सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 12 मे 2019 (00:59 IST)

ई जीवनसत्वाची कमतरता

शारीरिक विकास आणि तंदुरुस्त राहाणे यासाठी जीवनसत्ते, खनिजे यांची आवश्यकता असते. या घटकांची कमतरता असल्यास शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ई जीवनसत्वही शरीरासाठी महत्वाचे असते. रोगांपासून बचाव करण्यासाठी ई जीवनसत्व गरजेचे असते. त्याची कमतरता भासल्यास केस, डोळे, त्वचा यांच्याशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ई जीवनसत्वाची कमतरता भासल्यस शरीराकडून काही संकेत मिळतात. शरीराच्या या संकेतांकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ई जीवनसत्वाच्या कमतरतेची कारणे, तयाची लक्षणे आणि कमतरता भरून काढण्यसाठी काय उपाय करावेत ते पाहूया.
 
कमी चरबीयुक्त आहार घेतल्यास शरीराला ई जीवनसत्त्वाची कमतरता भासते. ज्या लोकांना आतड्यांशी निगडित आजार आहेत. उदा, क्रोहन आणि पित्त (गॉलब्लाडर) या समस्या भेडसावत असतील त्यांच्यामध्ये ई जीवनसत्त्वाची कमतरता असते.
 
लक्षणे- स्नायू कमजोर होतात- ई जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास स्नायू कमजोर होतात. ई जीवनसत्त्व आणि सेलेनियम ची कमतरता असल्यास मायोपॅथीची समस्या वाढते. मायोपॅथी मध्ये स्नायू सुकायला लागतात ते पसरू लागतात किंवा स्नायूंमध्ये वाकडेपणा येतो. ज्यामुळे शरीराचे अवयव वाकडे होऊ लागतात. चालण्या फिरण्यात अडचणी निर्माण होतात. लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना हा आजार होण्याचा धोका अधिक आहे. त्याव्यतिरिक्तही अनेक समस्या निर्माण होतात.
 
दृष्टी कमी होणे- ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचा रेटिना आणि डिजनरेशन पातळ होते. त्यामुळे डोळ्यातील आतल्या भागावर त्याचा परिणाम होतो. अनेकदा दृष्टी धूसर होते आणि रात्री काही न दिसण्याची समस्या म्हणजे रातआंधळेपणा येऊ शकतो.
 
रक्ताची कमतरता- अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता होऊ लागते. हल्ली रक्तपेशी कमी होणे यात नवल राहिलेले नाही. ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. आणि व्यक्ती अशक्त होऊ लागते.
 
ई जीवनसत्त्वाची कमतरता कशी पूर्ण कराल?
 
शाकाहारी लोकांना ई जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, रताळे, सलगम, मोहरी, आंबा, ब्रोकोली, गहू, बीन्स, अव्हाकॅडो इत्यादींचा समावेश आपल्या आहारात करावा.