सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (08:46 IST)

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं प्रमाण भारतातील तरुणांमध्ये का वाढतंय?

- सुशिला सिंह
कॅन्सरला आयुष्याचा ताबा घेऊ देणार नाही, काहीही करून यातून बाहेर पडायचंच असं खासगी कंपनीत काम करणाऱ्या निधीने पक्कं ठरवलं होतं.
 
अगदी सहजपणे निधी इतकी मोठी गोष्ट बोलून जाते. आपल्याला थायरॉईड कॅन्सर असल्याचं निधीला ती 38 वर्षांची असताना समजलं.
 
कॅन्सर पहिल्या स्टेजला असल्याचं समजल्यानंतर त्याच्याशी लढायचं ठरवल्याचं निधी सांगते.
 
नवरा आणि कुटुंबाचा आपल्याला पूर्ण पाठिंबा मिळाल्याचं निधी सांगते. पण आपल्या जावेला झालेल्या कॅन्सरबद्दल सांगताना मात्र ती गहिवरते.
 
तिची जाऊ गर्भवती असतानाच तिला स्तनांचा कॅन्सर (ब्रेस्ट कॅन्सर) असल्याचं निदान झालं. कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये होता आणि डिलीव्हरीच्या नंतर तिचा मृत्यू झाला.
 
निधीच्या जावेचं तेव्हा वय होतं फक्त 29 वर्षं.
 
कमी वयात कॅन्सर झाल्याच्या बातम्या हल्ली सर्रास ऐकू येतात. पण खरं काय आहे?
 
तरुणांमध्ये कॅन्सर
गेल्या 10 वर्षांमध्ये कॅन्सरची प्रकरणं 25 टक्क्यांनी वाढली आहेत तर यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलंय.
 
मेडिकल जर्नल ऑफ ऑन्कॉलॉजीने 1990 ते 2016 दरम्यान केलेल्या संशोधनात ही गोष्ट आढळलीय.
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते कॅन्सर हा दुसरा असा आजार आहे ज्यामुळे जगभरात सर्वांत जास्त लोकांचा मृत्यू होतो.
 
कॅन्सर हा वाढत्या वयात होणारा आजार असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. पण तरूण लोकांनामध्येही आता कॅन्सर आढळल्याचं प्रमाण वाढल्याचं समोर येतंय.
 
यापैकी 40 टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सरचा संबंध तंबाखू सेवनाशी असल्याचं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स (AIIMS)मधल्या सर्जिकल ऑन्कॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. व्ही. एस. देव सांगतात.
 
आता तर 20-25 वर्षांच्या तरुणांमध्येही हा आजार आढळतोय.
 
जीवनशैलीचा परिणाम
डॉ. एस. व्ही. एस. देव सांगतात, "तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांमध्ये सेवन सुरू केल्याच्या 10-12 वर्षांनंतरच कॅन्सर आढळतो. आमच्याकडे असेही ग्रामीण तरूण येत आहेत जे स्मोकलेस टोबॅको म्हणजे पान, तंबाखू, खैनी, गुटखा सारख्या गोष्टींचं सेवन करतात. अगदी कमी वयात, या गोष्टींमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती नसतानाच या तरुणांनी सेवन सुरू केलेलं असतं. म्हणून आता 22-25 वर्षांचे तरूण आमच्याकडे कॅन्सरच्या उपचारांसाठी येत आहेत."
 
याशिवाय एम्समध्ये येणाऱ्या हँड अॅण्ड नेक, कोलोन आणि स्तनाच्या कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 30 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचं वय 35 पेक्षा कमी असल्याचंही डॉ. देव सांगतात.
 
तर कॅन्सरचा संबंध जीवनशैलीशी असल्याचं मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमधल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडीमिओलॉजीचे संचालक प्राध्यापक. डॉ. राजेश दीक्षित सांगतात.
 
युरोप आणि अमेरिकेने तंबाखू सेवन रोखण्यासाठी कठोर पावलं उचलल्यानंतर तिथे तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्याचं ते सांगतात.
 
तंबाखू सेवनामुळे लोकांना ओरल म्हणजे तोंडाचा, पॅनक्रिएटिक म्हणजेच स्वादुपिंडाचा, सर्विक्स (गर्भायशाचं मुख), ओव्हरीज म्हणजेच अंडाशय, लंग - फुफ्फुसं आणि ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर होत असल्याचं डॉक्टर सांगतात. सामान्य व्यक्ती, सरकार आणि मीडीयाने ही गोष्ट गांभीर्याने घेतल्यास या कॅन्सरवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असंही ते म्हणतात.
 
कुपोषणाशी संबंध
कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे व्यक्तीच्या उंचीपेक्षा त्याचं वजन जास्त असणं, फळं आणि भाज्यांचं कमी सेवन, व्यायाम न करणं, तंबाखू आणि दारूचं सेवन या गोष्टींमुळे होत असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.
 
भारतामध्ये कॅन्सरची 15.86 लाख प्रकरणं आढळली असून विविध हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची तपासणी आणि उपचार होत असल्याची माहिती 2018मध्ये लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. या रुग्णांच्या उपचारांसाठी सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच वेदना कमी करणाऱ्या सुविधा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
 
जीवनशैली, लोकांमध्ये वाढणारी स्थूलता, सरासरी आयुष्यमानात वाढ आणि तपासणीसाठीच्या सुविधांमध्ये झालेली वाढ यासगळ्यांमुळे भारतात कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळत असल्याचं डॉक्टर्स म्हणतात.
 
डॉक्टर्स म्हणतात, स्वातंत्र्य काळात भारतातलं सरासरी आयुष्यमान 40-45 वर्षं होतं. आता ते वाढून 65-70 वर्षं झालंय. भारतात आधी कुपोषण आणि संसर्गामुळे होणारे आजार आढळत पण आता ते बहुतांश प्रमाणात आटोक्यात आणण्यात आले आहेत. लोकसंख्येसोबतच तपासणीसाठीच्या सुविधाही वाढल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.
 
भारतातल्या कॅन्सरचा इतिहास
कॅन्सरसारखे आजार आणि त्यावरचे उपाय याचा उल्लेख भारतामध्ये आयुर्वेद आणि सिद्ध कालीन पांडुलिपीत आढळतो.
 
जर्नल ऑफ ग्लोबल ऑन्कॉलॉजीनुसार भारतातल्या मध्ययुगीन सागित्यातमध्ये कॅन्सरचा उल्लेख कमी आढळतो, पण कॅन्सरची प्रकरणं आढळल्याचे अहवाल 17 व्या शतकापासून यायला सुरुवात झाली होती.
 
सन 1860 आणि 1910 दरम्यान भारतीय डॉक्टर्सने केलेल्या तपासण्या, त्यांचे निष्कर्ष आणि कॅन्सरच्या प्रकरणांच्या अहवालांचे भाग प्रसिद्ध झाले होते.
 
महिलांमधला कॅन्सर
'द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी' (1990-2016)नुसार भारतातल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं सर्वांत जास्त आढळली आहेत.
 
या अभ्यासानुसार महिलांमधल्या स्तनांच्या कॅन्सरनंतर सर्व्हिकल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, कोलोन आणि रेक्टम आणि लिप अॅण्ड कॅव्हिटी कॅन्सरची प्रकरणं सर्वांत जास्त समोर येत आहेत.
 
दिल्लीमधल्या राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटरमधल्या लंग अॅण्ड ब्रेस्ट रेडिएशन सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. कुंदन सिंह चुफान सांगतात, "गावं आणि शहरांमध्ये तुलना केली तर गावांमध्ये सर्व्हिकल आणि शहरांमध्ये स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळतात. पण संपूर्ण भारतातच महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सगळ्यांत जास्त आढळतो. उशीरा लग्न होणं, उशीरा होणारी गर्भधारणा, स्तनपान कमी करणं, वाढता तणाव, जीवनशैली आणि स्थूलपणा ही यामागची कारणं आहेत."
 
भारतामध्ये वजन वाढताना पोटावर चरबी जमा होते त्यामुळे पित्ताशय, स्तनांचा कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरची प्रकरणंही आढळत असल्याचं डॉ. राजेश दीक्षित सांगतात.
 
प्रदूषणाचा परिणाम
गेल्या वर्षी दिल्लीतल्या गंगाराम हॉस्पिटलमधील छातीचे सर्जन आणि लंग केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी 28 वर्षांच्या एका महिलेला झालेल्या फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत सांगितलं होतं. या महिलेने कधीही धूम्रपान न करूनही तिला चौथ्या स्टेजच्या लंग कॅन्सर झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
 
यामागे दिल्लीतलं प्रदूषण कारणीभूत आहे का, असं त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं, की या महिलेच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने कधीही धूम्रपान केलेलं नाही. त्यामुळे हे दिल्लीतल्या प्रदूषणामुळेच झाल्याचं मान्य करण्याशिवाय पर्याय नाही.
 
एम्सचे डॉक्टर एस. व्ही. एस. देवही लंग कॅन्सरसाठी धुम्रपानाखेरीज प्रदूषणही जबाबदार असल्याचं म्हणतात.
 
अर्थव्यवस्थेवर परिणाम
2035 पर्यंत कॅन्सरची प्रकरणं वाढतील आणि ही संख्या 10 लाखांवरून वाढून 17 लाख होईल असं लॅन्सेट जर्नलमध्ये म्हटलंय.
 
तर जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीनुसार भारतामध्ये 18 लाख रुग्णांमागे फक्त 1600 तज्ज्ञ उपलब्ध आहेत. म्हणजे सरारसी 1125 कॅन्सर रुग्णांसाठी एक कॅन्सर तज्ज्ञ.
 
'नव्या'चे संस्थापक आणि चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर नरेश एम. राजन यांच्यामते कॅन्सरमुळे अर्थव्यवस्थेवर दोन प्रकारे परिणाम होतो - एक तर त्या रुग्णाचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे भारताचं आरोग्य बजेट.
 
यासाठीच नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG)ची स्थापना करण्यात आली आहे. एनसीजी देशभरातल्या सरकारी आणि बिगर-सरकारी हॉस्पिटल्सचा गट आहे. या गटाने 'नव्या'ची स्थापना केली असून ही संस्था रुग्ण आणि गरजूंपर्यंत तज्ज्ञ आणि त्यांचे उपचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते.
 
जर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कॅन्सरपीडित असेल तर त्याच्या उपचारांसाठी 40-50% लोक कर्ज घेतात किंवा मग घर विकतात. 3 ते 5 टक्के लोक या उपचारांमुळे दारिद्र्यरेषेखाली जातात असं लॅन्सेटमध्ये म्हटलंय.
 
पण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत कॅन्सरचाही समावेश करण्यात आल्याने लोकांना याचा फायदा होईल असं डॉक्टर्सना वाटतंय.
 
सरकारने 2018मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केलीय. याद्वारे रोगांच्या उपचारासाठी मदत केली जाते. यामध्ये आता कॅन्सरचाही समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेद्वारे लाभार्थीला पाच लाख रुपयांपर्यंतचा सहाय्यता निधी देण्याची तरतूद आहे.
 
डॉ. नरेश एम. राजन यांच्यामते, "गरीबांना उपचारांसाठी मोठ्या शहरांत यावं लागू नये यासाठी सरकारकडून तरतूद करण्यात आलेली आहे. रोगाचं निदान झाल्याबरोबर उपचार सुरू होतील, यासाठी नॅशनल कॅन्सर ग्रिड तयार करण्यात आलंय. यामध्ये 170 कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना खासकरून कॅन्सर पेशंट्ससाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असला तर कोणत्या चाचण्या कराव्या लागतील आणि उपचार कसे असतील, याची माहिती यात आहे. सोबतच केल्या तीन-चार वर्षांमध्ये कॅन्सर रिस्पॉन्स सिस्टीम तयार करण्यात आली आहे. तुम्ही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात तरी एखाद्या प्रकारच्या कॅन्सरबद्दल पूर्ण माहिती देऊन उपचार करता यावा आणि त्या रुग्णाला मोठ्या शहरात यावं लागू नये, हा यामागचा उद्देश्य आहे. या ग्रिडला आयुष्यमान योजनेशीही जोडण्यात आलंय. यामुळे येणाऱ्या रुग्णाला योजनेमार्फत आर्थिक मदतही मिळेल."
 
आयुष्यमान भारत योजनेचा कॅन्सर रुग्णांनाही फायदा होईल, असं डॉ. एस. व्ही. एस. देवही म्हणतात. कॅन्सरची औषधं महाग असल्याचं पूर्वी म्हटलं जाईल. यासाठी सरकारच्या नॅशनल फार्मस्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने कॅन्सर रुग्णांसाठी ट्रेड मार्जिन 30 टक्क्यांवर सीमित केलेली आहे.