आयपीएलः कॉर्पोरेट कंपन्यांचा धंदा?
- अभिनय कुलकर्णी
कट टू टेक १.... बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाचे सीईओ चारू शर्मा आणि प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. पराभव या संघाची पाठ सोडत नाहीये. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तगडे खेळाडू असूनही या संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. म्हणूनच शर्मा व प्रसाद यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे. कट टू टेक २.... हैदराबाद डेक्कन चार्जर्स संघात दिग्गज खेळाडू असतानाही हा संघ आतापर्यंत फक्त दोन विजय मिळवू शकला आहे. परवा मात्र, या संघाने आश्चर्यकारकरित्या आयपीएलमधील तगडा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या संघाला हरवून खळबळ माजवली. विशेष म्हणजे या संघात कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नव्हता. त्याला मुद्दाम बसविण्यात आल्याचे कळते. कट टू टेक ३.... आयपीएल मोहालीच्या संघाने पराभवाची सलामी दिल्यामुळे चिडलेल्या प्रीती झिंटाने म्हणे सात खेळाडूंना फाईव्ह स्टार हॉटेलमधून सामान्य दर्जाच्या हॉटेलमध्ये हलवले. कट टू फ्लॅशबॅक.... |
'लिजंड' खेळाडू असल्याने लिलावात नसलेल्या राहूल द्रविड या एकमेव खेळाडूने या सगळ्या प्रकाराने हरखून न जाता एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, 'खेळाडूंना विकत घेणे योग्य नव्हे.'
|
|
|
आयपीएल ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा तिचे कौतुक करताना अनेकांची तोंडे बेफाम सुटली होती. एरवी खोर्याने पैसा ओढणार्या भारतीय संघातील खेळाडूंनाही त्याचा मोह पडला, मग नवोदितांची काय कथा. सुरवातील संघाची फ्रॅंचाईझी विकत घेतली गेली. त्यासाठी शाहरूख खान, प्रीती झिंटासारखे खेळाडू तर उतरलेच पण कॉर्पोरेट कंपन्याही उतरल्या. ही सगळी तारकादळे आयपीएलच्या प्रांगणात उतरल्याने स्पर्धेला ग्लॅमरचा झगमगाट लाभला नसता तरच नवल. क्रिकेटपटूंची बोली लावली गेली तेव्हा तर 'कोटीच्या कोटी' उड्डाणांनी सामान्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. भारतीय खेळाडूंना तर लॉटरी लागल्यासारखेच वाटत होते. नवोदितही 'क्रिकेटचे उज्ज्वल करीयर' पाहून हरखून गेले होते. क्रिकेटपटूंना 'विकत' घेण्यासाठी या कॉर्पोरेट कंपन्यात मोठी स्पर्धा लागली होती. आपल्याला हवे ते खेळाडू लिलाव करून त्यांनी विकत घेतले. त्यावेळी आपली बाजारातील किंमत पाहून या क्रिकेटपटूंनाही मूठभर मांस चढले होते. त्यावेळी 'लिजंड' खेळाडू असल्याने लिलावात नसलेल्या राहूल द्रविड या एकमेव खेळाडूने या सगळ्या प्रकाराने हरखून न जाता एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, 'खेळाडूंना विकत घेणे योग्य नव्हे.' कट टू टेक ४..... राहूलला या स्पर्धेचे भवितव्य, त्याचे होणारे परिणाम दिसले होते की काय कोण जाणे? पण त्याच्या या वाक्यातील गर्भित इशारा आज प्रत्यक्षात उतरला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या कॉर्पोरेट कंपन्या क्रिकेटविषयी प्रेम आहे, म्हणून त्यात उतरलेल्या नाहीत. त्यांना यातून पैसा कमवायचा आहे. त्याच्यासाठी हा निखळ धंदा आहे. त्यांच्याकडे कोण क्रिकेटपटू आहे, त्याचे आतापर्यंतचे करीयर काय?, विक्रम काय? त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पत काय? याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या संघाला जिंकून देण्याचे 'किलर इन्स्टिंक्ट' त्यांच्यात हवे होते. त्यांना पराभव नको होता. त्यांना तो सहन होणाराही नव्हता. सुरवात प्रीती झिंटाने केली. सुरवातीच्या सामन्यात तिच्या पंजाब किंग्ज इलेव्हन संघाला विजयाचे तोंड पहायला मिळाले नव्हते. मग युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील संघाच्या काही खेळाडूंना तिने फाईव्ह स्टार हॉटेलमधून हलवून दुय्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये हलवले. याचा संबंध कामगिरीशी जोडण्याची गरज नसल्याची सारवासारवही त्यावेळी करण्यात आली होती. पण त्यानंतर मात्र याचा परिणाम झाला की काय कोण जाणे पण हा संघ बर्यापैकी कामगिरी करतो आहे.
या स्पर्धेतील बंगलोर, हैदराबाद आणि मुंबई हे तिन्ही संघ सुरवातीला तगडे मानले जात होते. कारण या तिन्ही संघात तसे खेळाडूही आहेत. पण तिन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सहाजिकच त्याचे परिणामही आता दिसू लागली आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी या खेळाडूंवर कोट्यावधी पैसे लावले आहेत. त्यांच्यासाठी मोठी एड कॅंपेनही केली. त्यासाठी बॉलीवूडच्या तार्यांना आणून नाचवलं. तरीही संघात जोश येत नाही. म्हटल्यावर काय करणार. मग लिकरकिंग मल्ल्यांनीच आपल्या कॉर्पोरेट संस्कृतीला साजेल असे 'हायर अँड फायर' पाऊल उचलले आणि चारू शर्मा व व्यंकटेश शर्मा यांची गच्छंती झाली. आता सीईओपदी ब्रिजेश पटेल या माजी क्रिकेटपटूची नियुक्ती केली असून त्याच्यामुळे तरी संघाची कामगिरी सुधारेल अशी आशा आहे. हैदराबादमध्ये तर ट्वेंटी-२० स्पर्धेचा हुकमी एक्का एडम गिलख्रिस्ट आहे. तरीही या संघाने पराभव पाहिले. त्यात व्ही.व्ही.एस. हा संघाचा कर्णधार. या बापड्याने कधीच कर्णधारपद भूषवले नव्हते. त्यात ट्वेंटी-२० क्रिकेट आणि त्याची शैली यांचा मेळ कुठेही बसणारा नव्हता. तरीही त्याला कर्णधार केले. अशावेळी पराभव पहावा लागणार नाही तर काय? या पराभवाला कंटाळल्यामुळेच की काय पण त्याला परवाच्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात बाजूला बसवले होते. आणि संघाला चक्क विजय मिळाला. या सगळ्यांचा मतितार्थ एकच आहे. हे कॉर्पोरेट वॉर आहे. इथे प्रत्येकाला विजय हवा. आम्ही पैसे मोजले आहेत. आम्हाला विजय पाहिजे आहे. मग तुम्ही काहीही करा. एवढेच त्यांचे म्हणणे आहे. यामुळे क्रिकेट लहान ठरले आहे. खेळाडू लहान ठरले आहे. कॉर्पोरेट मंडळी मात्र मोठी झाली आहेत. विजय खेळाडूंचा नव्हे, तर या कॉर्पोरेट मंडळींच्या फ्रॅंचाईझींचा होतो आहे. |
या सगळ्यांचा परिणाम 'क्रिकेट' नावाच्या खेळावर मात्र विपरीत होऊ शकतो. कारण सतत चांगली कामगिरी करायच्या दबावामुळे कामगिरी खालावली तर खेळाडूंचा आत्मविश्वास खच्ची होऊ शकतो. |
|
|
मल्ल्यांनी आतापर्यंत बिझनेसमध्ये कधी पराभव पाहिलेला नाही. त्यांना हवे ते त्यांनी मिळवले. मग त्यासाठी वाट्टेल ते पैसे का लागेनात. फॉर्म्युला वन स्पर्धेतही म्हणूनच ते उतरले. तिथेही त्यांच्या फोर्स वन संघाने नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. पण क्रिकेटमध्ये मात्र ते साफ अपयशी ठरले. त्यामुळे त्याचा राग त्यांना या दोघांच्या हकालपट्टीतून काढल्याचे बोलले जाते. पण क्रिकेट हा खेळ आहे. इथे जय पराजय होतच असतात हे या कॉर्पोरेट मंडळींनी समजून घ्यायला हवे. सततच्या पराभवानंतरही विजयाची पहाट उगवतच असते. कोणताच संघ सलग जिंकू शकत नाही. कारण जय पराजय हाच तर खेळाचा नियम असतो. पण या कॉर्पोरेट मंडळींना आता क्रिकेटपटूंना आपल्या पद्धतीप्रमाणे 'पिळून' काढायला सुरवात केली आहे. त्यांची कामगिरी जेवढी चांगली होईल, तेवढे त्यांना हवे आहे. त्यापुढे तो क्रिकेटपटू, त्याची करीयर हे सगळे गौण आहे. या सगळ्यांचा परिणाम 'क्रिकेट' नावाच्या खेळावर मात्र विपरीत होऊ शकतो. कारण सतत चांगली कामगिरी करायच्या दबावामुळे कामगिरी खालावली तर खेळाडूंचा आत्मविश्वास खच्ची होऊ शकतो. त्याचवेळी चांगला खेळ करायचा तर आयपीएलमध्ये करावा. कारण तिथे पैसे मिळतात. देशासाठी खेळण्यापेक्षाही जास्त पैसे मिळतात. ही भावना रूजली तर मग देशापेक्षाही आयपीएल मोठी होऊ शकते, हा धोका आहे. त्याचवेळी क्रिकेटपटूंनीही स्वतःला ओळखायला हवे. ट्वेंटी-२० च्या क्रिकेट संघातही ज्या लक्ष्मणची निवड झाली नव्हती, तो एका संघाचा कर्णधार कसा काय होऊ शकतो? त्याचा खेळ आणि ट्वेंटी-२० यांचा दुरान्वयेही संबंध नाही. याचा अर्थ तो 'गया गुजरा' खेळाडू नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे स्थान कुणीही नाकारणार नाही. पण म्हणून ट्वेंटी-२० त्याने उतरावे याचेच आश्चर्य वाटते. तीच कथा राहूल द्रविडची. राहूलचा खेळही ट्वेंटी-२० ला साजेसा नाही. तरीही तो कर्णधार आहे. अशा वेळी मग या खेळाडूंकडून अपेक्षित ती कामगिरी कशी होणार? .....
आयपीएलच्या खेळाडूंसाठी बोली लावली जात असताना या क्रिकेटपटूंना पैसे दिसले होते. आता या पैशांमागची स्पर्धा आणि विजयाचा हव्यासही दिसला असेल.