गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (14:16 IST)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आता दात घासायचा ब्रश ओळखणार कॅन्सर, मधुमेह?

पीटर बॉल
सार्वजनिक ठिकाणांवर सुगंध राहावा म्हणून आपण अत्तर किंवा डिओड्रंटचा वापर करतो. मात्र हा सुगंध आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वापराने क्रांती आणणारा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
 
सुगंधाचे नवे प्रकार ओळखण्यासाठी आणि उत्पादनांची अधिक वेगानं निर्मिती करण्यासाठी सध्या बिग डेटा आणि सुपर-फास्ट कम्प्युटरचा वापर केला जात आहे.
 
AI चा वापर करून आता एक नवं तंत्र विकसित केलं जात आहे. त्यामुळं आजारांची लागण होण्याच्या सुरुवातीच्या काळात गंधापासून त्याची माहिती मिळेल. त्यामुळं निरोगी राहण्यात आणि जीवनमान वाढण्यात त्याची मदत होईल.
आपण वापरत असलेल्या अत्तराचा विषय असो की, आजारांवरील उपचारांचा. AI मुळं आपल्या भोवतालचं जग कशाप्रकारे बदललं आहे, हे या लेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
समस्यांचा गंध
फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट-अप 'अरिबाल' गंधांचं (वासांचं) विश्लेषण करण्याचं काम करतं. कोणत्या गंधांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, आणि ते आपल्या आरोग्याबाबत काय माहिती देऊ शकतात, याचा ते अभ्यास करतात.
खरं तर गंधांची जाणीव होणं, हे अत्यंत कठिण आहे. प्रकाश किंवा ध्वनीची विशिष्ट प्रकारची तरंगलांबी असते. पण ते मोजण्याची काहीही सोपी पद्धत नसते.
 
अरिबाल हे त्यासाठी सिलिकॉन चीपवर लावलेल्या प्रोटिनच्या तुकड्यांचा वापर अणुंचा गंध घेण्यासाठी करतं. त्याद्वारे ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साइडसारख्या अनेक वायूंच्या गंधाकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण आपण नाकाने त्यांचा गंध घेऊ शकत नाही.
 
"आपण गंधांचं वर्णन वैज्ञानिक पद्धतीनं करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे. त्यासाठी केवळ एक गोष्ट करावी लागेल. आपल्याला मशीनला, पनीर काय आहे, किंवा स्ट्रॉबेरी, रास्पबेरी काय आहे हे शिकवावं लागेल," असं कंपनीचे सीईओ सॅम गिलॉम म्हणाले.
 
आपण ज्या ठिकाणी राहतो, त्याठिकाणावर निगराणीसाठी या तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. यामुळं आपल्याला वर्दळीची ठिकाणी अधिक उत्तम बनवण्यासाठी मदत मिळेल. आता तर लोक साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठीही अधिक जागरुक होत आहेत.
 
गंधांची अधिक माहिती मिळाल्यानं आपल्या जीवनावर अधिक परिणाम होऊ शकतो. गंधांच्या माध्यमातून अनेक आजारांची माहिती मिळू शकते, याबाबत आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे. गेल्यावर्षी फिनलँडची राजधानी हेलसिंकीच्या विमानतळावर कोरोनाग्रस्तांना ओळखण्यासाठी श्वान तैनात करण्यात आले होते. गर्दीतील लोकांपैकी कुणाला कोरोनाची लागण झाली आहे, हे श्वान गंध घेऊन ओळखत होते.
 
या संकल्पनेचा वापर करून एखाद्या रोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखून आपल्या आरोग्यावर निगराणी ठेवण्यासाठी उपयोगी अशी उत्पादनं तयार केली जाऊ शकतात.
 
"एक दिवस असा असेल जेव्हा माझ्या ब्रशमध्ये लावलेलं गंधाचं सेन्सर माझ्या आरोग्याची माहिती घेऊ शकेल. माझ्यात मधुमेह, किंवा कॅन्सरची लक्षणं दिसत आहेत, असं सेन्सर सांगू शकतं, असं गिलॉम म्हणाले.
 
तसं झाल्यास, एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं ही लवकर लक्षात येऊन तो आजार बळावण्याआधी उपचार करून भविष्यातील त्रास कमी करण्यास मदत मिळू शकते.
''AI वर चालणारी 'डायग्नोस्टिक टूथब्रश' सारखी स्मार्ट उपकरणं लवकरच येणार आहेत. आता प्रश्न 'जर'चा नसून ही कधी येणार? हा आहे,'' असं गिलॉम म्हणतात.
 
गंध विज्ञान
याबरोबरच नवीन गंध विकसित करण्यासाठीही AI चा वापर केला जात आहे.
 
"मला अगदी चार वर्षींची असल्यापासून परफ्यूमचं वेड आहे. मी आईचा परफ्यूम चोरायचे आणि तिला ते लक्षातही यायचं," असं मारिया नुरिस्लामोव्हा सांगतात.

परफ्यूमबाबत असलेल्या या प्रेमापोटीच नुरिस्लामोव्हा यांना अमेरिकेत 'सेंटबर्ड' नावाचं स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. हे स्टार्टअप दर महिन्याला त्यांच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे परफ्यूम पाठवते. ''मात्र, तंत्रज्ञान हे माझं दुसरं प्रेम आहे," असंही त्या म्हणाल्या.
 
कंपनीनं जेव्हा महिला आणि पुरुष दोघांसाठी एकच अत्तर लाँच करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी त्यांच्या 3 लाख ग्राहकांच्या प्रतिक्रियांचं विश्लेषण करण्यासाठी AI चा वापर केला.
 
''बहुतांश अत्तरं ही पुरुष किंवा महिला यापैकी एकाच गटातील व्यक्तींना आवडत असतात. इतर लोकांना ते सहन करावे लागते, ही समस्या सोडवणं अत्यंत गरजेचं होतं,'' असं त्यांनी सांगितलं.
 
''त्यामुळं तटस्थ गंध (सुगंध) शोधणं कठिण आहे,'' असं त्यांचं म्हणणं आहे.
 
मात्र, त्यांनी संशोधन करून असे 12 नवीन सुगंध शोधले आहेत जे सर्वच लिंगांच्या व्यक्तींना आवडतात. त्यानंतर त्यांच्या कंपनीनं 'कन्फेश्नस ऑफ अ रिबेल' ब्रँड लाँच केला. त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या आघाडीच्या 3 टक्क्यांमध्ये याचा समावेश आहे.
 
"मी याला माझा विजय समजेल. त्याचं कारण म्हणजे, 'कन्फेश्नस ऑफ अ रिबेल' हा गुची किंवा वर्साशेसारखा प्रसिद्ध ब्रँड नाही. तरीही याला प्रचंड यश मिळालं. त्याचं श्रेय हे तयार करण्यासाठी मिळणाऱ्या डेटाला जातं," असं त्या सांगतात.
 
सेंटबर्ड आणखी नवीन सुगंध विकसित करण्यासाठी संशोधन करत आहे. त्यांनी यावर्षी दोन नवी उत्पादनं तयार केली आहेत. मात्र, आपली गंध घेण्याची पद्धत बदलण्यासाठी AI चा वापर होणारा हा एकमेव व्यवसाय नाही.
 
भावनिक परिणाम
इंटरनॅशनल फ्लेवर अँड फ्रग्रान्स (आयएफएफ) देखील परफ्यूम तयार करण्यासाठी AI चा वापर करते.
 
मात्र स्टोअरमध्ये या मल्टीनॅशनल कंपन्यांची नावं दिसणार नाहीत. या कंपन्या अरमानी, केल्वीन क्लेन आणि गिवेंचीसारख्या प्रमुख ब्रँड्ससाठी परफ्यूम तयार करतात.
 
आयएफएफला परफ्यूम तयार करण्याचा एक शतकाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तरीही केवळ 60 ते 80 वस्तुंचा वापर करून जवळपास 2,000 परफ्यूम तयार केले जातात. प्रत्यक्षात AI मुळं नवनिर्मितीची प्रकिया सोपी होण्यास मदत होते.
 
"AI एक उपकरण आहे. ते गुगल मॅप्ससारखं परफ्यूम तयार करण्याची गुंतागुंत कमी करतं. त्यामुळं त्याच्या कौशल्यावर लक्ष केंद्रीत करता येऊ शकतं" असं, आयएफएफच्या सेंट डिव्हीजनमध्ये संशोधन विभागाचे जागतिक प्रमुख वालेरी क्लाउड म्हणाले.
 
आयएफएफ परफ्यूम तयार करण्यापासून ते दैनंदिन आयुष्यातील वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी तयार करतं. त्यात वॉशिंग पावडर, फॅब्रिक सॉफ्टनर, शॅम्पू यांचाही समावेश आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात गरज भासलेली उत्पादनंही तयार केली आहेत.
 
"आता विषय 'क्लीन अँड फ्रेश' पेक्षा बराच पु़ढं गेला आहे. लोकांना आता अधिक देखभाल आणि सुरक्षा हवी आहे. त्यात त्यांना फार क्लिष्टता नको असते,'' असं क्लाउड म्हणाले.
 
कंपनी लोकांचे मूड आणि विचार लक्षात घेऊन फरफ्यूमचा विकास करत आहे. लोकांना आनंद, आराम आणि आत्मसन्मान मिळेल असे सुगंध विकसित करणं, हा याचा उद्देश आहे.
 
त्यांच्या एका संशोधनातून मेंदूविषयी समस्या असलेल्यांना मदत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
 
''तुम्ही अल्झायमरबद्दल विचार केला, तर उत्तेजना आणि सुगंध यात याची सकारात्मक भूमिका असू शकते, हे आपल्याला माहिती आहे. यामुळं उपचार होऊ शकत नाही. मात्र मेंदूला उत्तेजित करण्याचा त्याचा परिणाम नक्कीच कमी होऊ शकतो," असं वालेरी म्हणाले.