बोध कथा : ब्राह्मणी आणि मुंगूस
एका गावात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ज्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीने एक मुलाला जन्म दिला त्याच दिवशी त्याच्या घरात एका बिळात राहणाऱ्या मुंगुसाच्या पत्नीने म्हणजे मादी मुंगुसाने देखील एका बाळ मुंगूसला जन्म दिला. देवशर्माची पत्नी खूप प्रेमळ होती तिने त्या बाळ मुंगूसचा सांभाळ देखील आपल्या मुलाप्रमाणेच केला. मुंगूस देखील मुलासह खेळायचा, दोघांमध्ये जिव्हाळा होता. देवशर्माची बायको नेहमी त्या दोघांना खेळताना बघायची पण कुठे न कुठे तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. म्हणजे तिला नेहमी ही भीती असे की हा मुंगूस माझ्या बाळाला काही इजा तर देणार नाही न. कारण प्राण्यांना बुद्धी नसते ते काहीही करू शकतात.
एके दिवशी तिची ही शंका खरी ठरते. देवशर्माची बायको आपल्या मुलाला एका झाडा खाली झोपवून जवळच्या तलावावर पाणी आणायला जाते आणि ब्राह्मणाला मुला कडे लक्ष द्यायला सांगते जेणे करून तो मुंगूस मुलाचा चावा घेऊ नये. ब्राह्मण विचार करतो की मुंगूस आणि माझा मुलगा तर मित्र आहेत मग मुंगूस का बाळाला चावेल किंवा काही इजा देईल असं विचार करून तो बाळाला एकट्याला सोडून गावात भिक्षावळी घेण्यास निघून जातो. तेवढ्यात एक साप त्या बाळाच्या दिशेने वाढतो. मुंगूस त्या सापाला बघून त्याला बाळाच्या जवळ जाण्यापासून रोखतो. दोघांचे युद्ध होतात शेवटी मुंगूस त्या सापाचे तुकडे करून त्याला मारून टाकतो आणि बाळाचा जीव वाचवतो.
त्याचे तोंड रक्ताने माखलेलं असतं. तो मुंगूस ब्राह्मणी कडे जातो की कदाचित ती त्याचे कौतुक करेल, पण त्याचे तोंड रक्ताने माखलेले बघून ती ब्राह्मणी विचार करते की ह्याने माझ्या मुलाचे काही बरे वाईट केले आहे. असा विचार करीत ती आपल्या डोक्यावरचे पाण्याने भरलेले माठ जोरात त्या बाळ मुंगूस वर आपटते. जोराचा मार लागून तो बेचारा मुंगूस तिथेच ठार होतो. काही अघटित घडलेले असावे असा विचार करीत ती आपल्या बाळाच्या दिशेने धावत पळत येते आणि येऊन बघते तर काय तिचे बाळ आरामात निजलेले होते आणि त्याच्या थोड्या अंतरावर एक साप मरून पडलेला असतो. तिला सापाला बघून घडलेले लक्षात येते आणि तिला आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.
तिला लक्षात येतं की तिने एका निर्दोष मुंगुसाला मारले आहे ज्याने तिच्या बाळाचा जीव वाचवला. तीला रडू कोसळते आणि ती जोर जोरात रडू लागते. तेवढ्यात तिचा पती तिथे येतो आणि रडण्याचे कारण विचारतो तर ती त्याला घडलेले सारे काही सांगते. आणि त्याला मुलाला एकटे सोडून गेल्या बद्दलचे कारण विचारते तेव्हा तो तिला मी भिक्षावळीला गेलो असे सांगतो. त्यावर तुम्ही माझे म्हणणे ऐकले नाही आणि भिक्षावळीचा लोभ केला म्हणून हे घडले आणि मी न जाणता त्या बेचाऱ्या मुंगुसाचे जीव घेतले. असे म्हणून ते दोघे रडू लागले.
तात्पर्य : न जाणता कृती केल्याने पश्चाताप करायची पाळी येते.