गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (13:51 IST)

निगा खास दोस्तांची

मुके सोबती हे आपले जीवलग दोस्त होऊ शकतात. त्यांना बोलता येत नसले तरी भावनांची देवाणघेवाण होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. ते आपली सोबत करतात त्याचबरोबर त्यांच्याशी खेळल्याने आपल्यावरील ताणही हलका होतो. तुमच्याकडेही घरात डॉगी अथवा मनी असेल तर दिवसातला बराचसा वेळ त्याच्याशी खेळण्यात जात असेल. तेही तुमच्या पायाशी घोटाळत असेल.

मनीमाऊ बर्‍यापैकी स्वतंत्र असते. तिची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र, डॉगीला खायला देणे, स्वच्छता राखणे, फिरवून आणणे हे सगळे तुम्हाला करावे लागते. ही काम करत असाल तर चांगलेच आहे, पण करत नसाल तर अवश्य करा कारण पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहिल्यास विविधप्रकारच्या संसर्गापासून आणि मुख्य म्हणजे जाडी वाढण्यापासून सुटका होते बरे का! पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहिल्यास आपल्या शरीरावर काही उपकारक जीवाणूंचा स्तर वाढतो.

हे जीवाणू शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे काही संसर्गांपासून आपण लांब राहू शकतो. आपले शरीर संसर्ग पसरवणार्‍या जीवाणू आणि विषाणूंचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावू शकले. तुम्हाला माहितीये, कुत्र्याच्या पंजात आणि शरीरावरील केसांवर हे उपकारक जीवाणू आढळतात. म्हणूनच त्यांच्या संपर्कात राहणार्‍यांना काही आजारांचा धोका अजिबात नसतो. जी मुले पाळीव प्राण्यांजवळ असतात त्यांना दमा होण्याचा धोका कमी असतो, असे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे.

माधुरी शिंदे