गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मे 2020 (10:04 IST)

काटा....गोष्ट अपूर्णतेची....

आणि साहित्य व कलाविश्वातील रत्न हरपले.....बातमी कानावर आली आणि अंगावर काटाच आला...

रत्नाकर म्हणजे असंख्य रत्नांनी संपन्न असा समुद्र किंवा खाण.....

जगात समुद्र बऱ्याच ठिकाणी आहे पण असंख्य गूढकथा, बालनाट्य, एकांकिका, दोन अंकी नाटके, कादंबऱ्या, दिवाळी अंक, वृत्तपत्र स्तंभलेखन आणि लघुकथांच्या रत्नांची आरास मांडणारा हा साहित्य विश्वातील रत्नाकर(समुद्र) ह्या सम हाच.... 
आता ह्या समुद्राची शरीररुपी ओंजळ कायमची लुप्त झाली....पण विचार मात्र कायम राहत असतात कारण गोष्ट अपूर्णतेची आहे...

माझा संबंध मतकरींशी आला तो आज पासून २०१४ मध्ये, व्यक्तिशः नाही पण त्यांनी लिहिलेली एक कथा माझ्या एका लेखक मित्राने नाट्यरुपात मांडली....आणि मतकरींची परवानगी घ्यायला गेले असता, ते म्हणाले अरे हे नाटक रुपात सादर करणे अवघड आहे किंबहुना अशक्य.... तरी करा प्रयत्न, परवानगी मिळाली आणि माझ्या मित्राने ते शिवधनुष्य उचलायचे ठरवले आणि तालीम सुरू झाली... राज्य नाट्य स्पर्धेसाठी....पण गोष्ट अजुन अपूर्ण होती...

"सादर करत आहोत रत्नाकर मतकरी ह्यांच्या गुढकथेवर आधारीत दोन अंकी नाटक 
'वर्तुळ'... " , मला आजही आठवतोय माझ्या अंगावर आलेला तो रोमहर्षक काटा... मतकरी मी त्याआधी खूप वेळा वाचले होते, गुढकथांच्या शेवटी अंगावर येणारा काटा मी अगणित वेळा अनुभवला होता पण ह्यावेळ चा हा काटा वेगळा होता.... तो आदर, जबाबदारी आणि भीती ह्यामध्ये लपेटून आला होता... 
आदर त्या सिद्धहस्त लेखकाबद्दल,
जबाबदारी त्यांची कथा नाटकातून अभिनित करून प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची.... आणि भीती माझ्यासारख्या नवख्या नटाला मतकरींच्या प्रतिभेच हे वजन झेपेल का ह्याची? एका गूढ मंत्राने भारल्यासारखी आमची टीम काम करत होती अहोरात्र.... दिग्दर्शक, तंत्रज्ञ, सहकलाकार सगळेच भान हरपलेले... सर्वांचा मी आज ऋणी आहेच पण त्या सर्वांच्या वतीने मी कायम रत्नाकर मतकरी सरांचा ऋणी आहे...राज्यनाट्यला यशस्वी प्रयोग झाला.... प्रेक्षकांतून सुर उठला... जादू झाली... काटा आला... रोमांच उभे राहिले... दिग्दर्शक विशाल च्या अथक श्रमांना आणि माझ्यासोबत सर्वच साथीदारांच्या मेहनतीला प्रेक्षकांच्या तोंडून तारीफ, हातातून टाळी, उभे राहून अभिवादन आणि पाठीवर थाप मिळत होती.... उत्कृष्ट अभिनेत्री आणि प्रकाश योजनेचे पारितोषिक सुद्धा मिळाले पण गोष्ट अपूर्ण राहिली, काही कारणास्तव प्रयोगाला मतकरी येऊ शकले नव्हते...पण ह्या प्रयोगाची माहिती त्यांना मिळाली होती... त्यांना नाटक दाखवायचं होतं हीच ती अपूर्ण गोष्ट....

बरीच वर्ष लोटली....अनेक नाटकं सादर केली... दौरे केले... मालिकांमधून काम केले....मात्र मतकरींचे लेखन डोक्यात पिंगा घालतच राहिले....

लॉकडाऊन आला...आणि सगळं शांत झालं....मोकळा वेळ मिळाला आणि काय करावं हा प्रश्न मला पडलाच नाही.... मी सरळ पुस्तकाच्या कपाटातून मतकरी लिखित ऍडम कादंबरी काढली आणि २ बैठकीत वाचून संपन्न केली...
आनंदाचा क्षण...
मतकरींना कॉल केला, ऍडम ही अश्लील ठपका ठेऊन दुर्लक्षित केली गेलेली कादंबरी वाचली हे त्यांना सांगितले... त्यांनाही नवी पिढी वाचनवेडी आहे आणि चोखंदळ आहे ह्याचा परम आनंद झाला... त्यांच्या गुढकथांचे अभिवाचन करण्याचा माझा मानस मी त्यांना सांगितला.... विचार करून सांगतो म्हणाले....कॉल कट...
परवानगीसाठी मेसेज करून ठेवला आणि २ दिवसांत प्रत्युत्तर आले... गहिरे पाणी चे अभिवाचन करण्यास हरकत नाही...माझ्या आनंदाला आकाश ठेंगणं झालं होतं....पण गोष्ट अपूर्ण च होती अजून....

गहिरे पाणीचे अभिवाचन सुरू केले... ऐक टोले पडताहेत आणि काळी बाहुलीचे वाचन झाले... एफबी आणि यू ट्यूब वर तुफान प्रतिसाद मिळाला, पुढे काय ह्याची ओढ रसिकांना लागली... ह्याचे संपूर्ण श्रेय मी श्री. व सौ. मतकरी ह्यांना सविनय व्हॉट्स ऍप संदेश पाठवून कळविले. मन प्रसन्न झाले... पुढच्या तयारीला लागले...पण गोष्ट अपूर्णच होती अजून....

१७/०५ च्या रविवार चे वाचन मी काही कारणास्तव करू शकलो नाही....आणि आज १८/०५ सोमवारी सकाळी बातमी आली.... मतकरी  ह्यांचे कोरोनामुळे निधन.... दुचाकी चालवत असताना कॉल आला होता...बाजूला थांबलो....आणि पुन्हा एकदा सगळं आठवून अंगावरून तोच काटा आला... अनोळखी असे ४-५ संदेश आले आणि ओळखीच्यांचे तर बरेच....पण मला का? उत्तर होतं माझं मतकरी ह्या लेखकाशी अभिवाचक म्हणून निर्माण झालेले नाते... रसिकांनी मी मतकरींचा नातेवाईक असल्याप्रमाणे मला संदेश केले होते....हे ऋणानुबंध आजचे नक्कीच नाहीत....अनेक युगांचे आहेत...

माझ्या शालेय जीवनात असताना पु. ल. हयात होते पण भेटता नाही आलं... माझ्या शाळेत शिकलेल्या  पु. ल. आजोबांना एकदा तरी भेटाव असं माझ्या बालमनाला राहून राहून वाटत होतं. पु. ल. निवर्तले तेंव्हा अतीव दुःख झालं होतं....आज मतकरींना भेटून सगळं सांगायचं होतं... रसिकांच्या प्रतिक्रिया, माझं आदरयुक्त प्रेम व्यक्त करायचं होतं... तुमच्या कथांप्रमाणे लागत जाणारी ओढ... सगळं काही खूप खूप बोलायचं होतं.... सांगायचं होतं की आयुष्यात अनुभवायला येणारे सगळेच काटे बोचरे नसतात...आणि जीवन जगण्यातल गूढ ज्याला उमगले तोच असतो मृत्युंजयी बाकी सगळे कबंध...हे खूपवेळा अनुभवायला दिलंय तुम्ही.....पण आता ते नाही करता येणार कारण गोष्ट आता कायमची अपूर्ण राहिली आहे.... पण ह्या अपूर्णतेलाही पूर्णत्वाची झालर आहे... कारण अपूर्णतेतच असतो सुधारणेला वावं आणि प्रयत्नांची आस.... आणि ह्या प्रक्रियेतच असते एक अपूर्ण कथा आणि संपूर्ण समाधान....

नेहेमीच अपूर्ण असणाऱ्या आयुष्याच्या वर्तुळाला संपूर्ण समाधान देणाऱ्या सिद्धहस्त लेखक श्री. रत्नाकर मतकरी ह्यांच्या पुण्य स्मृतीस स्मरून हे विनम्र अभिवादन....

लेखक आणि अभिवाचक,
अभिषेक अरुण आरोंदेकर