1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (17:09 IST)

मेंदीमुळे हातावर खाज आणि सूज का येऊ शकते? तुम्ही कोणती मेंदी वापरता हे तुम्हाला माहिती आहे का?

Henna Designs Mehndi
महादी तिच्या जीवनातील खास दिवसाची म्हणजे विवाहाच्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होती. नवरदेव मेंदीचा कोन घेऊन आला आणि महादीच्या हातावर सुंदर मेंदी काढली. महादीला मेंदी खूप आवडते. तिच्या मैत्रिणी गमतीत म्हणायच्या की, तिच्या हातावरची मेंदी किती रंगलेली आहे, हे पाहून नवरदेवाचं तिच्यावर किती प्रेम आहे, हे सांगता येतं. त्यांनी महादीच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर मेंदी काढली.
 
काही वेळानं महादीला मेंदी लावलेल्या ठिकाणी खाज येऊ लागली. पण लग्नाच्या उत्सवात आणि गोंधळात तिनं त्याकडं फारसं लक्ष दिलं नाही.
 
त्यानंतर थकल्यामुळं महादी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती उठली तेव्हा तिच्या हाता-पायामध्ये वेदना होऊ लागल्या होत्या. तिनं पाहिलं तर मेंदी लावलेल्या ठिकाणी सूज दिसली.
 
लग्नाच्या आनंदावर विरजण
तिनं पाण्यानं मेंदी व्यवस्थित धुतली पण अॅलर्जी समजून त्याकडं दुर्लक्षच केलं. नवरदेवाकडचे काही जण आले होते त्यांनी हातावर फोड आलेले पाहिले. त्यांनी त्याला हळद आणि कडुनिंबाची पानांचा लेप लावण्यास सांगितलं. पण त्यामुळं त्रास आणखी वाढला.
 
त्या सायंकाळी महादीच्या एका हाताच्या बाहीवर एक मोठा डाग आणि सूज दिसू लागली. त्यावेळी त्यांना स्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांना रात्री त्वचारोग तज्ज्ञाकडं नेण्यात आलं.
 
त्याठिकाणी अँटिअॅलर्जी गोळ्या आणि मलम देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी लग्नाच्या मंडपात बसलेल्या महादीला विधीदरम्यान हातात काहीतरी घेऊन यज्ञात टाकण्यास सांगितलं.
पण गुरुजींनी लगेचच तिला हात मागे घेण्यास सांगितलं. कारण तिच्या हाताच्या पट्ट्यांना लगेच आग लागेल अशी भीती त्यांना वाटली होती. त्यावेळी नवरदेवानं नवरीच्या हातावरील अॅलर्जीमुळं झालेल्या जखमा पाहिल्या आणि त्याला धक्का बसला.
 
नवरदेवानं दाखवलेल्या प्रेमामुळं महादीला आधी तर आनंद दिला. पण नंतरच्या दिवसांमध्ये हातावर जखमा झाल्या आणि त्यातून पातळ द्रवासारखं रक्त वाहू लागलं. या सर्वामुळं त्यांच्या मधुचंद्रात अडचणी आल्या.
 
आधी त्यांनी बूक केलेले फ्लाइट तिकीट रद्द केले आणि नंतर लग्नाची पार्टी हॉस्पिटलच्या फेऱ्यांमध्ये बदलून गेली.
 
अॅलर्जीचे कारण काय?
अनेकांना वाटत असतं ही सामान्य मेंदी आहे. पण मेंदीच्या अनेक कोनमध्ये पीपीडी (पॅराफेनिलिनेडायमाइन) नावाचं एक केमिकल असतं. हे काहीसं जांभळ्या रंगाचं असतं आणि मेंदी जास्त रंगावी म्हणून त्याचा वापर केला जातो.
 
तसं पाहिलं तर काही लोकांना यामुळं त्रास होतो पण काहींना काहीही होत नाही. असं का होतं, याबाबत आम्ही चेन्नईच्या किलपक्कम सरकारी रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ वनथी यांच्याकडून जाणून घेतलं.
त्या म्हणाल्या की,"ज्या प्रकारे एखादं औषध कुणासाठीतरी जीवन वाचवणारं असतं, तेच दुसऱ्यासाठी प्राणघातकही ठरू शकतं. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं शरीर काही गोष्टी स्वीकारत असतं, तर काही गोष्टी नाकारताना त्याचे गंभीर परिणामही दाखवत असतं."
 
"हीना-मेंदी"
पूर्वीच्या काळात शरीर रंगवण्यासाठी मेंदीची पानं कुटून त्याचा वापर केला जात होता. अगदी विवाहांमध्येही नवरदेवाच्या हाता-पायांनाही मेंदी लावली जायची. नंतरच्या काळात महिलांकडून त्याचा जास्त वापर सुरू झाला.
 
नैसर्गिक मेंदी दिवाळी, वाढदिवस, सण-उत्सव अशा खास दिवसांमध्ये कुटुंबातील महिलांच्या हाताची शोभा वाढवत असते. विशेष म्हणजे भारतातच नव्हे तर अरब देशांमध्येही ही अगदी सामान्य परंपरा आहे.
ते मेंदीची पानं तोडायचे ते कुटून घ्यायचे आणि आवडीनुसार लाल रंग कमी जास्त करण्यासाठी लिंबू आणि चहा पत्ती अशा काही नैसर्गिक गोष्टी टाकत हात सजवले जायचे.
 
त्याचवेळी जेव्हा हातावर मेंदी लावली जाते तेव्हा महिलांसाठी तो दिवस खास ठरतो, मानसिकदृष्ट्या त्यांना हलकं झाल्यासारखं वाटत असतं.
 
मेंदींबद्दलचे वाढते आकर्षण
तरुणी एकत्र यायच्या आणि नदीच्या किनाऱ्यावरून मेंदीची पानं तोडायच्या. एका दगडावर ती पानं वाटून बारीक करायच्या आणि बोटावर टोपी घालावी तसा लेप लावायच्या.
 
तेव्हाचं एकच ठरलेलं डिझाईन असायचं, ते म्हणजे मध्ये एक मोठा ठिपका आणि आजुबाजूला चार कोपऱ्याला चार लहान ठिपके.
पण घरात तयार केलेल्या या मेंदीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असायचं त्यामुळं ती व्यवस्थित हातावर बसत नसायची.
 
त्यानंतर महिलांना विविध प्रकारे मेंदी हातावर लावण्याची इच्छा होऊ लागली होती. त्यामुळं मेंदी वाटून तिला शंकूसारखा आकार करून विक्री केली जायची. त्यावेळी ती दीर्घकाळ खराब होऊ नये, म्हणून मेंदीमध्ये विविधं रसायनं मिसळली जायची.
 
मेंदीच्या रंगावरून टोमणे
मेंदीबाबत आणखी एक खास बाब म्हणजे, काही जणांच्या हातावर ती अगदी गडद लाल रंगात रंगते तर काहींच्या हातावर अगदी हलका नारंगी रंग असतो.
 
प्रत्येक प्रकारच्या मेंदीचा एक विशिष्ट रंग असतो. अनेकांनी याचा संबंध प्रेमाशी जोडला आहे. मेंदी रंगली नाही तर मुली एकमेकींची खिल्लीही उडवतात किंवा टोमणेही मारले जातात.
 
त्यामुळं मेंदी जास्त लाल व्हावी म्हणून कोनमध्ये असलेल्या मेंदीत पीपीडी मिसळलेलं असतं.
 
मेंदी लाल होण्यासाठी काय करतात?
डॉक्टर वनथी यांनी सांगितलं की, "मेंदीचं शास्त्रीय नाव लॉसोनिया इनर्मिस असं आहे. त्यात लॉसोन नावाचं पिगमेंट त्वचेवर काही काळासाठी लावलं जातं. यात एक अशा प्रकारची प्रक्रिया होते, जेव्हा ती दीर्घकाळ शरिराच्या प्रोटीन-आकारच्या पेशींबरोबर राहते तेव्हा कोणतीही मेंदी जास्त लाल होते.
 
रासायनिक पद्धतीनं तयार केलेल्या मेंदीच्या कोनमध्ये कधी-कधी लालपणा वाढवण्यासाठी PPD नावाचं रसायन मिसळलं जातं. ते जांभळ्या रंगाचं सुगंधित रसायन असतं. शरीराच्या संपर्कात आल्यानंतर ते लाल आणि नंतर काळं होतं.
 
पीपीडीचा वापर होणारे इतर उद्योग
"याचा जास्त वापर पांढरे केस काळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हेअर डायमध्ये केला जातो. याचा केवळ 2% वापर करण्याची परवानगी आहे. पण अनेक डाय निर्माते याचा जास्त वापर करतात. बहुतांश कपड्याच्या डायमध्ये याचा वापर केला जातो. त्याशिवाय पूर्वी याचा वापर फोटोग्राफीमध्ये, रबर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणूनही केला जात होता," असंही डॉक्टर वनथी म्हणाल्या.
जेव्हा हे रसायन त्वचा, डोळे आणि तोंडात जातं तेव्हा आणि एखाद्या मार्गाने मजुरांच्या अन्नात मिसळलं गेलं तर शरिरावर विविध परिणाम करत असतं.
 
मेलानिनमुळे संरक्षण
डॉक्टरांनी असंही सांगितलं की, सावळी त्वचा असलेल्या लोकांमध्ये मेलानिन त्यांचं त्वचेच्या समस्यांपासून रक्षण करतं. तर गोरी त्वचा असलेल्यांमध्ये मेलानिन त्यांचं संरक्षण करत नाही.
 
सातत्याने वापराचा धोका
डॉ.वनथी यांनी हेअर डायच्या सातत्यानं वापर केल्यामुळं होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. "माझ्याकडं येणाऱ्या रुग्णांना जेव्हा मी त्यांच्या हेअर डायमुळं अॅलर्जी झाल्याचं सांगते तेव्हा त्यांना माझ्यावर विश्वास बसत नाही. मॅडम आम्ही 10 वर्षांपासून एकाच ब्रँडचा हेअर डाय वापरत आहोत, असं ते सांगतात. डाय लावल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही," असं लोक सांगत असल्याचं वनथी म्हणाल्या.
 
जेव्हा एखादं केमिकल सातत्यानं त्वचेवर लावलं जातं, तेव्हा त्यामुळं त्वचा खूप संवेदनशील बनते. त्यात बदल झाला तर त्यामुळं अॅलर्जी, केस गळणे, पांढरे डाग अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
 
"ज्याप्रकारे वारंवार वापर केल्यानं हेअर डाय अॅलर्जीचं कारण ठरू शकते, त्याचप्रकारे पीपीडी रसायन असलेली मेंदीदेखील अॅलर्जीचं कारण ठरू शकते. त्वचारोग तज्ज्ञ वनथी म्हणाल्या, "त्यामुळं लोकांना जेव्हा पहिल्यांदा मेंदीमुळं अॅलर्जी होत नाही, ते वारंवार मेंदीचा वापर करतात. पण त्यामुळं कधीतरी समस्या निर्माण होऊ शकते."
 
हेअर डायनंतरचा अमेरिका दौरा
डॉक्टरांनी सांगितलं की, हेअर डायची अॅलर्जी असलेल्या एका रुग्णाला अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान डाय न करण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही त्यांनी हेअर डायचा वापर केला. त्यावेळी छत नसलेल्या बसमधून प्रवास करत दीर्घकाळ उन्हाशी संपर्क आल्यानं त्यांना फोटो सिंथेसिसचा त्रास झाला. त्यांना अमेरिका दौऱ्यादरम्यान 10 दिवस रुग्णालयात राहावं लागलं होतं.
 
काही लोक लाल रंगाच्याऐवजी दुसऱ्या रंगाच्या किंवा काळ्या मेंदीचा वापर करतात. त्यात अधिक काळं करण्यासाठी जास्त पीपीडी वापरलं जातं, असा इशाराही डॉक्टरांनी दिला.
 
टॅटूही ठरू शकतो धोकादायक
कायमस्वरुपी टॅटूमध्येही रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळं टॅटू ग्रॅनुलोमा किंवा जखमेसाठी कारणीभूत ठरू शकतात असा इशाराही तज्ज्ञांनी दिला. यामुळं रक्तप्रवाहात अडचणी येऊ शकतात किंवा इतर अनेक समस्याही येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. तसंच एकाच सुईचा वापर केल्यानं एचआयव्ही आणि टीबीसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
 
त्यांनी असंही सांगितलं की, पीपीडी रसायनामुळं होणारी जळजळ गंभीर असते. तसंच गळ्याला सूज, पोटात दुखणे, उलट्या आणि अगदी किडनी निकामी होण्यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
 
मेंदी लावण्याचा सुरक्षित मार्ग काय?
समजा तुम्ही एखाद्याच्या मेंदी सोहळ्यात गेलात आणि एका दिवसासाठी मेंदी लावायला काय हरकत आहे असा विचार केला तर तेही धोकादायक ठरू शकतं.
 
त्यामुळं मेंदी लावण्याआधी त्याचा एक लहानसा थेंब हाताच्या कोपराच्या आतल्या भागात किंवा कानाच्या मागे अशा संवेदनशील ठिकाणांवर लावून जळजळ किंवा खाज येते का ते पाहावं. त्यानंतर तुम्ही त्या ब्रँडची मेंदी हातावर किंवा पायावर लावू शकता. पण तरीही नैसर्गिक मेंदीच्या पानांपासून तयार केलेली मेंदीच रसायनयुक्त मेंदीच्या कोनपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार डॉक्टर वनथी यांनी केला.
 
Published By-Priya Dixit