शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (17:17 IST)

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?

सुशिला सिंह
फेब्रुवारी महिना, वर्ष 2020. देशभरात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच घरापासून जवळपास 200 किलोमीटर लांब गुरुग्राममध्ये राहणाऱ्या प्रियंका यांच्या मनात वेगळीच घालमेल सुरू होती.
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या प्रियंका यांना एक दिवस त्यांच्या उजव्या ब्रेस्टमध्ये लम्प किंवा गाठ असल्याचं आढळून आलं. ती गाठ कडक वाटत होती.
त्यांनी मैत्रिणीला याबाबत सांगितलं आणि ती गाठ दाखवली. मैत्रिणीनं मासिक पाळी येईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला. पाळी येण्याच्या आधीही अशा गाठी येतात आणि नंतर त्या राहत नाहीत, असं मैत्रिणीचं म्हणणं होतं. पण मासिक पाळी येऊन गेली तरी गाठ कायम होती.
 
त्यामुळं अखेर 27 वर्षीय प्रियंका यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. ''अशा प्रकारची टेस्ट करणं सुरुवातीला अवघडल्यासारखं वाटलं. ही गाठ साधी असून निघून जाणारी असण्याची शक्यता 95 टक्के आहे. ही कँन्सरची गाठ नसावी, कारण तू खूप तरुण आहेस. पण तरीही अल्ट्रासाऊंड करून घे,'' असं डॉक्टरांनी सांगितल्याचं ती म्हणाली.
त्यानंतर बायप्सी करण्याचा सल्ला देण्यात आला आणि अखेर जी भीती होती, तेच घडलं.
चाचणीत कॅन्सरचं निदान
चाचणीनंतर ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं त्यांना समजलं. ''मला सेकंड स्टेज ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यात तीन प्रकारचे प्रोटिन रिलीज होतात. ते आक्रमक असतात, वेगानं पसरतात आणि पुन्हा तयार होण्याची शक्यता खूप जास्त असते. उपचारासाठी मला आधी किमोथेरपी करण्याचा आणि नंतर शस्त्रक्रियेद्वारे तो भाग हटवण्याचा सल्ला देण्यात आला,'' असं त्यांनी सांगितलं.
''मानसिकदृष्ट्या मी या आजाराशी सामना करायला सज्ज होते. पण मला आई-वडिलांचं टेन्शन होतं. त्यांना हे कसं सांगणार. हा माझ्यासाठी सर्वात कठीण काळ होता. ही साधी गाठ आहे, आपोआप निघून जाईल असं, त्यांना वाटत होतं '' असं प्रियंका म्हणाल्या.
"माझी आई आणि वडिलांसाठी हे सर्व अत्यंत कठिण होतं. कारण माझं लग्नही झालेलं नव्हतं. माझी ब्रेस्ट हटवावी लागेल असं सांगितलं तेव्हा त्यांच्या काहीही लक्षात येत नव्हतं. पण आईला परिस्थिती लक्षात येऊ लागली आणि, वडील तुम्हाला योग्य वाटेल ते करा, असं म्हणाले."
 
डॉक्टरांनी प्रियंका यांना त्यांचा कॅन्सर जेनेटिक (अनुवांशिक) आहे, असं सांगितलं.
माझ्या आईच्या कुटुंबामध्ये सहा जणांना कॅन्सर झाला होता. माझी आजीही त्यापैकी एक होती, असं प्रियंका म्हणाल्या.
20-30 वयातच मुलींना कॅन्सर
गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये तरुण महिलांमध्ये कॅन्सरची प्रकरणं अधिक समोर येत आहेत, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्समधील सर्जिकल ऑन्कलॉजी विभागातील प्राध्यापक डॉक्टर एसव्हीएस देव सांगतात.
''तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आढळणाऱ्या महिलांमध्ये 40 पेक्षा कमी वय असलेल्या महिलांचा समावेश आहे. त्यात सर्वात कमी वयाच्या महिला 20 ते 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्यात हा कॅन्सर आढळत आहे,'' असं ते सांगतात.
''सर्वात कमी वयोगटाबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्यात कॅन्सरची दोन ते तीन टक्के प्रकरणं आढळतात. तरुण वयोगटात हे प्रमाण 15 टक्के आहे, तर 40-45 वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं वाढून 30 टक्क्यांपर्यंत पोहोचतात. 44 ते 50 वर्षांच्या महिलांमध्ये अशी प्रकरणं 16 टक्के आढळतात," असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
 
पाश्चिमात्य देशांत महिलांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं आढळतात, तर 50-60 वर्षे वयाच्या महिलांमध्ये कॅन्सरची प्रकरणं वाढलेली दिसून येतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
आजच मी एका आई आणि मुलीची ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया केली आहे. आईचं वय 55 आणि मुलीचं 22 होतं. या दोघींनाही एकाच दिवशी ब्रेस्ट कॅन्सर असल्याबाबत समजलं होतं, असंही डॉक्टर देव यांनी सांगितलं.
डॉक्टर देवव्रत आर्य यांनीही याबाबत माहिती दिली. ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं पूर्वी 50-60 वय असताना समोर येत होती. मात्र, आता 20 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींमध्येही खूप प्रकरणं आढळत असल्यानं आम्हाला आश्चर्य वाटत आहे, असं ते म्हणाले.
डॉक्टर देवव्रत आर्य, मॅक्स रुग्णालयाच्या कॅन्सर केअर इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक आहेत.
 
त्यापूर्वी द गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेल्या डॉक्टर देवव्रत यांच्या संशोधनाचा विषयदेखील ब्रेस्ट कॅन्सर हाच होता.
''आकड्यांचा विचार करता 20-30 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं 5 ते 10 टक्के समोर येत आहेत,'' असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
डॉक्टर आर्य हे शक्यतो ब्रेस्ट कॅन्सर, हेड अँड नेक आणि लंग्ज कॅन्सरची प्रकरणं पाहतात.
आकडे काय सांगतात?
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)-नॅशनल सेंटर फॉर डिसिस इंन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (एनसीडीआयआर) नं नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम रिपोर्ट 2020 सादर केला होता. त्यानुसार 2020 मध्ये कॅन्सरची 13.9 लाख प्रकरणं समोर येतील असा अंदाज वर्तवला होता.
सरासरीचा विचार करता 2025 मध्ये हा आकडा 15.7 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली होती.
हा अंदाज लोकसंख्येच्या आधारवर तयार करण्यात आलेल्या 28 कॅन्सर उपचार केंद्र (कॅन्सर रजिस्ट्री) आणि रुग्णालयांच्या 58 कॅन्सर रजिस्ट्रींच्या आधारावर बांधण्यात आला आहे.
यानुसार महिलांमध्ये स्तन किंवा ब्रेस्ट कॅन्सरची 14.8 टक्के म्हणजे 3.4 लाख प्रकरणं असतील, असा अंदाज वर्तवला आहे.
साधारणपणे महिलांमध्ये ब्रेस्ट आणि सर्व्हिक्स यूटेरी कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणं समोर येतात. शिवाय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं वेगानं वाढत असल्याचंही पाहायला मिळालं आहे.
वय 31 वर्षे, गर्भावस्था आणि ब्रेस्ट कॅन्सर
दिल्लीत राहणाऱ्या अलिशा सहा महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांना ब्रेस्टवर एक गाठ असल्यासारखं दिसलं. त्यामुळं त्यांना संशय आला.
 
त्यांनी स्त्री रोग तज्ज्ञांना दाखवलं तर हे मिल्क ग्लँड (दुधाची ग्रंथी) असू शकतं असं सांगण्यात आलं. त्या सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या होत्या. त्यामुळं अशी गाठ तयार होऊ शकते असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळं त्या निश्चिंत झाल्या.
पण गाठ हळूहळू मोठी होत होती. आम्ही थोडे अधिक सजग होतो, कारण माझ्या आईलाही कॅन्सर होता. त्या गूगलवर सर्च करायच्या तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की, गर्भावस्थेच 99.9 टक्के कॅन्सर होत नाही. तसंच गर्भवती असताना अशी गाठ येऊ शकतं, असंही त्यांना समजल्याचं, बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं होतं.
मात्र, नववा महिना येईपर्यंत त्यांच्या काखेत आणि हातांमध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यांना ताप आला. ताप येणं चांगलं नाही, असं डॉक्टर म्हणाले. त्यामुळं त्यांची वेळेच्या आधी दोन दिवसांपूर्वीच प्रसूती करण्यात आली.
''मला मुलगा झाला आणि त्याला दूध पाजताना माझी गाठ काहीशी मऊ झाली. त्यामुळं ही दुधाचीच गाठ होती असंच मलाही वाटलं. पण 15 दिवसांत ही गाठ एवढी मोठी झाली की, माझ्या स्तनाचा दोन तृतीयांश भाग दगडासारखा बनला आणि दूध येणंही बंद झालं. त्यानंतर डॉक्टरांनी पुढच्या तपासणीचा सल्ला दिला,'' असं त्यांनी सांगितलं.
 
त्यावेळी त्या गुजरातमध्ये राहत होत्या आणि त्यांची आई दिल्लीत कॅन्सर पीडितांसाठी तयार करण्यात आलेल्या इंडियन कॅन्सर सोसायटी नावाच्या संस्थेत काम करत होती.
अलिशाच्या आईनं त्यांना दिल्लीला येण्याचा सल्ला दिला आणि त्या 40 दिवसांच्या बाळाला घेऊन दिल्लीला गेल्या.
तपासण्या केल्यानंतर आलिशा यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं लक्षात आलं. त्यांचा कॅन्सर थर्ड स्टेजच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता आणि बराच पसरला होता.
डॉक्टरांनी सर्जरीऐवजी किमोथेरपीचा सल्ला दिला. त्यांना सुरुवातीच्या सहा किमोथेरपी देण्यात आल्या आणि नंतर औषधं घेण्याचा सल्ला देण्यात आला.
''माझ्या छोट्या भावाचं लग्न होतं. माझे लांब केस अता राहिले नव्हते. त्यात दोन मुलं आणि कॅन्सर अशा परिस्थितीत मी प्रचंड घाबरलेली होते. मी विग परिधान केली आणि लग्नात सहभागी झाले,'' असं आलिशा त्या दिवसांच्या आठवणी सांगताना म्हणाल्या.
का वाढत आहेत प्रकरणं?
पण भारतात कॅन्सरची प्रकरणं का वाढत आहेत? भारताची लोकसंख्या वाढली आहे, तर त्या प्रमाणात प्रकरणंही वाढली आहेत. शिवाय तरुणांची लोकसंख्या अधिक असल्यानं त्यांची प्रकरणं समोर येत आहेत, असं डॉक्टर एसव्हीएस देव याबाबत म्हणाले.
पण कॅन्सर आणि लोकसंख्या यांचाच संबंध प्रमाण वाढण्यात आहे का?
खरं तर ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वीस वर्षांमध्ये 20 टक्के वाढ झाल्याचं कॅन्सर रजिस्ट्रीवरून स्पष्ट होत असल्याचं, याबाबत उत्तर देताना डॉक्टर देव म्हणाले.
''ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची नेमकी कारणं आम्हाला माहिती नाहीत. तरुणांमध्ये वाढण्याचं मुख्य कारण लाईफस्टाईल आहे. तर दुसरं कारण अनुवांशिक आहे. त्यात जर कुटुंबात आधी कुणाला कॅन्सर झालेला असेल, येणाऱ्या पिढ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते,'' असंही त्यांनी सांगितलं.
अगदी तरुण वयात म्हणजे, 20-30 वर्षाच्या वयात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं आढळण्याचं कारण लाईफस्टाईलपेक्षा अनुवांशिक हेच जास्त असल्याचं, डॉक्टर आर्य म्हणाले.
उदाहरण द्यायचं झाल्यास, हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जोली हिनं स्तन कॅन्सरच्या उपचारासाठी एक शस्त्रक्रिया केली होती. त्यामागचं कारण म्हणजे, त्यांच्या आईला कॅन्सर होता आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या आईचे जीन्स (जनुकं) आढळली होती. अनुवांशिकते संदर्भातील चाचणी केल्यावर त्यांनी दोन्ही स्तन हटवण्याचा निर्णय घेतला होता.
जर 20-30 वर्षाच्या मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं समोर येत असतील, तर त्यांच्या शरिरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
प्रजनन क्षमतेवर परिणाम
डॉक्टरांच्या मते कॅन्सरच्या उपचारावेळी होणाऱ्या किमोथेरपीचा परिणाम महिलांची फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो.
त्यामुळं महिला जर मुलं जन्माला घालू शकत असतील, तर किती वर्षांनी गर्भधारणा करणं सुरक्षित ठरू शकतं, याचा विचार उपचारादरम्यान केला जातो.
20-30 वर्षांचं वय असं असतं तेव्हा मुलींचं लग्न होणार असतं किंवा झालेलं असतं. ज्याचं लग्न झालेलं असतं त्यांची छोटी मुलं असतात किंवा ती दामप्त्य मुलांचा विचार करत असतात. त्यामुळं याचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
अशा परिस्थितीत उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाशी सविस्तर चर्चा केली जाते. संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला समजावून सांगितली जाते. कारण किमोथेरपीचा ओव्हरीज किंवा अंडाशयावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आम्ही त्यांना ओव्हरियन प्रिझर्वेशन किंवा ओव्हरींचं संवर्धन करण्याचा सल्लाही देतो. त्यामुळं जेव्हा रुग्ण दोन तीन वर्षांनी बरा होऊ लागतो, तेव्हा ते मुलांचा विचार करू शकतात.
तसंच महिला फारच तरुण असतील तर आम्ही ब्रेस्ट कंझर्व्हेशन सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करतो. ब्रेस्ट पूर्णपणे हटवलं जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
जेनेटिक टेस्टमध्ये महिला पॉझिटिव्ह आढळल्या आणि ब्रेस्टच्या दुसऱ्या भागाला काही झालेलं नसेल तरी आम्ही तो हटवतो कारण, जीन म्युटेशन होत असेल तर ही प्रकरणं पुन्हा उद्भवण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत महिला दोन्ही ब्रेस्ट हटवतात.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी?
स्तनामध्ये गाठ किंवा लंप असणं हे ब्रेस्ट कॅन्सरच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जर ब्रेस्टमध्ये अशाप्रकारची गाठ जाणवली तर लगेचच मेडिकल तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सूज आढळून आली तर, त्याबाबत बेजबाबदारपणा बाळगता कामा नये. ही सूज स्तनाच्या एका बाजुला किंवा पूर्ण स्तनाला असेल तर वेळीच काळजी घ्यावी.
स्तनाच्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला, म्हणजे त्याठिकाणी जळजळ होणं, लाल होणं किंवा त्वचा कडक होणं, त्वचेत बदल जाणवणं, त्वचा ओलसर वाटणं, असे फरक जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निप्पलमधून (स्तनाग्रे) पदार्थाचा स्त्राव होत असेल, किंवा ते आतल्या बाजूला जात असेल किंवा वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
अनेकदा महिलांना ही लक्षणं ओळखण्यात अडचणी निर्माण होतात. त्यांना लक्षणं नीट जाणवत नाहीत. लहान ट्युमर लक्षात येत नाही, तसंच अनेकदा मॅमोग्राफीमध्येही काही लक्षात येत नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा बदल किंवा वरील लक्षणं आढळली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
या वयात स्क्रिनिंग करण्याबाबत डॉक्टर देव नकार देतात. मात्र, याबाबत जेवढी जागरुकता पसरवली, ती कमीच असल्याचं ते सांगतात. कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तर लगेचच डॉक्टरांना दाखवावं. तसंच एखाद्याच्या घरात आधीची कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्यांना आम्ही 25 वर्षाच्या वयानंतर स्क्रिनिंग आणि जेनेटिक टेस्टिंगचा सल्लाही देतो.
प्रियंका आणि अलिशा कशा आहेत?
लॉकडाऊनच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रथम किमोथेरपी घेतली होती. किमो केलं त्या पहिल्या आठवड्यात एंझायटी, दिवसभरात 40 वेळा उलट्या होत होत्या. पण नंतर सर्व काही हळूहळू सर्वसामान्य होऊ लागलं.
''मला आठ वेळा किमो करावं लागलं आणि नंतर शस्त्रक्रिया केली. कारण कॅन्सर पसरण्याची भिती होती. दोन्ही ब्रेस्ट हटवण्यात आल्या आणि आता मी इम्प्लांट केलं आहे. ते दहा वर्षांपर्यंत तसंच राहील. मी बरी झाली आहे आणि काळजी घेत आहे,'' असं त्या म्हणाल्या.
अलिशा यांचा कॅन्सर किमोनंतर वाढला नाही. त्या सर्वसामान्य लोकांप्रमाणेच जीवन जगत आहेत. तसंच जी औषधं त्या घेत होत्या, तीदेखील आता बंद करण्यात आली आहेत.
''मी आता अधिक मजबूत आणि सकारात्मक आहे. तुम्हाला कॅन्सरशी युद्ध जिंकायचं असेल तर सकारात्मक आणि मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतं. आता कशाचीही भीती वाटत नाही,'' असं त्या म्हणाल्या.