१२०० हून अधिक लोकांचा सहभाग - कर्करोगावर मात केलेले व्यक्तींकडून मिळाली प्रेरणा
मुंबई: स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर, मुंबई आणि द वीक यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील वाशी मिनी सीशोर ग्राउंडवर ५ किमीची अंतराच्या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यातंर्गत ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग, वेळीच निदानाचे महत्त्व तसेच ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेल्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास याठिकाणी उलगडण्यात आला. या जनजागृती वॉकथॉनमध्ये गृहिणी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांसह विविध क्षेत्रातील १२०० हून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यावेळी श्री. बाबासाहेब राजळे ( नवी मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त), श्री. संतोष मराठे(मुख्य प्रादेशिक कार्यकारी अधिकारी-पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल), डॉ. किरण शिंगोटे( युनिट हेड, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई) डॉ. नीता एस. नायर (लीड कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई) डॉ. तेजिंदर सिंग (वरिष्ठ सल्लागार मेडिकल ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई ) आणि डॉ. राजेश शिंदे (सल्लागार एचपीबी आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स , नवी मुंबई) यांची विशेष उपस्थिती होती.
जगभरातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्यपणे आढळून येणारा कर्करोग आहे, दरवर्षी 2 लाखाहून अधिक नवीन प्रकरणांचे निदान होते. भारतात दर 4 मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते. दर 8 मिनिटांनी एक महिला स्तनाच्या कर्करोगाचा बळी ठरते. डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आयसीएमआरच्या अहवालानुसार भारतात कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे. अहवालात सूचित करण्यात आले आहे की भारतात दरवर्षी 1,00,000 महिलांमागे 35 महिलांना कर्करोग होतो. स्तनाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. शहरी भारतातील 22 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. भारतातील 40% स्त्रिया कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत आजही कर्करोगावर उपचार घेत आहेत.
डॉ. नीता एस. नायर( लीड कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, मुंबई) सांगतात की, अनेकदा कॅन्सरचा धोका हा न टाळता येण्याजोगा आणि बदलता न येण्याजोग्या घटकांमुळे आढळून येतो. यापैकी बदलता न येणारे घटक हे एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत जसे की वाढते वय, अनुवांशिकता, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आणि रजोनिवृत्तीचे वय. जीवनशैलीची निवड, लठ्ठपणा, आहाराच्या चूकीच्या सवयी जसे की धूम्रपान, जास्त मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव, हानिकारक रसायनांचा संपर्क हे असे कारणीभूत घटक आहेत ज्यावर आवर नियंत्रण ठेवू शकतो अथवा ते टाळता येऊ शकतात . लठ्ठपणा हा स्तनाचा कर्करोग आणि पुनरावृत्ती धोका या दोन्हीस कारणीभूत आहे. या उपक्रमातंर्गत आयोजित वॉकथॉन हा चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेमध्ये प्रत्येक महिलेने निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा याकरिता विशेष उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
डॉ. तेजिंदर सिंग( वरिष्ठ सल्लागार मेडिकल ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई) सांगतात की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचे जगण्याचे प्रमाण कमी आहे आणि कर्करोगाच्या निदानास विलंब होत असल्याने मृत्यूदर वाढत आहे. आम्ही 40-74 वर्षे वयोगटातील महिलांना नियमित तपासणी मॅमोग्राफीसाठी प्रोत्साहित करतो, कारण वेळीच निदान व उपचार दीर्घकालीन गुंतागुंत कमी करण्यास मदत करते.
श्री संतोष मराठे( सीईओ-पश्चिम क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स) सांगतात की, अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबई अपोलो हॉस्पिटल्स येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, पूर्णवेळ वरिष्ठ चिकित्सक, अनुभवी आणि प्रशिक्षित नर्सिंग टीम आणि उत्तमोत्तम रुग्णसेवा उपलब्ध आहे. आम्ही अलीकडेच अपोलो वुमेन्स कॅन्सर प्रिव्हेंशन क्लिनिक लॉन्च केले असून कर्करोगाचे वेळीच निदान करण्याचे आमचे लक्ष्य आहे. महिलांना त्यांच्या आरोग्यास प्राधान्य देण्याचे आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपचार पुरविणे हेच आमचे मुख्य ध्येय्य आहे.
श्री जिओगी इपेन झकारिया( सीनियर रिजनल जनरल मॅनेजर, द मलायाला मनोरमा कंपनी प्रा. लि) सांगतात की, वॉकथॉनच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर विषयी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. गेल्या वर्षी देखील जागतिक ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून स्तन कर्करोग जनजागृती चर्चासत्राचे आयोजिन केले होते. यंदा वॉकथॉनच्या माध्यमातून स्तन कर्करोगाच्या वेळीच निदानाविषयी आणि उपचारांविषयी जनजागृती केली जाणार आहे.