शतकानंतर आज पाहिली
शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते होउनि उठले.. भारतभूमिललाट
आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट
दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट
पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट
कवी- वसंत बापट