बागेची जपणूक करताना...
प्रत्येक ऋतूत घरातली बाग आणि लॉनची काळजी घ्यावीच लागते. प्रत्येक रोपट्याला जीवापाड जपावं लागतं. तरच ते वाढतं, बहरतं. आपल्या सुंदर बागेची जपणूक करण्याच्या या काही खास टिप्स...
* झाडांना नियमित पाणी घाला. नुसतं पाणी शिंपडू नका. तीन इंचांपर्यंत पाणी घाला. यामुळे पाणी मुळांपर्यंत पोहोचू शकेल. टांगलेल्या कुंड्यांमधलं पाणी लवकर संपतं. अशा कुंड्यांमधला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जेल किंवा क्रिस्टल्स घाला. सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी घाला.
* वाळलेली रोपटी, गवत काढून टाका. नवी पालवी फुटण्यासाठी जागा करून द्या. रोपट्यांची वरचेवर पाहणी करा. रोपटी मोठ्या कुंड्यांमध्ये लावा. ऋतुमानानुसार रोपट्यांची निवड करा.
* कुंड्यांमध्ये खत घाला. वाळलेली पानं, शेण, गोवर्या यापासून खत तयार करता येईल. खत घातल्याने रोपट्यांना पोषण मिळेल. शिवाय त्यांची वाढही झपाट्याने होईल. रोपट्यांना ओलावा मिळेल.
* कोंब काढून टाका. कोंब झाडांना घातलेलं पाणी शोषून घेतात आणि रोपट्यांची वाढ खुंटते. त्यामुळे दिसताक्षणी हे कोंब उपटून टाका.