- धर्म
» - धर्मयात्रा
» - धर्मयात्रा लेख
नाशिकचे काळाराम मंदिर
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.