1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (20:56 IST)

उष्माघात म्हणजे काय, तो कसा टाळावा आणि झाल्यास काय काळजी घ्यावी?

delhi heat wave
उत्तर भारत सध्या उष्णतेच्या लाटेत पोळून निघतो आहे, राजस्थानात पारा पन्नास अंशांवर गेला तर दिल्लीतही विक्रमी तापमानाची नोंद झाली.मानवी शरिरासाठी हे एवढं तापमान घातक ठरू शकतं.
 
उन्हाळ्याच्या दिवसात, विशेषतः उष्णतेची लाट असते तेव्हा, उष्माघात होण्याचा धोका मोठा असतो.
 
पण उष्माघात म्हणजे काय? तो कशानं होतो आणि त्यावर उपाय काय आहे? जाणून घ्या.
 
सामान्यतः मानवी शरिराचं तापमान 98.6° फॅरनहाईट म्हणजे 37° सेल्सियस एवढं असतं. त्यापेक्षा शरिराचं तापमान खूप जास्त वाढलं (हायपरथर्मिया) किंवा खूप जास्त कमी झालं (हायपोथर्मिया) तर अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो
 
सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली तापमानातली वाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो.
 
वातावरणातलं तापमान खूप जास्त वाढतं तेव्हा शरीराला थंड राहता येत नाही आणि त्रास होऊ लागतो. त्यातूनच उष्माघात होऊ शकतो.
 
उष्माघात म्हणजे काय?
कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने खूप गंभीर त्रास होतो, त्याला उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स सांगतात.
 
बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील तापमान - थर्मोरेग्यूलेशन बिघडते, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो असं डॉ. प्रदीप आवटे सांगतात.
 
महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात. तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, अशा राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते.
 
इतकंच नाही, तर जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्डब्रेक उष्णता वाढली, पारा 45 अंशांवर गेला आणि अनेकांचा मृत्यू झाला.
 
उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.
उष्णतेच्या लाटेमुळे थकवा तसंच सतत झोप येणं ही लक्षणं सुद्धा दिसतात.
 
लहान मुलांनी काही आहार घेण्यास नकार दिला, किंवा चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना उष्माघात झाला असू शकतो.
 
उष्णतेची लाट येते, तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण वाढतं.
 
उष्णतेची लाट म्हणजे काय?
वेगवेगळ्या देशांत तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे निकष असू शकतात.
 
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.
 
कलाम तापमानातील वाढ 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हीयर हीट वेव्ह (Severe Heatwave) म्हटलं जातं.
 
उष्माघात कसा टाळावा?
उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका.
वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा.
घराबाहेर पडताना हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट - चपला वापरा.
अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही पेयं टाळा.
प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका.
जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी - छत्री वापरा, ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं - पाळीव प्राण्यांना सोडू नका.
तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
ORS, लस्सी, तोरणी (तांदळाचं पाणी), लिंबू सरबत, ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल. याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील.
प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा.
पंखे, ओला नॅपकीन वापरा. थंड पाण्याने आंघोळ करा.
चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं?
उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं. लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागानं सांगण्यात आलं आहे.
 
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणीही शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पिवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे."
 
उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेने काही सूचना केल्या होत्या.
 
तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
 
Published By- Priya Dixit