गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

दत्तमहाराजांची तपोभूमी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी

- किरण जोशी

कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती' हा 'दुसरा अवतार' समजला जातो. दत्त महाराजांनी या ठिकाणी 12 वर्षे अर्थात एक तप तपश्चर्या केली आणि आपल्या पादुका स्थापन केल्या. त्यामुळेच या स्थानास महाराजांची तपोभूमी मानली जाते. याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप... असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो...
संथ वाहणार्‍या कृष्णा नदीच्या एक्कावन्न पायर्‍यांच्या घाटावर, मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर मनोहर पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आहे. या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटाघुमटांचा आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. 'श्री नरसिंह सरस्वती' हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा मानला जातो त्यामुळे येथील भक्तगण संन्याशी लोकांचे पूजन करून त्यांचे आदरातिथ्य करतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते.

WD
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते. इतरवेळी‍ ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे. पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात. वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी तर प्रसिध्दच आहे.
कसे जाल -
एस.टी मार्ग - मुंबई व पुणे येथून कोल्हापूर अथवा सांगली येथे येण्यासाठी थेट बसगाड्यांची सोय असून मुंबईपासून सुमारे 500 तर पुण्यापासून सुमारे 245 किलोमिटर अंतर आहे. कोल्हापूर अथवा सांगलीतून नृसिंहवाडीसाठी बसगाड्यांची सोय आहे. कोल्हापुर- 40 सांगली-25
रेल्वे - महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण मध्य रेल्वे मिरज-कोल्हापूर विभागाच्या जयसिंगपूर स्टेशनपासून 15 किलोमीटरवर. मुंबई, पुणे, बेळगांव येथून येथून कोल्हापूरसाठी रेल्वेगाड्या आहेत.
विमान - मुंबई व पुण्यातून कोल्हापूर येथे विमानसेवा आहे.