बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (15:34 IST)

मूर्ख शास्त्रज्ञ

एका शहरात चार मित्र राहत होते. त्या पैकी तीन शास्त्रज्ञ होते पण बुद्धिमान नव्हते. चवथा शास्त्रज्ञ नव्हता पण बुद्धिमान होता. एकदा चारही मित्र विचार करतात की आपल्या ज्ञानाच्या किंवा विद्येचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा आपण परदेशात जाऊन पैसे कमावू. असा विचार करून ते परदेशात जाण्यासाठी निघाले. 
 
थोड्याच अंतरावर जाऊन त्यापैकी एक म्हणतो की आपल्या चारही पैकी एक विद्वान नाही तो फक्त हुशार आहे. आणि पैसे मिळविण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि विद्येच्या चमत्कारानेच आपण त्यांना प्रभावित करू शकतो. म्हणून आम्ही या मूर्खाला आपल्या पैशातील काहीही भाग देणार नाही. तो परत जाऊ शकतो. 
 
दुसऱ्या मित्राने त्याच्या या म्हणण्याला पुरजोर दिला पण तिसरा मित्र म्हणाला की 'हे ठीक नाही आपण बालपणापासून एकमेकांच्या सुखदुःखाचे सहभागी आहोत. आपण जे काही कमावू त्यापैकी त्यामध्ये हा देखील वाटेकरी असणार. आपल्या -परक्याचा भेद करणे हे छोट्या मनाच्या लोकांचे काम आहे. उदारमतवादी लोकांसाठी सर्व जग हे त्यांचे कुटुंब आहे. आपल्याला उदारवादी असावे.
 
ते चौघे पुढे वाढू लागले. थोड्याच अंतरावर त्यांना जंगलात एक मेलेल्या सिंहाचा सांगाडा दिसतो. त्याचे अंग विखुरलेले होते. त्या तिन्ही अतिशहाण्या विद्वानांनी म्हटले की चला आपण आप-आपल्या मिळालेल्या ज्ञानाची परीक्षा करावी. आपल्या ज्ञानाच्या प्रभावामुळे आपण या मृत शरीरात नवे प्राण घालू आणि ह्याला जिवंत करू .एकाने त्याचे हाड गोळा केले, दुसऱ्यानं त्याला चामडं, मांस आणि रक्त दिले. तिसऱ्याने त्यामध्ये प्राण घालण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली. इतक्यात चवथा म्हणाला की थांबा मित्रांनो 'आपण हे काय करीत आहात? हा सिंह आहे ह्याच्या मध्ये प्राण टाकू नका असं केलेस तर तो जिवंत होऊन आपल्याला खाऊन टाकेल.' 
 
तिघेही मित्रांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला म्हणाले की आम्ही आपल्या विद्येच्या बळावर हे अवघड काम केले आहे आता तू देखील काही ज्ञान जाणत असेल तर दाखव. त्यावर तो चवथा मित्र म्हणतो की आपल्याला काय आपले ज्ञान दाखवायचे आहे ते दाखवा. पण त्यापूर्वी मी त्या समोरच्या झाडावर चढून बसतो. असे म्हणत तो झाडावर जाऊन बसतो. तिसऱ्या शास्त्रज्ञाने त्या सिंहामध्ये प्राण टाकतातच तो सिंह जिवंत होतो आणि आपल्या समोर असलेल्या त्या तिन्ही मित्रांना ठार मारतो.पण चवथा मित्र आपल्या हुशारीने आपले प्राण वाचवतो. म्हणून शास्त्रात निपुण असणे पुरेसे नाही. व्यावहारिकतेचे धोरण असणे महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी बुद्धीचा वापर देखील करावा लागतो. नीतिमान विद्वान देखील मूर्खा सारखे वागण्यामुळे उपहासाचे पात्र बनतात.