बायको जर नसेल तर.....
बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा
खरंच गंभीर गुन्हा आहे !
खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
पानही हालत नाही...
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !
नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?
स्वच्छ, सुंदर,पवित्र घर
बायकोमुळेच असतं...
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !
वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय
म्हणूनच जास्त असते !
तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी
दिवस रात्र धावते !
चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?
बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका..
बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !
बायको म्हणजे सप्तरंगी
इंद्रधनुष्य घरातलं !
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !
नवरोजी बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..
कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !
घरासाठी झटणाऱ्या सर्व जणींना मनापासून समर्पित