पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात देवदत्त नावाचा ब्राह्मण त्याच्या पत्नी सोबत राहत होता. दोघांनाही मूलबाळ नव्हते. अखेर काही वर्षांनी त्यांच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. तसेच ब्राह्मणाच्या पत्नीचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते. एकदा ब्राह्मणाच्या पत्नीला घराबाहेर एक लहान मुंगूस दिसले. त्याला पाहून तिला त्याची दया आली आणि तिने त्या मुंगुसाला घरात नेले आणि आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली.
आता पती कामाला गेल्यानंतर ब्राह्मणाची पत्नी अनेकदा मुलाला आणि मुंगूसला घरी एकटी सोडून पाणी भरायला जात असे. मुंगूस मुलाची काळजी घेत असे. दोघांमधील अपार स्नेह पाहून दोघे पती-पत्नीला खूप आनंद झाला.
एके दिवशी ब्राह्मण कामानिमित्त बाहेर गेला होता. तसेच ब्राह्मणाची पत्नी देखील आपल्या मुलाला घरात एकटी सोडून बाहेर गेली. त्यावेळी त्यांच्या घरात साप घुसला. इकडे मूल झोपले होते. साप वेगाने मुलाकडे जाऊ लागला. जवळच मुंगूसही होता. मुंगूसला साप दिसताच तो सावध झाला. मुंगूस पटकन सापाकडे धावला आणि बराच वेळ दोघांमध्ये युद्ध झाले. शेवटी मुंगूसाने सापाला मारून मुलाचे प्राण वाचवले. सापाला मारल्यानंतर मुंगूस घराच्या अंगणात आरामात बसले. व ब्राह्मणाच्या पत्नीची वाट पाहू लागले. आता थोड्या वेळाने ब्राह्मणाची पत्नी घरी परतली व दरवाजात मुंगूसाचे रक्ताने भरलेलं तोंड पाहताच ती घाबरली. मुंगूसाचे तोंड सापाच्या रक्ताने माखले होते पण ब्राह्मणाची पत्नीला वाटले की याने आपल्या मुलाला ठार केले. ती रागाने थरथरू लागली. मुंगूसने आपल्या लाडक्या मुलाला मारले असे तिला वाटले. असा विचार करत असतानाच ब्राह्मणाच्या पत्नीने पाण्याने भरलेला हंडा मुंगुसाला मारून फेकला. या मध्ये मुंगसाचा प्राण गेला. ब्राह्मणाची पत्नी आपल्या मुलाला पाहण्यासाठी घरात पळत आली. तिथे मुल हसत खेळत खेळत होते. यावेळी तिची नजर जवळच पडलेल्या मृत सापावर पडली.हे दृश्य पाहताच ब्राह्मणाची पत्नीला पश्चाताप झाला. रागाच्या भरात तिने विचार न करता मुंगूस मारले. आता ब्राह्मणाची पत्नी जोरजोरात रडू लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
त्याचवेळी ब्राह्मणही घरी परतला. बायकोचा रडण्याचा आवाज ऐकून तो घराच्या आत धावला. त्याने विचारले, "प्रिये, का रडतेस, काय झाले?" तिने सर्व हकीकत पतीला सांगितली. मुंगूसाच्या मृत्यूची बातमी ऐकून ब्राह्मण फार दुःखी झाला.
तात्पर्य : विचार न करता रागाच्या भरात कोणतेही काम करू नये. त्याचेपरिणाम वाईट घडतात.
Edited By- Dhanashri Naik