शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

घसा दुखत आहे? मग हे करून पहा!

घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहिती खाली दिली आहे.
 
१) घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
 
२) घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
 
३) खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
 
४) तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते.
 
५) घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.