रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (16:56 IST)

कोरोनाचा नेमक्याच लोकांना त्रास होतोय, जाणून घ्या कारण

coorna
जर आजच्या घडीला एखाद्याला कोरोना झाला तर...? मी या गोष्टीवर विचार करत होतो, पण माझ्या मित्राला याचं आश्चर्य वाटलं. कारण त्याला तिसऱ्यांदा कोरोना झाला होता.
"प्रत्येक वेळी तुम्ही या आजाराच्या विळख्यात येता, तेव्हा तो आधीपेक्षाही प्रभावी झालेला असतो."
 
माझ्या मित्राच्या आजारपणातून मला हा संदेश मिळाला होता.
 
कोरोनाची जेव्हा साथ आली, त्यावेळी या विषाणूबद्दल बरंच काही सांगितलं गेलं. पण मी ज्या लोकांना ओळखतो, असे माझे सहकारी किंवा शाळेच्या गेटवर गप्पा मारलेल्या लोकांना गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
 
यात बहुतांशी लोकांना एक आठवडा खोकला, डोकेदुखी किंवा ताप आणि त्यानंतर सतत थकवा येतो.
 
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, कोरोनामध्ये बरीच लक्षणं आढळून येतात. लस घेण्याआधी असे काही भाग्यवान लोक होते, जे क्वचितच आजारी पडले किंवा त्यांना लक्षणंही दिसून आली नाहीत.
 
आपल्यापैकी काहींना असं वाटतं की, कोरोना एक साधी सर्दी आहे.
 
परंतु रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये तज्ञ असलेल्या शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय की, कोरोनाचा विषाणू अजूनही घातक संक्रमण तयार करत आहे आणि त्यात होणारे बदल हे पूर्वीपेक्षाही वाईट असू शकतात. यामुळे तुम्ही किमान काही आठवडे तरी नक्कीच अंथरूण धरू शकता.
 
मग नेमकं चाललंय काय?
कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती कशी प्रतिसाद देते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
 
सुरुवातीचे टप्पे महत्त्वाचे असतात. कारण विषाणू आपल्या शरीरात किती खोलवर जातो आणि तो किती त्रासदायक आहे यावर बऱ्याच गोष्टी ठरतात.
 
मात्र, आता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागली आहे आणि विषाणू आणखीच विकसित होऊ लागलाय.
 
'खूप कठीण वाटतं आहे'
एडिनबर्ग विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट प्राध्यापक एलेनॉर रिले यांना देखील या विषाणूशी भयंकर मोठा लढा द्यावा लागला, तो अपेक्षेपेक्षा खूप वाईट होता.
 
त्या म्हणाल्या, "कोरोना आल्यानंतर लोकांमध्ये जी रोग प्रतिकारशक्ती होती ती या विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी नव्हती. लस घेतल्यानंतर भले ही ती वाढली असेल. पण कोरोनाच्या जीवाणूमध्ये होत असलेल्या म्युटेशनमुळे ती रोग प्रतिकारशक्तीही कमी पडत आहे."
 
अँटीबॉडीज या सूक्ष्म क्षेपणास्त्रांसारख्या असतात. त्या विषाणूच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात आणि आपल्या शरीराच्या पेशींना संक्रमित करण्यापासून थांबवतात.
 
म्हणून, जर तुमच्याकडे भरपूर अँटीबॉडीज असतील, तर त्या विषाणूवर त्वरीत हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करू शकतात. त्यामुळे झालेला संसर्ग हा तुलनेने सौम्य असेल.
 
प्राध्यापक रिले म्हणतात, "आता आपल्या शरीरात ऍन्टीबॉडीज कमी असल्यामुळे, विषाणू अधिक गंभीर रूप धारण करत आहे.
 
आपल्या शरीरात अँटीबॉडीची पातळी तुलनेने कमी आहे कारण आपल्यापैकी अनेकांना लसीकरण करून बराच काळ लोटला आहे. तरुण आणि निरोगी लोकांना दोन डोस आणि एक बूस्टर देण्यात आला होता. किंवा ज्यांना संसर्ग झाला होता त्यांची प्रतिकारशक्ती देखील वाढली आहे.
 
इम्पीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक पीटर ओपनशॉ म्हणाले होते की, "याआधी ज्या गोष्टीने मोठा फरक पडला होता तो म्हणजे लसींचा खूप विस्तृत आणि वेगवान पुरवठा. अगदी तरुणांपासून प्रौढांनाही लस देण्यात यश आलं आणि त्यामुळे खूप मोठा फरक पडला."
 
यावर्षी कमी लोकांना लस दिली गेली. गेल्या हिवाळ्यात, 50 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना एक लस टोचण्यात आली होती. आता फक्त 65 पेक्षा जास्त वय असलेल्या गटातील लोकांना लस दिली जात आहे.
 
प्राध्यापक ओपनशॉ म्हणतात की, यामुळे लोकांचा मृत्यू ओढवेल असं नाही. पण त्याचा परिणाम असा होईल की, एक असा आजार जो अनेक आठवडे लोकांना अंथरुणाला खिळवून ठेवेल.
 
ते सांगतात की, "मी असं ऐकलंय की, जे लोक तरुण आणि तंदुरुस्त आहेत त्यांना देखील या विषाणूची लागण झाल्यानंतर बराच त्रास झाला आहे. हा विषाणू खूपच धूर्त आहे. तो कधीकधी लोकांना इतकं आजारी पाडतो की त्यांना बरेच दिवस उपचार घ्यावे लागतात. तर कधी तो अगदी झटक्यात बरा होतो."
 
जर मागच्या वर्षात तुम्हाला कोरोनाची लागण झाली नसेल तुम्ही संवेदनक्षम असण्याची शक्यता जास्त आहे.
 
ब्रिटनमधील सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे किंवा ज्या लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज आहे त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. जेणेकरून राष्ट्रीय आरोग्य सेवेवरील दबाव कमी होईल.
 
यावर प्राध्यापक रिले म्हणतात, "पण याचा अर्थ असा नाही की जे लोक 65 वर्षाखालील आहेत त्यांना कोरोना होणार नाही आणि त्यांना खूप त्रास होणार नाही."
 
ज्याला लस टोचली आहे त्याच्या प्रतिकार शक्तीत बदल होणार आहेत असं नाही. विषाणूमध्ये देखील सातत्याने बदल होत आहेत.
 
प्रतिकारशक्तीची कमतरता
अँटीबॉडीज अत्यंत अचूक असतात, कारण त्या विषाणूच्या वरच्या भागात चिकटतात. विषाणू जितका अधिक विकसित होईल तितके त्याचे स्वरूप बदलेल आणि अँटीबॉडीजचा प्रभाव कमी होत राहील.
 
प्राध्यापक ओपनशॉ म्हणाले, "आता प्रसारित होणारे विषाणू रोगप्रतिकारकदृष्ट्या मूळ विषाणूपासून खूप वेगळे आहेत. सुरुवातीच्या लशी तयार करण्यासाठी मूळ विषाणूचा वापर करण्यात आला होता."
 
"बर्‍याच लोकांमध्ये ओमिक्रॉन आणि त्यांच्या म्युटेशन झालेल्या व्हेरीएंटच्या विरोधात फारच कमी प्रतिकारशक्ती असते."
 
जर तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की, तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी झाल्या आहेत. सोबतच विषाणू विकसित झाला आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गंभीर आजारी पडण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज आहे.
 
आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीचा एक भाग ज्याला टी-सेल्स असं म्हटलं जातं तो विषाणूचं संक्रमण झाल्यावर सक्रिय होतो. त्याला आधीच्या विषाणूशी कसं लढायचं याचं प्रशिक्षण देण्यात आलंय.
या टी-सेल्स विषाणूंमध्ये झालेल्या बदलामुळे गोंधळात पडत नाही. कारण त्यांना कोरोना संक्रमित पेशी शोधून मारता येतात.
 
प्राध्यापक रिले सांगतात, "या टी-सेल्समुळे गंभीर आजारी पडून रुग्णालयात जावं लागत नाही. पण विषाणू नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आपल्या शरीराचं नुकसान देखील होतं, ज्यामुळे अधिकचा त्रास होऊ शकतो."
 
कोरोनाचे विषाणू संपविण्यासाठी तुमच्या टी-सेल्स जो प्रयत्न करतात त्यामुळे तुमचे स्नायू दुखतात, ताप येऊन थंडी वाजते.
 
कोरोनाशी संबंधित इतर चार विषाणू असे आहेत ज्यात सामान्य सर्दीची लक्षणं दिसतात. त्यामुळे आपण त्यांना सौम्य संसर्ग समजतो.
 
प्राध्यापक ओपनशॉ स्पष्ट करतात की, "आपण अजून तिथवर पोहोचलेलो नाही, मात्र वारंवार होणाऱ्या संसर्गावर आपण नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण केली पाहिजे".
 
या दरम्यान आपल्यापैकी काहींना थंडीचा त्रास सहन करावा लागेल का?
 
प्राध्यापक रिले म्हणतात, "मला त्याची भीती वाटते."
 
Published By- Priya Dixit