रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By मनोज पोलादे|

व्यंकटेश माडगूळकर

माणसं चितारणारा लेखक

सांगली जिल्ह्यातील माणदेश परिसर पर्जन्यछायेखाली येतो. त्यामुळे त्याचे वर्णन वाळवंटी, निष्पर्ण, उजाड असेच करता यईल. पश्चिम महाराष्ट्र एकीकडे कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांमुळे हिरवागार बनलेला असताना माणदेश परिसर मात्र दुष्काळाच्या झळा सहन करतो आहे.

या वाळवंटी रूक्ष भागाने संपूर्ण महाराष्ट्राला साहित्यरूपी ओलावा पुरविणारे खळाळते निर्झर दिले. ग. दि. माडगूळकर व त्यांचे बंधू व्यंकटेश माडगूळकर. कथा, कादंबरी, पटकथा लेखन, गीतलेखन हे क्षेत्र त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

गदिमा या मोठ्या वृक्षाखाली व्यंकटेश माडगूळकरांचे रोपटे खुरटले नाही, तर स्वतंत्रपणे जोरदार वाढले. कथा व कादंबरीकार ही प्रामुख्याने त्यांची ओळख. यासोबतच त्यांनी ललित लेखनसुद्धा केले. अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.

माणदेशचा परिसर हा वरवरून रूक्ष वाटत असला तरी येथील माणसांमध्ये सांस्कृतिक वैविध्य आहे. इथल्या माणसाचे जगणे त्यांनी शब्दात मांडले. जे दिसलं तसं मांडले त्यामुळे त्यात एक सच्चेपणा आहे. त्यांचे माणदेशी माणसे हे पुस्तक आले आणि साहित्य जगाला त्याची दखल घ्यावी लागली.

सर्वसामान्यपणे बहूजन समाजातील व्यक्तींचे चित्रण मांडणारे हे पुस्तक अंतर्मुख करणारे आहे. यातील देवा सटवा महार ही कथा तर दलित साहित्यातील पहिली कथा असल्याचे गो. मा. प वार यांच्यासारख्या समीक्षकांचे मत आहे. त्यांच्या व्यक्तिचित्रात माणदेशही जिवंत होतो.

येथील माणूस रांगडा व ताठर दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणातून ओलावा पाझरत असतो. याचेच वर्णन व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतून येते. बनगरवाडी ही कादंबरी ओघवती लेखन शैली व प्रत्ययकारी चित्रण यामुळे उत्कृष्ट साहित्यिक कलाकृती ठरली आहे.

बनगरवाडी सोबतच माडगूळकरांच्या अनेक साहित्यिक कलाकृतींचे जागतिक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. जंगल सफारीचा त्यांचा छंद सर्वपरिचित आहे. जंगलांच्या सफरी व नैसर्गिक वन्य व प्राणी संपदेची वर्णने त्यांच्या नागझिरा, हिरवी वने, व रानमेवा या ललित लेखनांत आली आहेत.

व्यंकटेश माडगूळकर यांचे लेखन कॅनव्हासवर चित्र रेखाटल्याप्रमाणे सहज, सुंदर व ओघवते असते. त्यांच्या लेखनात दृष्य परिणाम असतो. याचे कारण माडगूळकर लेखकासोबतच उत्कृष्ट चित्रकारही होते. बनगरवाडी या कादंबरीवर प्रख्यात दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी बनगरवाडी नावाचा चित्रपटही बनविला आहे.

माडगूळकर यांच्या लेखनाला ग्रामीण पार्श्वभूमीसोबतच सामाजिक वास्तवाचा स्पर्श आहे. गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, पुढच पाऊल ( यावर चित्रपटही बनला आहे.), सत्तांतर यावरूनच त्याचा प्रत्यय येतो.

साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमीच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.


व्यंकटेश माडगूळकर यांची साहित्यसंपदा -

कादंबरी- बनगरवाडी, कोवळे दिवस, वावटळ, सत्तांतर, पुढंच पाऊल
कथासंग्रह- गावाकडच्या गोष्टी, जांभळाचे दिवस, हस्ताचा पाऊस, काळी आई
ललित गद्य- हिरवी कुरणे, रानमेवा, नागझिरा