्काळ थांबावेत यासाठी मी प्रयत्न करते किंवा तिथून दूर जाते. मी दीर्घकाळ सिनेमागृहांत जाणं टाळलं. मी फक्त तीन महिन्यात नोकरी सोडली. पण हळूहळू या प्रकाराला कसं हाताळायचं हे लक्षात आलं आणि मी आता इअरप्लग वापरते."
 
जाणकार काय सांगतात?
जाणकारांच्यामते मिसोफोनियाचा त्या व्यक्तीच्या नातेसंबंधावर आणि लोकांमध्ये मिसळण्यावर फार गंभीर परिणाम होतो. जर लहान मुलांमध्ये याची लक्षणं दिसत असतील तर त्या मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, ती मुलं शाळेत जाणं टाळू लागतात.
 
या स्थितीत कोणत्याही व्यक्तीबरोबर वेळ घालवणं एक आव्हान होऊन बसतं. समोरच्या व्यक्तीने केलेल्या आवाजांना ते सहन करू शकत नाहीत.
 
समोरची व्यक्ती याबद्दल अनभिज्ञ असताना त्यांना हा त्रास होतोय असं सांगितलं तर गोंधळ उडू शकतो, वाद होऊ शकतात. नाराजी ओढावली जाते.
 
अशीच एक स्थिती अमेरिकेत मिसोफोनिया थीम असणाऱ्या पॉडकास्टचे चालक अदिल अहमद यांच्याबरोबर उद्भवली होती. त्यांना मिसोफोनियाचा त्रास होतो. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "कधीकधी आमच्यासारखे लोक अशा वळणावर येऊन पोहोचतात की त्यांचे आईवडीलही दुरावतात. कारण त्यांच्याकडून कळत नकळत होणारे आवाज आम्हाला त्रास देतात हे त्यांना माहिती नसतं."
 
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. जॉन ग्रेगरी सागतात, "या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश ‘फाइट किंवा फ्लाइट’ अशी निती दिसून येते. म्हणजे हे लोक परिस्थितीशी झगडतात तरी किंवा ते तिथून निघून तरी जातात."
 
न्यू कॅसल विद्यापीठाचे डॉ. सुखविंदर कुमार बीबीसीशी बोलताना म्हणाले, "जेव्हा मिसोफोनिया रुग्ण असे आवाज ऐकतात तेव्हा ते अचानक जास्तच सक्रीय होतात. त्यांना राग येऊ लागतो. हे आवाज तसे सामान्यच असतात पण या रुग्णांना ते जास्त सक्रीय करतात."
 
मिसोफोनियाचं मुख्य लक्षण
यात कानाची आवाज ऐकण्याची सहनशीलता कमी होते आणि एक नकारात्मक प्रतिक्रिया देणं हे त्याचं मुख्य लक्षण आहे.
 
श्वास घेणं किंवा दुसऱ्या व्यक्तीनं खाताना केलेला सततचा आवाज मिसोफोनिया असलेल्या व्यक्तीमधील लक्षणं एकदम ट्रिगर करतात.
 
साधारणतः श्वास घेणं, खातानाचे आवाज याने त्यांना त्रास होतो. माणसानं केलेल्या आवाजानंच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आवाजानेही त्रास होतो आणि ते लोक तिथून लगेच बाजूला जातात.
 
तेे आपले कान झाकून घेतात आणि या आवाजामुळे राग येतो आणि त्याना पॅनिक अटॅकही येतो.
 
अदिल अहमद सांगतात, हे आवाज श्वासोच्छवासाचे असोत वा खाण्याचे मी ते सहनच करू शकत नाही. त्याने राग येतो आणि मी तिथून दूर जातो.
 
अर्थात समोरच्या व्यक्तीला आम्हाला याचा त्रास होतो हे माहिती असेल तर त्यामुळे आमच्यावरचा ताण थोडा कमी होतो.
 
मिसोफोनिया बरा होऊ शकतो का?
संशोधकांना आतापर्यंत मेंदूला असं ट्रिगर करणाऱ्या आवाजांना थांबवण्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या काही उत्तर सापडलेलं नाही.
 
अर्थात, नजिकच्या काळात मिसोफोनियावर कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे सीबीटीनं उपचार करण्याचे प्रयत्न मनोविकारतज्ज्ञांनी केलेले आहेत.
 
यासाठी 90 व्यक्तींवर उपचार करण्यात आले त्यातील 42 टक्के लोकांमध्ये सुधारणा दिसून आली. याला आणखी एक पर्याय आहे मात्र तो प्रमाणित नाही. यात ऑडिओलॉजिस्टकडून टिनिटस रिट्रेनिंग थेरपी केली जाऊ शकते. भारतात याचा किती लोकांना त्रास होतो याची आकडवारी उपलब्ध नाही मात्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पिच अँड हिअरिंगच्या ऑनलाइन सर्वेक्षणानुसार 15.85 टक्के लोकांमध्ये अशी लक्षणं आढळली.
 









Published By- Priya Dixit