मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (15:39 IST)

सिंधी माणसाची गोष्ट

मी लहानपणी एका सिंधी माणसाची गोष्ट ऐकली होती. ती गोष्ट अशी होती. 
 
एका गावात एक सिंधी माणूस रस्त्यावर मीठ विकायला बसायचा. तो ज्या किंमतीत मीठ विकत घ्यायचा त्याच किंमतीत विकायचा. त्यामूळे त्याच्याकडचा मिठाचा दर सर्वात स्वस्त असायचा. हा सिंधी माणूस जेथे मीठ विकायला बसायचा त्याच्या जवळच एका मारवाडी माणसाचे किराणा मालाचे दुकान होते. हळू हळू त्या मारवाडी माणसाच्या लक्षात येऊ लागले की त्याचे मीठाचे गिर्‍यहाईक कमी कमी होत चालले आहे. तो सिंधी माणूस जर खरेदीच्या किंमतीतच मीठ विकत असेल तर त्याला फायदा काय मिळतो असे त्याला वाटायचे. शेवटी त्या मारवाडी दुकानदाराने त्या सिंधी माणसाला गाठलेच!
 
‘या धंद्यात तुम्हाला फायदा काय मिळतो?’त्या मारवाडी दुकानदाराने त्या सिंधी माणसाला विचारले. 
 
त्या सिंधी माणसाने मीठाचे रिकामे पोते दाखवले आणि म्हणाला, ‘हे पोते विकून जे पैसे मिळतात तोच माझा प्रॉफीट!’सिंधी माणसाने उत्तर दिले. 
 
‘असा किती प्रॉफिट मिळतो?’त्या मारवाड्याने विचारले. 
 
‘मी रोज 100 रुपयांचे मीठ आणतो आणि 100 रुपयांनाच विकतो. मीठाबरोबर हे पोते मिळते ते विकून मला रोज 2 रुपये मिळतात. हाच माझा प्रॉफीट!’त्या सिंधी माणसाने उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून तो मारवाडी माणूस त्या सिंध्याची कुचेष्टा करत निघून गेला. 
 
पुढे काही वर्षांनी त्याच सिंधी माणसाने ते मारवाड्याचे दुकान विकत घेतले. 
 
ही गोष्ट मी गंमत म्हणून ऐकली होती. या गोष्टीचा जो शेवटचा भाग आहे, म्हणजे तो सिंधी माणूस त्या मारवाडी माणसाचे दुकान विकत घेतो, ही गोष्ट मला अशक्यप्राय किंवा एखादी परीकथा वाटायची. रस्त्याच्या कडेला बसून विकत घेतलेल्या किंमतीत मीठाची विक्री करणारा सिंधी माणूस त्या मारवाड्याचे दुकान कसे काय विकत घेऊ शकेल? मारवाड्याचे दुकान विकत घ्यायचे म्हणजे त्याला भरपूर पैसे लागणार. हे पैसे त्या सिंध्याकडे कुठून येणार? म्हणून मला ही गोष्ट बनावट वाटायची. 
 
पण आता मला या गोष्टीच्या सत्यतेबद्दल खात्री वाटू लागली आहे. 
 
तो सिंधी माणुस रोज 100 रुपयांचे मीठ विकत आणून तेवढ्यालाच विकायचा. मीठाचे जे पोते मिळायचे ते विकून त्याला 2 रुपये मिळायचे. याचा अर्थ त्याला 100 रुपये भांडवलावर रोज 2 रुपये नफा मिळायचा. याचा अर्थ त्याला रोज 2 टक्के नफा मिळत होता. त्याने जर महिन्यातले 25 दिवस मीठ विकले असे समजले तर त्याला 100 रुपये भांडवलावर दर महिन्याला 50 रुपये म्हणजे 50 टक्के नफा मिळत होता. (2रुपये रोजचा नफा X 25 दिवस). या हिशोबाने त्याला एका वर्षात 100 रुपये भांडवलावर 600 रुपये म्हणजेच 600 टक्के (मूळ भांडवलाच्या 6 पट) नफा मिळत हेता. या काळात त्याने ‘त्याच्याकडे सर्वता स्वस्त मीठ मिळते’अशी इमेज निर्माण केली. पुढे त्याने मीठाची किंमत थोडी वाढवली. तो 100 रुपयांचे मीठ 105 रुपयांना विकू लागला. पोत्याची किंमत धरून त्याचा ‘डेली प्रॉफीट’7 रुपये म्हणजे 7 टक्के झाला. पुढे त्याने किंमत अजून वाढवली आणि ‘डेली प्रॉफीट’10 टक्यांवर नेऊन ठेवला. या हिशोबाने त्याला 100 रुपये भांडवलावर महिन्याला 250 रुपये म्हणजे वर्षाला 3000 रुपये म्हणजे 3000 टक्के प्रॉफीट मीळू लागला. मग त्याने भांडवलात हळू हळू वाढ करायला सुरवात केली. 1000 रुपये भांडवलावर तो महिन्याला 2500 रुपये म्हणजेच वर्षाला 30000 रुपये, 10000 रुपये भांडवलावर महिन्याला 25000 तर वर्षाला 3 लाख, तर 1 लाख रुपये भांडवलावर महिन्याला 2.5 लाख तर वर्षाला 30 लाख रुपये प्रॉफीट कमावू लागला. झालेला प्रॉफीट हा धंद्यातच गुंतवायचा असे सिंधी लोकांचे धोरण असते. त्या मूळे त्याला त्या मारवाडी माणसाचे दुकान विकत घणे सहज शक्य झाले. 
 
एका सिंधी माणसाला धंद्याचे जे गणित कळले ते आपल्याकडच्या सुशिक्षीत, उच्चशिक्षीत आणि स्वतःला विद्वान समजणार्‍या मंडळीना अजून कसे समजत नाही याचे मला आश्चर्य वाटते. अजुनही आपण बँकेमध्ये मिळणार्याच 8 टक्के ते 10 टक्के व्याजावर खुष असतो. 
 
मला सिंधी समाजाविषयी अतीव आदर आहे. कोणा एकेकाळी सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रदेशातली ही समृद्ध व्यापारी जमात. कोण्या एकेकाळी कराचीवर यांचे राज्य होते. स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीला मुंबईपेक्षाही जास्त महत्व होते. भारताची फाळणी झाली नसती तर कदाचीत कराची ही भारताची आर्थिक राजधानी झाले असते. फाळणींमध्ये सर्वात मोठा फटका बसला तो या सिंधी जमातीला! त्यांना कोट्यावधी रुपयांची संपत्ती टाकून किंवा कवडीमोलाच्या भावाने विकून ‘निर्वासीत’म्हणून भारतात यावे लागले. भारत सरकारने उभारलेल्या सिंधी छावण्यांमधून ‘निर्वासीत’म्हणून अत्यंत कनीष्ठ पद्धतीचे जीवन जगावे लागले. अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. मुंबईजवळची उल्हासनगर आणि पुण्याजवळची पिंपरी या दोन छावण्या तर प्रसिद्धच आहेत. पण असे असुनही या लोकांनी कधी हार मानली नाही की हातात भिकेचा कटोरा घेतला नाही. श्रीमती आशा भोसले सांगतात की त्या पूर्वी जेव्हा लोकलमधून प्रवास करायच्या ( आशाताईंनी मुंबईच्या लोकलमधून भरपूर प्रवास केला आहे, अर्थातच गरिबीमूळे!) तेव्हा त्यांना अनेक सिंधी मुले लोकलच्या डब्यामध्ये लिमलेटच्या गोळ्या किंवा बिस्कीटे विकताना दिसायची. आता यातील बरीच मुले मुंबईतील प्रतिष्ठीत व्यापारी झाली आहेत. 
 
शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात. पण शिक्षणाने माणूस ‘कमी शहाणा’होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला मराठी समाज!.(यांमध्ये मी सुद्धा आलो.) आज मराठी समाजाची अवस्था ‘पढत मूर्ख’अशी झाली आहे. खऱ्या) ज्ञानापेक्षा डिग्री, डिप्लोमाची कागदाची सर्टिफिकेट्स आणि परिक्षामध्ये मिळणारे मार्क्स आणि ग्रेडस यांना महत्व आलेले आहे. शिक्षणाने ‘व्हॅल्यु ऍडिशन’न होता ‘व्हॅल्यु डिव्हॅल्युएशन’होऊ लागले आहे. ज्या शिक्षणाचा पुढे काही फारसा उपयोग होत नसतो असे शिक्षण घेण्याकडे प्रचंड पैसा आणि आयुष्याची उमेदीची वर्षे वाया घालवण्याची सवय आपल्याला लागली आहे. याचा अर्थ कोणी शिक्षण घेऊ नये असा होत नाही. शिक्षणाला महत्व हे आहेच पण त्याची मर्यादा आता ओळखायला हवी. अर्थात हे माझे वैय्यक्तीक मत आहे. अनेक जण माझ्या मताशी सहमत होणार नाहीत याची मला पुर्ण कल्पना आहे. तसेच माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
 
रस्त्यावर बसून मीठ विकणार्या सिंधी माणसाला जी ‘व्यावहारीक अक्कल’आहे त्याच्या निम्मी जरी व्यावहारीक अक्कल आपल्या लोकांना आली तरी खूप झाले असे मी म्हणेन.
 
अर्थात अशी व्यावहारीक अक्कल आणायची की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे.