शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (14:16 IST)

कोरोना व्हायरस लक्षणंः कोव्हिड, फ्लू आणि सर्दीच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे?

cold weather
सर्दी ताप, फ्लू किंवा कोव्हिड-19 हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. पण या सर्वांची लक्षणं समान असू शकतात. कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर आढळणाऱ्या लक्षणांबाबत अजूनही लोकांच्या मनात विविध शंका आहेत. त्यातली कोरोना व्हायरसच्या व्हेरियंटच्या संसर्गानंतर काही वेगळी लक्षणं आढळत असल्याचं समोर आलंय.
 
सर्दी ताप, फ्लू किंवा कोव्हिड-19 हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. पण या सर्वांची लक्षणं समान असू शकतात.
त्यामुळे अशा स्थितीत कोरोना व्हायरसची लागण झाली किंवा नाही, हे कळणं थोडं अवघड होऊ शकतं. पण कोणत्याही परिस्थितीत दुखणं अंगावर न काढता, डॉक्टरांकडून योग्य निदान करवून, उपचार घेणंच योग्य.
 
कोरोनाची लागण होऊन आजारी पडलेल्या झालेल्या रुग्णांना खालीलपैकी किमान एक लक्षण तरी हमखास आढळून येतं.
 
तीव्र ताप
नवीन प्रकारचा, सततचा खोकला
चव, गंध यांची जाणीव न होणे
याशिवाय, इतरही काही गोष्टी आहेत, त्याच्या मदतीने आपण कोव्हिड-19, फ्लू, किंवा साधी सर्दी, ताप यांच्यातील फरक ओळखू शकतो.
 
ताप आला म्हणजे कोरोनाची लागण?
मानवी शरीराचं सरासरी तापमान 36 अंश सेल्सियसच्या आसपास असतं. पण हे तापमान 37.8 किंवा त्याच्या वर गेल्यास त्याला ताप असं संबोधलं जातं.
 
आपलं शरीर एखाद्या संसर्गाशी लढत असेल तर शरीराचं तापमान वाढू लागतं, अशावेळी आपल्याला ताप आला असं आपण म्हणतो.
 
ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण तुमच्याकडे थर्मामीटर नसला तरी हरकत नाही.
 
तुमच्या छातीला किंवा पाठीला स्पर्श करून तुम्हाला शरीर तापल्याची जाणीव होत असेल, तर तापाचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
कोरोनाची लागण झाल्याचं ताप हे ठळक लक्षण आहे. पण ताप फ्लू किंवा इतर संसर्गामुळेही येऊ शकतो. त्यामुळे शरीरात ताप असेल तर घाबरून जाऊ नका. परंतु, तापासोबत सातत्याने खोकला येत असल्यास हा दुर्मिळ प्रकार आहे, हे कोरोनाचं ठळक लक्षण आहे.
 
तुम्हाला ताप आल्यास तुम्ही कोरोना व्हायरची चाचणीही करून घेऊ शकता, त्यासाठी जवळच्या रुग्णालयांशी संपर्क साधू शकता.
 
ताप कसा तपासावा?
जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, शरीराचं तापमान 37.8 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना अलगीकरणात राहणंच योग्य आहे.
 
तुम्हाला ताप आहे किंवा नाही हे तुम्ही थर्मामीटरच्या मदतीने तपासू शकता. त्यासाठी तीन पद्धती वापरता येऊ शकतात.
 
काखेत थर्मामीटर ठेवून ताप तपासता येतो. त्यासाठी आपल्या काखेत थर्मामीटरवरील पाऱ्याचा भाग दाबून ठेवावा. एका मिनिटापर्यंत थर्मामीटर काखेतच राहू द्यावा. नंतर तो थर्मामीटर काढून शरीराचं तापमान किती आहे, हे मोजता येतं.
याशिवाय तोंडावाटेही तापाची मोजणी करता येते. जीभेखाली थर्मामीटरचं टोक एक मिनीट दाबून ठेवावं. नंतर थर्मामीटर काढून तापमान मोजता येतं.
अशाच प्रकारे कानात थर्मामीटर ठेवूनही तापमान तपासता येऊ शकतं, पण प्रामुख्याने तोंड किंवा काखेतूनच ताप तपासण्याची पद्धत जास्त वापरली जाते.
खोकल्याबद्दल थोडंसं...
तुम्हाला सर्दी-खोकला किंवा फ्लू झालं असेल तर तुम्हाला इतर लक्षण दिसण्यासोबतच खोकलाही येऊ शकतो.
 
साधारणपणे, फ्लूची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये स्नायूंचं दुखणं, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आदी लक्षणं दिसू शकतात. तसंच नाक गळणे, चोंदणे आणि सोबत खोकला अशी ही लक्षणं असू शकतात. साध्या सर्दी-खोकल्यापेक्षा ही लक्षणं थोडीफार तीव्र असतात.
साध्या सर्दी-खोकल्यातसुद्धा तुम्ही आजारी पडता हे खरं असलं तरी, यामधील लक्षणं थोडीफार सौम्य आहेत. यामध्ये तुम्हाला सर्दी होऊन शिंका येणं, घसा खवखवणं, नाक गळणं असे प्रकार दिसून येतात. यात तीव्र ताप, स्नायूंचं दुखणं, डोकेदुखी वगैरे दुर्मिळ मानली जाते.
 
आता आपण कोरोना व्हायरसचा विचार करू.
कोरोनाचा खोकला म्हणजे सलग येणारा खोकला. यात सातत्याने खोकला येऊ शकतो किंवा 24 तासांत तीन किंवा जास्त वेळा सलग खोकल्याची मालिका सुरू होते.
 
तुम्हाला आधीपासूनच खोकल्याचा किंवा श्वसनाशी संबंधित त्रास असेल (COPD) तर कोरोनाचा आजार आणखीनच बळावतो.
 
त्यामुळे तुम्हाला तुमच्या खोकल्याबाबत विचित्र असं काही जाणवल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घेतली, तर तुमच्यासाठी उत्तम राहील.
 
चव, गंध जाणे म्हणजे काय?
कोरोनाची लागण झाल्याचं हे प्रमुख लक्षण आहे. तुम्हाला असं काही होत असेल तर तत्काळ कोरोना चाचणी करून घ्या.
 
तुम्हाला साधा सर्दी-खोकला आहे, असं वाटू शकतं. पण एकदा तपासून घ्यायला काय हरकत आहे? त्यामुळे पुढील धोका टळू शकतो.
शिंका येणं म्हणजे कोव्हिड-19?
कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या लक्षणांमध्ये शिंका येण्याचा समावेश नाही.
 
पण कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये नाक गळणं, घसा खवखवणं, डोकेदुखी अशी लक्षणं आढळली आहेत.
पण हो, तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल आणि तुम्ही शिंकलात, तर त्यामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.
 
म्हणून कधीही शिंकताना हातरुमाल, टिश्यू पेपर वापरणं. वापर झाल्यानंतर तत्काल ते कचरा पेटीत टाकून हात स्वच्छ धुणं, ही काळजी आपण घ्यायला हवी.
 
लक्षात ठेवा, हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं याच सवयी सध्याच्या काळात आणि पुढेही तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. या सवयी फक्त कोरोनाच नव्हे तर इतर आजारांपासूनही तुम्हाला दूर ठेवू शकतात.
 
नाक गळणं, चोंदणं याबाबत काय?
वातावरण बदलत असताना साधारणपणे आपल्याला आणि विशेषतः लहान मुलांना साधी सर्दी, ताप किंवा खोकला यांसारखी लक्षणं दिसू शकतात.
 
विशेषतः नाक गळणं, चोंदणं हा प्रकार या दिवसांत हमखास आढळून येतो.
पण नाक गळत असल्यामुळे कोरोनाची टेस्ट करायला हवी, असं नाही. नाक गळणं म्हणजे कोरोनाची लागण नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
 
आजारी पडल्यास काय करावं?
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना विविध प्रकारची लक्षणं दिसून येत आहेत. यामध्ये सौम्य लक्षणांपासून गंभीर लक्षणांचा समावेश आहे. काही जणांमध्ये लक्षणं दिसत नसली तरी त्यांच्यामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो.
कोरोनाची लागण झाल्यानंतर लक्षणं दिसून येण्यास एक ते दोन आठवड्याचा कालावधी लागू शकतो. पण सरासरी पाच दिवसांत आजारपणाबाबत स्पष्ट होऊ शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
श्वास घेण्यास त्रास हेसुद्धा कोरोनाचं प्रमुख आणि गंभीर लक्षण आहे.
तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी ऑनलाईन किंवा फोनवर संपर्क साधा. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
कोरोना संकटाच्या काळात आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आपल्या हातात आहे.
या काळात मास्क वापरणं, हात धुणं यांच्यासारख्या सवयी कठोरपणे पाळाव्या लागतील.
 
Published By- Priya Dixit