गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

साहित्य संमेलनाच्या परंपरेचा उगम

१९०८ मध्ये झालेले संमेलन मराठी लेखकाचे संमेलन या नावाने भरले. १९०९ पासून महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने हे संमेलन भरू लागले.      
मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास शोधायचा असेल तर थेट १८७८ पर्यंत जावे लागते. यावर्षी ११ मे रोजी पुण्यात ग्रंथकारांची बैठक झाली. पुढे साहित्य संमेलन म्हणून रूढ झालेल्या परंपरेचा हा आरंभबिंदू. मराठी साहित्याची तत्कालीन स्थिती निराशाजनक असल्याने ग्रंथकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे, या भावनेतून ही बैठक बोलाविण्यात आली होती. यात न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी पुढाकार घेतला होता. 'ग्रंथकारांना उत्तेजन द्यावे. स्वस्त दराने ग्रंथ प्रसिद्ध व्हावे व वाचकांनी दरसाल पाच रूपयांचे ग्रंथ विकत घ्यावे' हा या बैठकीचा मूळ हेतू होता. तत्कालीन दैनिक 'ज्ञानप्रकाश'मध्ये हा हेतू स्पष्ट करणारे जाहीर पत्रकही प्रसिद्ध झाले होते.

PRPR
ही बैठक झाल्यानंतर पुढे फारसे काही घडले नाही. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १८८५ मध्ये कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा ग्रंथकारांची बैठक झाली. त्यात भाषेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर १९०५ मध्ये साताऱ्यात रघुनाथ पांडुरंग करंदीकर, १९०६ मध्ये पुण्यात वासुदेव गोविंद कानिटकर, १९०७ मध्ये रावबहादूर विष्णू मोरेश्वर महाजनी, १९०८ मध्ये पुण्यात चिंतामण विनायक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संमेलने झाली.

पहिल्या २७ वर्षांत फक्त तीन अधिवेशने झाली. त्यानंतर साधारणपणे दरवर्षी भरत गेली. १९०९ ते १९२६ या काळात संमेलन भरलेच नाही. पुढे ती सलग भरू लागली. पण १९६९ मध्ये यात पुन्हा खंड पडला. तीन वर्षे संमेलनच झाले नाही. १९८१ मध्ये दोनदा अधिवेशने झाली.

ही सर्व संमेलने, साहित्य संमेलने या नावाने भरली नाही. पहिल्या संमेलनाला मराठी ग्रंथकारांची सभा असे संबोधन होते. त्यानंतरची चार संमेलने मराठी ग्रंथकारांची संमेलने या नावाने भरली. १९०८ मध्ये झालेले संमेलन मराठी लेखकाचे संमेलन या नावाने भरले. १९०९ पासून महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने हे संमेलन भरू लागले. पण ही संमेलने महाराष्ट्राबाहेर भरू लागली त्यावेळी अडचण येऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्र या प्रदेश निदर्शक नावाऐवजी मराठी असे भाषाविषयक नाव घेतले जाऊ लागले. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन खर्‍या अर्थाने भरण्यास सुरवात झाली. हे संमेलन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे झाले, तसे महाराष्ट्राबाहेरीलही मराठी लोक जेथे जास्त प्रमाणात आहेत तेथेही झाले. इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा, हैदराबाद, रायपूर, बेळगाव यासह अगदी दिल्लीतही हे संमेलन झाले.