महिला गर्भावस्थेत असताना कोणताही सल्ला देताना डॉक्टर अगदी काळजीपूर्वक विचार करत असतात. त्यामुळंच आतापर्यंत गर्भवती महिलांसाठी कोरोनाचं लसीकरण टाळलं जात होतं.
पण आता सुरक्षिततेबाबत भरपूर माहिती गोळा झाल्यानंतर हा सल्ला बदलण्यात आला आहे. गर्भवती महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे कोव्हिडमुळं गर्भावस्थेतही धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
आम्ही काही अत्यंत ठोस असे दावे पाहिले असून, सोशल मीडियावरील दावे हे फोल का आहेत, ते आम्ही सांगितलंही आहे.
लस अंडाशयात जमा होते?
अंडाशयात लस साचत असल्याच्या दाव्याची अफवा ही एका जपानी संशोधनाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळं पसरली होती.
या संशोधनात मानवाला दिल्या जाणाऱ्या डोसपेक्षा अधिक प्रमाणात डोस (1,333 पट अधिक) उंदरांना देण्यात आला होता.
इंजेक्शन दिल्यानंतर 48 तासांनी केवळ 0.1% डोस या उंदरांच्या अंडाशयात आढळला होता.
तर याउलट इंजेक्शन दिल्यानंतर एका तासाने 53% आणि 48 तासांनी 25% लसीचा अंश केवळ इंजेक्शन दिल्या जाणाऱ्या जागी (साधारणपणे हाताच्या बाहीवर) आढळला.
त्याशिवाय आणखी एका अवयवात म्हणजे लिव्हरमध्ये सर्वाधिक (48 तासांनी 16%) प्रमाण आढळलं होतं. लिव्हर हे शरीरातील खराब पदार्थ बाहेर काढण्यास मदत करत असतं.
कोरोनावरील लस ही फॅट्सचा वापर करून तयार करण्यात आली आहे. त्यात व्हायरसच्या जेनेटिक तत्वांचा समावेश असतो. ते शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली सक्रीय करतात.
जे लोक याबाबत अफवा पसरवत आहेत, त्या अफवा प्रत्यक्षात फॅट्सबाबतच आहेत. कारण अंडाशयामध्ये फॅट्स आढळलं आहे.
इंजेक्शनच्या 48 तासांनंतर अंडाशयातील फॅट्सचं प्रमाण वाढतं, कारण लस ही इंजेक्शन दिलेल्या ठिकाणाहून पूर्ण शरीरारत पोहोचत असते.
पण त्यात व्हायरसची जेनेटिक तत्वं असतात याबाबत अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर हे संशोधन लीक झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र ही माहिती सार्वजनिकरित्या ऑनलाईन उपलब्ध आहे.
लसीमुळं गर्भपात होतो?
सोशल मीडियावर अशाही काही पोस्ट आहेत, ज्यात गर्भपाताकडं लक्ष वेधण्यात आलं. त्यासाठी व्हॅक्सिन-मॉनिटरिंग स्कीमद्वारे मिळालेल्या माहितीचा दाखला देण्यात आला आहे. त्यात अमेरिकेची व्हॅक्सिन अॅडव्हर्स इव्हेंट रिपोर्टिंग सिस्टीम (VAERS)आणि ब्रिटनच्या यलो कार्ड स्कीमचाही सहभाग आहे.
लसीकरणानंतर कुणालाही स्वतःच्या लक्षणांबाबत किंवा आरोग्याच्या स्थितीबाबत यावर माहिती देता येऊ शकते. प्रत्येकजण यावर माहिती देण्याबाबत विचार करणार नाही, कारण हा आपण स्वतः निवडत असलेला डेटाबेस आहे.
या डेटाबेसमध्ये गर्भपाताच्या काही घटनांची माहिती देण्यात आली होती. पण या घटना दुर्दैवी असल्या तरी त्या सामान्य अशा होता. लसीकरणामुळं त्या घडल्या असा अर्थ होत नाही.
लसीकरणानंतर गर्भपाताची जेवढी प्रकरणं समोर आली, ती सर्वसाधारणपणे होणाऱ्या गर्भपाताच्या प्रमाणाएवढीच म्हणजे 12.5% या प्रमाणानुसारच असल्याची बाब एका संशोधनात समोर आली आहे.
इंपेरियल कॉलेज लंडनमध्ये फर्टिलिटी इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर विक्टोरिया यांच्या मते, सर्वसाधारणपणे समोर येणाऱ्या दुष्परिणामांच्या तुलनेत लस घेतल्यानंतर जे दुर्मिळ दुष्परिणाम आढळतात त्यासाठी ही रिपोर्टिंग सिस्टीम उत्तम आहे.
उदाहरण द्यायचं झाल्यासं अॅस्ट्राझेनेका लशीमुळं विशिष्ट प्रकारच्या रक्ताच्या गाठी होत असल्याचं समोर आलं होतं, अशी माहिती देण्यासाठी ते उत्तम आहे.
त्यामुळं जर लस घेणाऱ्यांमध्ये काही असामान्य किंवा दुर्मिळ लक्षणं आढळली, तर याद्वारे इशारा दिला जातो.
मासिक पाळीत बदल होणं, गर्भपात आणि हृदयाशी संबंधित त्रास अशा सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांवर निगराणी ठेवण्यासाठी मात्र ही सिस्टीम तेवढी उपयुक्त नाही. यापूर्वी उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास केल्यास आपल्याला लस घेणाऱ्या किंवा लस न घेतलेल्यांमध्येही ही लक्षणं दिसणं ही सामान्य बाब आहे. त्यामुळं याबाबत इशारा दिला जात नाही.
जर लस न घेणाऱ्यांच्या तुलनेत यात गर्भपाताचं प्रमाण अधिक आढळलं तर या डेटाद्वारे इशारा दिला जाईल.
काही लोकांनी विविध ग्राफही शेअर केले आहेत. त्यात गेल्या काही वर्षांची तुलना करून दुसऱ्या लशी किंवा औषधाच्या तुलनेत लोकांनी अनुभव मांडले आहेत.
त्यात कोव्हिडवरील लस कमी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण डेटामध्ये झालेल्या वाढीवरून आपल्याला लोकसंख्येच्या मोठ्या भागाचं लसीकरण झालं आहे, याची मात्र माहिती मिळत नाही.
गर्भनाळेवर हल्ला करू शकते लस?
माइकल ईडन नावाच्या एका संशोधकांचा एक तर्कही सध्या प्रचंड व्हायरल आणि शेअर केला जात आहे. त्यात फायझर आणि मॉडर्नाच्या लसीमध्ये कोरोना व्हायरसचा जो स्पाइक प्रोटीन आहे तो syncytin-1 प्रोटीन सारखा असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रोटीन गर्भनाळ विकसित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतो.
त्यामुळे अँटिबॉडीज व्हायरसवर हल्ला करण्याबरोबरच गर्भावस्थेच्या प्रक्रियेवरही हल्ला कर शकतात, असा अंदाज त्यांनी लावला होता.
काही तज्ज्ञांच्या मते, कोव्हिडच्या लशीमुळं गर्भधारणेत अडचणी येत असलेल्या दाव्याची माहिती यातूनच पुढं आली होती.
पण प्रत्यक्षात जसे इतर प्रोटीन असतात तसेच syncytin-1 आणि कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन हे सारखे आहेत. शरिर जर एवढ्या सहजपणे त्यात सहभागी झालं असतं तर, प्रत्येकवेळी संक्रमण झाल्यास शरिरानं स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करून अँटिबॉडी तयार केल्या असत्या.
पण ही माहिती चुकीची असल्याचे पुरावे सध्या उपलब्ध आहेत.
अमेरिकेचे फर्टिलिटी डॉक्टर रेंडी मॉरिस यांना स्वतः या सर्व दाव्यांचा अभ्यास करायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडं आयव्हीएफ ट्रिटमेंटसाठी येणाऱ्या रुग्णांवर नजर ठेवायला सुरुवात केली. यशस्वीपणे गर्भधारणा झाल्यानंतर त्यावर लसीकरणाचा काही परिणाम होतो का? हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
डॉक्टर मॉरिस यांनी लस घेतलेल्या, लस न घेतलेल्या आणि आधी कोरोनाची लागण झालेल्या अशा 143 महिलांचा अभ्यास केला. त्यात महिलांची गर्भावस्था प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
हे संशोधन छोटं आहे, पण यात इतर मोठे पुरावे उपलब्ध आहेत.
जर लशीमुळं निर्माण झालेल्या अँटिबॉडीमुळं गर्भधारणेत अडचणी निर्माण होत असतील तर संक्रमण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अँटिबॉडीजमुळं तसं का होत नाही? याबाबत कोणीही विस्तारानं उत्तर देत नाही याकडंही डॉक्टर मॉरीस यांनी लक्ष वेधलं.
प्रत्यक्षात शास्त्रज्ञ हे लोकांचं समाधान व्हावं म्हणून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते संशोधनाच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याआधीच लोक सोशल मीडियावर दुसऱ्या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात करतात.
"अफवांबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लवकरात लवकर त्या फेटाळायला हव्यात. तरच तुम्ही त्या थांबवू शकतात," असं डॉक्टर मॉरीस म्हणाले.