बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By मनोज पोलादे|

अरूण साधू

पत्रकारिता व साहित्याचा वारकरी

अरूण साधूंनी पत्रकारिता ते साहित्यिक असा प्रवास केला आहे. नागपूरला नुकत्याच झालेल्या ऐंशीव्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वर्तमानपत्रातील बातमीदार ते संपादक असा यशस्वी प्रवास करतानाच त्यांच्यातला संवेदनक्षम साहित्यिकही जागा होता.

त्यामुळेच जे त्यांनी पाहिले ते सगळेच बातमीत आले नाही, पण ते साहित्यात आले. साधूंची जन्मभूमी विदर्भ. अचलपूर त्यांचे गांव. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून त्यांचे विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले.

त्यांचा पिंड मुळात लेखकाचा असल्याने त्यांनी विज्ञान शाखा सोडून पत्रकारितेत कारकीर्द करण्याचा विचार मनाशी पक्का केला. आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर एकेक पायरी चढत थेट इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकपदापर्यंत ते जाऊन पोहोचले.

पत्रकारितेत काम करताना विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांशी पत्रकारांचा संबंध येत असतो. समाजकारण, राजकारण, प्रशासनाशी रोज येणार्‍या संबधातून नवनवीन अनुभवांनी पत्रकारांच्या जाणीवा समृद्ध होत असतात. हे अनुभव लेखनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम साधूंनी केले.

पत्रकारितेसोबतच त्यांनी अष्टपैलू लेखन करून साहित्य क्षे‍त्रात भरपूर योगदान दिले. ‍त्यांच्या ' सिंहासन, मुंबई दिनांक' या कादंबर्‍या खूप गाजल्या. राजकीय क्षेत्रातील शह काटशहाची समीकरणे त्यांनी यात मांडली. या कादंबर्‍यांवर ' सिंहासन' हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटही आला.

तोही गाजला. सत्तांध, मुखवटा, शोधयात्रा ही त्यांची इतर पुस्तके. त्यांनी चीनवर लिहिलेले ' ड्रॅगन जागा झाल्यावर' हे पुस्तक त्यांच्या सूक्ष्म अभ्यासू निरिक्षणशक्तीचे निदर्शक आहे.

विक्रम सेठ यांच्या ' अ सुटेबल बॉय' या बुकर पारितोषिक प्राप्त पुस्तकाचा शुभमंगल या नावाने अनुवादही श्री. साधू यांनी केला आहे. साधू यांनी दूरचित्रवाणी मालिकांसाठी पटकथा लेखनही केले आहे.

राजकारण हा त्यांचा आवडता प्रांत. त्यामुळे त्यांच्या लेखनात तसे संदर्भ येत जातात. राजकीय, सामाजिक परिस्थितीचे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींवर होणारे परिणाम व उमटणारी प्रतिकिया याचा अनुभव त्यांच्या लेखनातून येतो.

उगाच कल्पनेच्या भरार्‍या मारण्यात त्यांना रस नाही. आपल्या वास्तव लेखनातून वाचकाच्या डोळ्यासमोर ते कालपट उलगडून दाखवित असतात. वर्तमान पत्रातील स्तंभलेखन व साहित्यिक लेखनातून त्यांच्या समाजवादी विचारसरणीचे प्रत्यंतर येत असते.

मध्यंतरी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभाग प्रमुखाची भूमिकाही यशस्वीपणे पार पाडली. नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.


अरूण साधू यांनी केलेले लेखन-

मुंबई दिनांक
सिंहासन
सत्तांध
ड्रॅगन जागा झाल्यावर
शोधयात्रा