शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:46 IST)

Squid Game : रक्तरंजित वेबसीरिज वा गेम्सचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो?

औरंगाबादमधली घटना...अल्पवयीन मुलाने प्राध्यापकांचा खून केला आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या गोष्टी म्हणजेच पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. ही कल्पना सुचली... क्राईम वेबसीरिजवरून
 
गेला महिनाभर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू आहे...स्क्विड गेम या नेटफ्लिक्स सीरिजची. वरवर पाहता लहान मुलांचे खेळ असणारी एक स्पर्धा. फरक एकच - हरला तो मेला.
 
अशा वेबसीरिज असो वा मग पब्जी, फोर्टनाईट, कॉल ऑफ ड्यूटीसारखे गेम्स... या सगळ्याचा मुलांच्या मनावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
हे खरंच वेळ घालवण्यासाठी केलेला टाईमपास किंवा मनोरंजन इतपतच मर्यादित राहतं की आपल्या रोजच्या आयुष्यावर याचा काही परिणाम होतो?
 
पडद्यावरची हिंसा आणि परिणाम
याविषयी बोलताना ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात, "या सीरिज पाहणाऱ्या किंवा गेम्स खेळणाऱ्या मुलांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांची इमोशनल किंवा सोशल मॅच्युरिटी म्हणजे समज प्रगल्भ झालेली नसते. बाहेरच्या जगात घडणाऱ्या गोष्टींचा External Stimulus चा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम होत असतो.
 
या घडामोडी त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. हे चूक किंवा बरोबर, हिंसा कितपत योग्य याचं विश्लेषण करण्याची प्रवृत्ती तेवढी विकसित झालेली नसते. तेवढा अनुभव पाठीशी नसतो.
"यासगळ्याचा परिणाम म्हणून इमोशनल कंट्रोल म्हणजे आपल्या भावनांवरचा ताबा त्यांच्या हातातून जातो. सततच्या गेमिंगमुळे मुलं आभासी जगात शिरतात. त्यांचा वास्तविक जगाशी संबंध तुटतो.
 
खऱ्या जगामध्ये त्यांना कमिटमेंट कळतात, जबाबदारी कळते, आदर, प्रेमाची भाषा कळते. आभासी जगात यातलं काही नसतं. त्या आभासी जगात दाखवलं जाणारं कॅरेक्टर महत्त्वाकांक्षी असतं आणि हिंसेच्या जोरावर ते सगळं मिळवत असतं.
 
मुलं या कॅरेक्टरशी एकरूप होतात आणि आभासी जगातली आणि खऱ्या जगातली रेषा धूसर होते. यातून मुलं हिंसा शिकतात."
 
जगण्यासाठी वा एखादी गोष्ट करण्यासाठी लायक नसाल, तर मरा असा एक संदेश यातून जातो आणि यातून हिंसेच्या, आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
गेममधलं पात्र हे जिवंत राहण्यासाठी, जिंकण्यासाठी खेळत असतं. त्यासाठी ते अडथळे पार करतं - स्वतःकडच्या शस्त्रांचा वापर करतं. हिंसा वा बळजबरीच्या जोरावर सर्व काही मिळवता येतं असा समज यातून निर्माण होतो आणि अपयश वा नकार पचवण्याची क्षमता कमी होते. लहानशा गोष्टीसाठीही मुलं अस्वस्थ होतात, चिडचिड करू लागतात.
 
पौगंडावस्था आणि प्रक्षोभक मजकूर
पौगंडावस्थेत शरीरात आणि परिणामी मनामध्ये होणारे बदल, वेबसीरिज आणि गेम्सनी उभं केलेलं आभासी जग आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या मर्यादा या सगळ्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर दिसून येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, "मुलांमध्ये एक बंडखोर वृत्ती असते. या सगळ्या गोष्टींच्या भडिमारामुळे याला चालना मिळते. अशात कोणी आपल्याला नाही म्हटलं, दबाव आणला, सल्ले दिले तर त्यांना ते आवडत नाही. भावना आवरता न आल्याने अगदी लहानशी ठेच जरी लागली तरी ही मुलं पेटून उठतात. मग कोणतीही मर्यादा उरत नाही."
"या सगळ्याचा परिणाम म्हणून एका क्षणाला मुलं एक्साईट होतात. उद्दीप्त - बेभान होतात. त्यात रमतात. हा तो गट आहे जिथे करियर, रिलेशनशिप काहीच सेटल नसतं.
 
आपली एनर्जी वळवण्यासाठीचा दुसरा मार्ग नसतो. सतत कोणती तरी एक्साईटमेंट हवी असते. उत्सुकता असते. यातून मुलं भावनिक दृष्ट्या भरकट जातात. जवळपास व्यसनांसारख्या पातळीला या गोष्टी पोहोचतात.
 
डॉ. श्रृती पानसे सांगतात, "मूल साधारण 14 वर्षांचं झाल्यानंतर पालकांचा तितकासा कंट्रोल राहात नाही. ते तुम्ही सांगितलेली गोष्ट ऐकतीलच असं नाही.
 
सेक्सची चुकीची ओळख
या सीरिज आणि गेम्समधून हिंसेसोबतच आणखी एका गोष्टीशी मुलांची ओळख होते. ती म्हणजे - सेक्स.
 
मानवी आयुष्यातल्या हळुवार आणि महत्त्वाच्या अनुभवाची अशा प्रकारे ओळख होणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. यातून अर्धवट माहिती मुलांपर्यंत पोहोचते आणि कुतुहल जागृत झाल्याने ते शमवण्यासाठी वेगळे मार्ग शोधले जाण्याची शक्यता निर्माण होते.
 
मुलांच्या मेंदूचा विकास आणि त्यांची वागणूक याविषयीचा अभ्यास असणाऱ्या डॉ. श्रृती पानसे सांगतात, "शोमध्ये पाहिलेल्या गोष्टी आपण करून पाहू शकतो अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते. मध्यंतरी माझ्याकडे एका टीनएजर मुलीचे आईबाबा आले होते.
 
या मुलीच्या मैत्रिणींनी स्लीपओव्हरच्या वेळी मुलीमुलीच आहोत म्हणून काहीतरी लैंगिक कृती तिच्यावर करून पाहण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांनी स्क्रीनवर पाहिला होता. पण यातून त्या मुलीच्या मनात इतकी भीती निर्माण झाली की ती एक क्षणही एकटी रहायला तयार नव्हती."
 
डॉ. पारकर म्हणतात, "खऱ्या आयुष्यात या गोष्टींवर बाहेरच्या जगाचं नियंत्रण असतं. इथे मुलं हे सगळं बघतात आणि त्या कुतुलहालतून गोष्टी करून पाहिल्या जातात. अनेकदा आपण करतोय हे चूक आहे, याची जाणीवही त्यांना नसते. ही मुलं गुन्हेगार नसतात, ती प्रयोग करून पाहत असतात. शिवाय हे करताना आपण सामाजिक चौकट मोडून काहीतरी बंडखोरी करतोय अशी एक भावना असते. ही शोधक प्रवृत्ती, बंडखोरी ते एन्जॉय करायला लागतात. याचे गंभीर परिणाम त्यांना माहितच नसतात. कारण ते त्यांना कोणी सांगितलेले नसतात."
 
पालकांनी काय करायचं?
पालकांसाठी ही परिस्थिती हाताळणं चकवा देणारं असतं.
 
टीनएजर मुलाच्या आई अनन्या सावे सांगतात, "सगळ्या पालकांना आपलं मूल स्मार्ट हवं असतं, जुगाडू हवं असतं आणि शहाणंही हवं असतं. म्हणजे कोणीही यावं आणि टपली मारून जावं, असं आपल्या मुलाबाबत होऊ नये असं सगळ्यांना वाटतं. पण मग तोच स्मार्टनेस जेव्हा त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरत्र वापरला जातो, तेव्हा कोड्यात पडायला होतं. अशावेळी परिस्थितीनुसार रिअॅक्ट होणंच योग्य असतं."
 
डॉ. पारकर सांगतात, "मुलांचं फ्रेंड सर्कल पहावं. कारण जर घोळक्यातच मिळून हे सगळं केलं जात असेल तर एकमेकांना जाब विचारला जात नाही किंवा चूक दाखवली जात नाही. कारण सगळेच ते करत असतात."
 
पण मग ही सगळी परिस्थिती उद्भवण्यामध्ये दोष कोणाचा? हे टाळणं कुणाच्या हातात असू शकतं?
 
डॉ. पारकर म्हणतात, "कोणतंही मूल वाईट नसतं. पण त्याक्षणी त्यांचा कंट्रोल राहात नाही आणि टोक गाठलं जातं. म्हणून तुमची मुलं काय पहातायत, कोणाबरोबर पहातात, त्यांच्या रिअॅक्शन्स काय आहेत, यावर आधीपासून लक्ष ठेवा. कारण मुलं जेव्हा आक्रमक व्हायला लागतात - शाब्दिक रूपाने किंवा भावंडांमध्ये, त्यांच्यात जबरदस्त बदल होतो, हा तेव्हाच लक्षात घेतला गेला पाहिजे. "
 
मुलांना कमी वयातच एखाद्या छंदात, खेळात रमवणं, त्यांच्यातल्या ऊर्जेला चालना देणं महत्त्वाचं ठरतं. यासगळ्यासोबतच लहान वयातच मुलांसोबत मोकळेपणाने संवाद सुरू करणंही महत्त्वाचं ठरतं. मोठं झाल्यावर मुलांसाठी एखाद्या अवघड क्षणी असे पूर्वीचे संवाद निर्णायक ठरू शकतात.

अनन्या सावे सांगतात, "गेल्या वर्षी जेव्हा नेटफ्लिक्सने 2 दिवस फ्री स्ट्रीमिंग दिलं तेव्हा त्याच्या सगळ्या मित्रांनी मिळून एक सीरिज पहायची ठरवली. आम्ही नेहमी मोकळेपणाने गप्पा मारत असल्याने त्यान अगदी सहजच तोही सीरिज पाहणार असल्याचं आम्हाला सांगून टाकलं. पण ती त्याच्या वयासाठी योग्य नसल्याचं समजावून अजून काही वर्षांनी ती एकत्र पहायचं ठरवल्यावर त्याला ते पटलं.
 
आता आम्ही काही गोष्टी एकत्र पाहातो. त्यातली काही दृश्यं किंवा विनोद आम्हाला न पटणारे असतील तर त्यामागचं कारणही आम्ही त्याला सांगतो. आम्ही पूर्णवेळ त्याच्यासोबत नसतो किंवा त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. पण कदाचित चांगल्यावाईटाची जाणीव आधीपासून करून दिल्याने कठीण क्षणी निर्णय घेणं सोपं होईल."
 
डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, "अनेकदा पालकांच्या मनात अपराधीपणाची मोठी भावना असते. त्यांना वाटतं मूल हातातनं गेलं आणि ते अचानक मुलांना कंट्रोल करायला सुरुवात करतात. अशावेळी संयम बाळगणं गरजेचं आहे. मुलांना समजवून द्या. इतर मुलांच्या पालकांसोबत बोलून ते काय करतायत जाणून घ्या. मुलं कोणत्या संगतीत आहेत, ते पहा. मुलांना सांगणं - बोलणं महत्त्वाचं आहे. लहान असताना मुलांना एखादं खेळणं दिलं नाही तर राग येतो, पण नंतर त्या गोष्टी समजतात. हे तसंच आहे.
 
डॉ. श्रृती पानसे सांगतात, "मुलांनी काहीतरी केलं तर तो संपूर्णपणे पालकांचा दोष आहे, असं मी म्हणणार नाही. किंवा पालकच तसे म्हणून मुलांनी असं केलं, असं म्हणणंही चूक ठरेल. पालकांचं लक्ष आहे का? असं म्हणणं सोपं आहे. पण ते योग्य नाही. कारण टेक्नॉलॉजी आणि परिस्थितीने गुन्हे करणं वा घडणं एकप्रकारे फार सोपं केलंय. पटलं नाही तर मारून टाका, दुसऱ्याचं जगणं अवघड करा, असं चित्र या सध्या निर्माण होतंय."
 
लहान असल्यापासून मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणं, चूक-वाईट दाखवून देणं, गरजेचं असेल तेव्हा मर्यादा घालून देणं यासगळ्यासोबतच मुलांमधली निर्णयक्षमता वाढवणं खूप महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मुलं त्यांच्या 'Me Time' मध्ये किंवा एकटं असताना काय करतात, काय करायला हवं यावर पालकांनी लक्ष द्यायची गरज असल्याचं, डॉ. पानसे सांगतात.
 
त्या म्हणतात, "पालकांनी सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवू नयेत. पण मूल जे करतंय त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याची जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं आहे."
 
टीनएजर मुलगी असणाऱ्या रुपाली गोरे सांगतात, "मुलं अगदी लहान असताना ती कार्टून्स बघतात, तेव्हा त्यातल्या कॅरेक्टर्ससारखी बोलायला लागतात, त्यातले शब्द - स्टाईल वापरतात. हे तसंच आहे. मुलं इम्प्रेशनेबल असतात...जे काही ती बघतात त्याच्या त्यांच्यावर परिणाम होतोच. म्हणूनच ती अडनिड्या वयात असताना त्यांच्यासमोर योग्य व्यक्तीचं उदाहरण असणं चांगलं ठरू शकतं.
 
वेबसीरिजच कशाला अगदी रोजच्या बातम्यांमधून न्यूज चॅनल किंवा वर्तमानपत्रांतूनही हिंसा मोठ्या प्रमाणात मुलांपर्यंत पोहोचत असते. तुम्ही त्यांना जगापासून झाकून दूर ठेवून शकत नाही. अशावेळी चूकबरोबर त्यांना सांगणं जास्त योग्य. एखादी गोष्ट करायची परवानगी इतरांना मिळाली असली तरी तुम्ही ती परवानगी का नाकारता आहात, याविषयी मोकळेपणाने बोलणं, तुमची भूमिका समजावून सांगणं महत्त्वाचं ठरतं."
 
अनन्या सावे म्हणतात, "त्या वयाची गरज समजून पालकांनी वागायला हवं. एखादी गोष्ट मागताना त्यामागचं कारण पालकांना व्यवस्थित मुद्दे मांडून पटवून देणं, आईबाबांनी विचारेल्लाय प्रश्नांची उत्तरं देत संवाद साधणं पालक आणि मूल दोघांसाठीही फायद्याचं ठरतं.
 
कारण हे करताना मुलांना चांगल्यावाईटाचा विचार करायची, समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय लागते. तू काय करतोयस, असं सतत विचारल्याने कदाचित मुलांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. अशावेळी तू विचारपूर्वक गोष्टी करशील, तुझ्या स्वातंत्र्याचा वाईट उपयोग करणार नाहीस याची खात्री आहे, असं त्यांना सांगणं जास्त योग्य."
 
मोठ्यांच्या मनावर काय परिणाम होतो?
मोठी माणसं एक करमणूक म्हणजे या सीरिज वा गेमिंगकडे पाहत असली तरी कुठे ना कुठे याचा परिणाम मनःस्थितीवर होतोच. या वयोगटासाठी काय खोटं, काय खरं हे समजणं सोपं असलं तरी यासगळ्याचा 'Emotional Intelligence' वर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
सतत हिंसक, आक्रमक व्हीडिओज वा सीरिज पाहिल्याने भावना बोथट होतात किंवा काही क्षणी त्या बेकाबू होतात आणि अपराध घडतो.
 
आपण एखाद्या प्रसंगाला कसं सामोरं जातं किंवा त्यावेळी कसं व्यक्त होतो यावर या सगळ्या गोष्टींचा कळतनकळत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.