शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र तुळजापूर

- महेश जोशी, औरंगाबाद

WDWD
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.

श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.

तुळजा भवानी मंदि
WDWD
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूस पोस्ट ऑफिस आणि उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय असून, तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.

तुळजा भवानीची मूर्ती
WDWD
सरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

तुळजा भवानीचे पुराणातील उल्ले
WDWD
तुळजाभवानीबाबत पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुरानाचाच एक भाग आहे. याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवनीचे महत्व सांगण्यात आले आहे. तुळजाभवानीबद्दल पुढील अख्यायिका प्रसिद्ध आहे. स्कंध पुराणात देवीची अवतारकथा वर्णन करण्यात आली आहे. कृत युगात कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती एका मुलासह राहत असत. अनुभूती ही रतीप्रमाणेच सुंदर आणि सुशील होती. कर्दम ऋषीच्या निधनानंतर तिने सती जाण्याचे ठरविले मात्र तेवढात आकाशवाणी झाली. लहान मुल असल्यामुळे सती जाण्याची गरज नाही असे आकाशवाणीत सांगण्यात आले. यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय रद्द करीत मंदाकिनी नदीच्या काठी लहान मुलाला घेऊन तपश्चर्येला सुरुवात केली. यावेळी कुकूर नावाच्या राक्षसाची वाईट नजर तिच्यावर पडली.

सुरुवातीला त्याने तिला खूप त्रास दिला. नंतर त्याने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनुभूतीने देवीकडे प्रार्थना केली. मला या राक्षसापासून वाचव, संकटातून सोडव अशी अनुभूतीची याचना ऐकून देवी त्वरीत प्रकट झाली. या देवीला त्वरीता असे नाव देण्यात आले. मराठी याचाच अपभ्रंश होऊन तुळजाई असे देवीचे नाव झाले. तुळजाईलाच भक्तगण तुळजा भवानी असेही म्हणू लागले. अनुभूतीच्या मदतीला प्रकट झालेल्या देवी मातेने राक्षसाला ठार मारले. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी देवी मातेने कुकूर राक्षसाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. यानंतर अनुभूतीने देवीस कायमस्वरुपी तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्याच ठिकाणाला तुळजापूर असे नाव पडले.

‘महिषासूरमर्दिनी’ तुळज
WDWD
देवी मातेला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जाते. त्याबाबतही एक अख्यायिका प्रसिद्ध आहे. सृष्टीक्रम व्यवस्थित सुरू असताना महिषासूर नावाच्या राक्षसाने देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व महेश यांना संकटापासून वाचविण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करीत देवाने तेजाचा अतिप्रचंड अग्निस्तंभ निर्माण केला. त्रिभुवनाला व्यापून टाकणार्‍या प्रचंड तेजाच्या रुपाने साकार झालेली श्री तुळजाभवानी देवी महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध करण्यास तयार झाली. देवीने राक्षसाचे सर्व सैन्य ठार केले. तेव्हा स्वतः महिषासूर राक्षस महिषाचे रूप धारण करून देवीबरोबर लढू लागला. आपल्या पाशाचा वापर करून देवीने महिषासुराला बांधून टाकले.

नंतर महिषासुराने सिंहाचे रुप घेतले. तेव्हा देवीने तलवारीने सिंहास ठार मारले. महिषासुर पुन्हा महिषाचे रुप धारण करून आपल्या शिंगांनी देवीवर पर्वताचा वर्षाव करू लागला. देवीने बाणाचा मारा करून पर्वताचे तुकडे तुकडे केले. नंतर पायउतार होऊन त्या विषारी रेड्याला आपल्या पायाखाली चिरडून भाल्याने महिषासुर राक्षसाचा कंठनाळ छेदला. त्यानंतर महिषासूर राक्षास मनुष्यरूप धारण करून अर्धवट महिष व अर्धवट मानव या रुपात देवीबरोबर युद्ध करू लागला. तेव्हा संतप्त झालेल्या तुळजाभवानीने महिषासूर राक्षसाला तलवारीने ठार मारले. यासोबतच महिषासुराचा अवतारही संपला. यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते.

श्री तुळजाभवानी वीरवदायिनी, इंद्रवरदायिनी, रामवरदायिनी आणि महिषासूरमर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री तुळजाभवानी शक्ती देवता आहे. तुळजापूरची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. ज्या शिळा घाटावरून तुळजाभवानी देवीने प्रभू रामचंद्रास लंकेचा मार्ग दाखविला तो शिळाघाट अजूनही तुळजापूरला दिसून येतो. दरवर्षी अश्विन महिन्यात तुळजापूरला नवरात्र उत्सव मोठा प्रमाणावर साजरा केला जातो. देश परदेशातून भाविक देवीच्या चरणाला नतमस्तक होण्यासाठी गर्दी करतात. तुळजापूरहून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, निरा नृसिंहपूर आहे.

मंदिराचे वैशिष्ट्
WDWD
देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्‍या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत.

तुळजापूरला कसे जावेः
देशाच्या दक्षिण भागातून येणारे भाविक रेल्वेगाडीने तुळजापूरहून ३५ किलोमीटरवर असलेल्या नळदुर्ग येथे येतात. देशाच्या उत्तर भागातून येणारे लोक आधी सोलापूरला येऊ शकतात. सोलापूरहून तुळजापूर ४४ किलोमीटरवर आहे. उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुळजापूर १८ किलोमीटरवर आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथून तुळजापूरला येण्यासाठी भरपूर बस, गाड्या उपलब्ध आहे.

रेल्वे सुविधा- तुळजापूरला रेल्वेगाडीने यायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

हवाई सुविधा- हवाई मार्गे येऊ पाहणार्‍या भाविकांना पुणे किंवा हैदराबादला यावे लागेल. त्यातल्या त्यात पुणे हा जवळचा विमानतळ आहे.

रहाण्याची सोययात्रेकरूंना राहण्यासाठी तुळजापुरात श्री भवानी विश्रामगृह, गादा व सामल धर्मशाळा आहे. येथे तीन दिवस राहता येते. याशिवाय अनेक खासगी हॉटेल, लॉजिंग, बोर्डींग, धर्मशाळा आणि हॉटेल आहेत. देवीच्या पुजार्‍यांकडेही राहण्याची व लग्न, मुंज, अभिषेक, महानैवेद्य दर्शन आदींची सोय उपलब्ध आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...