हल्ली म्हणे भारतात चिमण्या कमी झाल्यात!
हल्ली म्हणे भारतात चिमण्या
कमी झाल्यात.
बहुतेक साऱ्या दाणे टिपायला,
परदेशी गेल्यात.
डॉलरचे दाणे टिपतां टिपतां
भल्याभल्यांचे उडतात होश!
त्या तर बिचाऱ्या चिमण्या,
त्यांचा तरी काय दोष?
आपल्याही घर-अंगणातला,
बंदच झालाय् चिवचिवाट.
घरटी एक पांखरू तरी
स्थिरावलय् परदेशात.
करियर करियर करताना
परत यायचे नाव नाही.
मागच्या साऱ्यांच्या एकटेपणाच्या
वेदनेला ठाव नाही.
रिकाम्या पडलेल्या घरांचे,
जगण्यातले अर्थच हरवलेत.
ज्यांचे भविष्य आकारले ते,
घरापासूनच दुरावलेत.
उज्वल भविष्य बघतां बघतां,
इथे अंधारलेले कधीतरी कळेल.
जुन्या घरट्याची आठवण येऊन,
हरवलेली वाट परत मिळेल.
ह्या एका आशेवर,
चिमणा चिमणी जगताहेत.
मुद्दल नाही तर 'व्याजासाठी' तरी
रिकामे घरटे जीवापाड जपताहेत.