1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (20:29 IST)

या देशात पुरुष लिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले; एका दशकात 6,500 रुग्णांचे लिंग काढले

cancer
2018 मध्ये जोआओ यांना लिंगावर (पेनिस- Penis) वर चामखीळ झाल्याचं दिसलं. ते तातडीने डॉक्टरकडे गेले. जोआओ पेन्शनर आहेत.“हा सगळा प्रकार समजून घेण्यासाठी मी डॉक्टरकडे जाऊ लागलो. मात्र सर्व डॉक्टरांनी मला सांगितलं की हे लिंगावरील अतिरिक्त त्वचेमुळे झालं आहे आणि मला औषधं दिली.”असं 63 वर्षीय जोआओ सांगत होते.
 
औषधं घेतल्यावरही ती चामखीळ वाढतच राहिलं. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. त्यांच्या लैंगिक आयुष्यावरही परिणाम झाला. ‘आम्ही अगदी बहीण भावासारखे राहू लागलो.’ ते सांगतात. या समस्येचा माग घेण्याचं त्यांनी ठरवलं.
जोआओ (नाव बदलण्यात आलं आहे) पाच वर्षं वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जात राहिले. त्यांनी औषधं दिली आणि बरेचदा बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. ‘कशानेच काहीही फरक पडला नाही.’ ते म्हणाले.
2023 मध्ये त्यांच्या आजाराचं निदान झालं- जोआओ यांना पेनाईल म्हणजे लिंगाचा कॅन्सर झाला होता.
“माझ्या कुटुंबासाठी हा धक्का होता. कारण माझ्या लिंगाचा काही भाग काढून टाकावा लागणार होता त्यामुळे त्यांना आणखीच धक्का बसला. माझा कोणीतरी शिरच्छेद केल्यासारखं मला वाटलं.” ते म्हणाले.
 
“हा अशा प्रकारचा कॅन्सर आहे ज्याबद्दल तुम्ही बोलूही शकत नाही कारण लोक त्याची खिल्ली उडवतात.”
लिंगाचा कॅन्सर दुर्मिळ आहे, मात्र या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूदरात जगभर वाढ होत आहे.नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जोआओ राहत असलेल्या ब्राझीलमध्ये या कॅन्सरचं प्रमाण 1 लाख लोकांमध्ये 2.1 इतकं आहे.
 
‘शस्त्रक्रियेची भीती’
ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2012 ते 2022 या कालावधीत या कॅन्सरच्या 21,000 केसेस नोंदवल्या गेल्या. त्यापैकी 4,000 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दशकात 6,500 रुग्णांचं लिंग काढावं लागलं आहे. म्हणजे दिवसाला सरासरी दोन इतका हा दर आहे.
मॅरान्योहो हे ब्राझीलमधील अतिशय गरीब राज्य आहे. तिथे हा कॅन्सर होण्याचा दर सर्वाधिक आहे. 1लाख लोकांमागे मागे 6.1 इतका हा दर आहे.
लिंगावर फोड येणे हे या कॅन्सरचं पहिलं लक्षण आहे. तो फोड बरा होत नाही आणि त्यातून तीव्र दुर्गंधी असलेला स्राव निघतो. काही लोकांना रक्तस्राव होतं आणि लिंगाचा रंगही बदलतो.
जर लवकर निदान झालं तर हा कॅन्सर बरा होऊ शकतो. फोड शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे, रेडिओथेरपी आणि केमोथेरपी या अन्य उपचारपद्धती आहेत.
मात्र उपचार केले नाहीत तर, लिंगाचा काही भाग काढणे किंवा पूर्ण लिंग काढणे, तसंच वृषणासारखे इतर गुप्तांग काढून टाकणे अत्यावश्यक ठरते.
जोआओ यांच्या लिंगाचा काही भाग काढून टाकावा लागला आणि हा काळ अतिशय कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं.
“असं काही होईल याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. जेव्हा हे होतं तेव्हा तुम्ही लोकांना जाऊन सांगू शकत नाही.” ते म्हणाले.
“मला शस्त्रक्रियेची खूप भीती वाटत होती. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता. शस्त्रक्रिया झाल्यावर पहिले काही आठवडे अतिशय खिन्न वाटलं, मी ते नाकारणार नाही. तुमच्या लिंगाचा काही भाग नसणं हे भीषण आहे.”
काही रुग्णांचं लिंग काढून टाकावं लागतं. त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलतं.
 
साओ पावलो येथील एसी कॅमरगो कॅन्सर सेंटरमधील मूत्ररोग विभागाचे थिअगो, कामेलो मुराओ म्हणाले, “लिंगाचा काही भाग काढून टाकला तरी लिंगातूनच मूत्रविसर्जन होऊ शकते. मात्र संपूर्ण काढून टाकलं तर युरेथ्रल ऑरिफिस म्हणजे मूत्रमार्गाचं छिद्र पेरिनिअम भागात न्यावं लागतं. वृषणं आणि मलछिद्र यांच्यामध्ये हा भाग असतो. त्यामुळे पुरुषांना बसून मूत्रविसर्जन करावं लागतं.”
 
ब्राझिलियन सोसायटी ऑफ युरॉलॉजीचे मॉरिशिओ डेनेर कोर्डिओ म्हणाले की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (हे विषाणूंच्या एका गटाला दिलेले नाव आहे) चा वारंवार संसर्ग हेसुद्धा या कॅन्सरचं एक कारण आहे.” HPV लैंगिक संबंधांमुळे पसरतो आणि काही केसेसमध्ये तोंडाचा आणि लिंगाचा कॅन्सर होतो.
 
ते म्हणतात, “HPV ची लस घेतली तर फोड येत नाही.” मात्र परिणामकारकता दिसून येण्यासाठी जितका दर पाहिजे तितका लसीकरणाचा दर ब्राझीलमध्ये नाही.
“ब्राझीलमध्ये उपलब्धता असुनही HPV च्या लसीकरणाचं प्रमाण मुलींमध्ये अतिशय कमी आहे.फक्त 57 टक्के मुलींना ही लस दिली जाते. मुलांमध्ये हे प्रमाण 40 टक्क्यांच्यावरही जात नाही. “हा रोग टाळण्यासाठी लसीकरणाचं प्रमाण 90 टक्के हवं.”
त्यांच्या मते लसीकरणाची चुकीची माहिती, त्याच्या परिणामकारकतेबद्दल असलेल्या शंका आणि लसीकरण शिबिरांचा अभाव यामुळे कमी संख्येने लोक लस घेत आहेत.
युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या वेबसाईटनुसार, धुम्रपानामुळेही लिंगाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. जर लिंगावरची त्वचा मागे ओढण्यास त्रास होत असेल आणि लिंग स्वच्छ ठेवण्यास त्रास होत असेल (फायमॉसिस) तरीसुद्धा हा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.

“जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या लिंगाच्या समोरचा भाग स्वच्छ करता येत नसेल किंवा लिंगावरची त्वचा स्वच्छ करता येत नसेल तर त्यामुळे एक स्राव तयार होतो आणि तो साचतो.” असं डॉ. कॉरडिरो सांगतात. “यामुळे जीवाणूंच्या संसर्गासाठी अतिशय पोषक वातावरण तयार होतं.” ते सांगतात.
“ हे वारंवार होत राहिलं तर ट्युमर होण्याचा धोका बळावतो.”
मात्र फक्त ब्राझीलमध्ये या कॅन्सरचं प्रमाण वाढत नाहीये. नुसत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जगभरात या कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत.2022 मध्ये जेएमआयर पब्लिक हेल्थ अँड सर्व्हिलंस या जर्नलमध्ये 43 देशातून घेतलेल्या माहितीवर आधारित एक विश्लेषण प्रकाशित झालं आहे.
 
युगांडामध्ये 2008 ते 2012 या काळात लिंगाच्या कॅन्सरचं प्रमाण 1लाख लोकांमागे 2.2, ब्राझीलमध्ये 1 लाख लोकांमागे 2.1, थायलंडमध्ये 1लाख लोकांमागे 1.4 इतकं होतं. तर कुवैतमध्ये सर्वांत कमी म्हणजे 1लाख लोकांमागे 0.1 इतकं होतं.
“विकसित देशांमध्ये लिंगाच्या कॅन्सरचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त असलं तरी युरोपियन देशातही या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय.” असं एका संशोधनात समोर आलं आहे. चीनमधील सुन -यात -सेन विद्यापीठातील लिवेन फू आमि तियान तियान यांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
इंग्लंडमध्ये 1979 ते 2009 या काळात इंग्लंडमध्ये हे प्रमाण 1लाख लोकांमध्ये 1.1 पासून ते 1.3 वर आलं आहे. जर्मनीतही 1962 ते 2012 या काळात 1लाख लोकांमध्ये 1.2 पासून 1.8 इतकं आलं आहे. या प्रमाणात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ग्लोबल कॅन्सर रजिस्ट्री प्रेडिक्शन टूल च्या अंदाजानुसार ही आकडेवारी वाढतच राहणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत जागतिक पातळीवर हे प्रमाण 77 टक्क्यांनी वाढणार आहे.
हा बदल बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांमुळे झाला आहे. तज्ज्ञांच्या मते वयाच्या साठीत हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो.
डॉ. कॉरडेरिओ म्हणाले, “लिंगाचा कर्करोग हा दुर्मिळ आजार आहे पण तो टाळता येऊ शकतो.”
 
त्यांच्या मते सेक्स करताना काँडोमचा वापर करणे आणि लिंगावरची त्वचा काढण्याची शस्त्रक्रिया करणे यामुळे लिंगाचा कॅन्सर टाळता येऊ शकतो.
 
फ्रिमले हेल्थ एनएचएस फाऊंडेशनच्या युरॉलॉजी विभागाचे क्लिनिकल लीड नाईल बार्बर म्हणाले, “सुंता केलेल्या लोकांमध्ये हा कॅन्सर अजिबात आढळत नाही. स्वच्छतेचा अभाव, फोरस्किनच्या खाली संसर्ग, फायमॉसिस यामुळे फोरस्किन मागे नेण्यास त्रास होतो. त्यामुळे एकूणच संसर्गाचा धोका वाढतो.”
“असुरक्षित सेक्स, काँडोम न वापरणे, अस्वच्छता यामुळे धोका आणखीच वाढतो.”
जोआओ त्यांच्या चाचण्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत. यावर्षाच्या शेवटी त्यांना ते मिळतील. “मला विश्वास आहे की माझा कॅन्सर बरा झाला आहे असंच चाचण्यांमध्ये दिसेल.” ते म्हणतात.

“आता काही भाग काढून टाकल्यामुळे वेदना कमी झाल्या आहेत आणि आता मला बरं वाटतंय. मात्र माझ्या लिंगाचा काही भाग काढण्यात आला आहे. हे वास्तव सोबत घेऊन मला जगावं लागेल.”
युकेच्या कॅन्सर रिसर्चनुसार, 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोक ज्यांना या कॅन्सरचं निदान झालं आहे, तो कॅन्सर जर लिंफ नोडपर्यंत पसरला नसेल तर पाच किंवा अधिक वर्षं जगतात.
(बीबीसी ब्राझीलच्या रोन कार्व्हालो यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)
 
Published By- Priya Dixit