शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By अरुणा सबाने|

अन्यायाचे परिमार्जन

ND
एका कार्यालयात एका स्त्रीवर फार मोठा, सामूहिक अन्याय झाल्याची बातमी माझ्या मैत्रिणीकडून ऐकली. स्त्रियांवरील अत्याचाराच्या, अन्यायाच्या, बलात्काराच्या बातम्या सारख्याच येत असतात. एखाद्या दिवशी अशाप्रकारची बातमी वर्तमानपत्रात दिसली नाही तरच नवल. पण माझ्या मैत्रिणीकडून एका सुशिक्षित स्त्रीवर फार मोठा अन्याय होऊनही तिला कहीच करता आले नाही म्हणून एकदम एक फार जुनी घटना आठवली. माझ्या बालपणात घडलेली. मी हायस्कूलची विद्यार्थिंनी असेल तेव्हा.

आमच्या गावात एका शहरी तरुण मारवाड्याने नुकतीच शेती घेतली होती, उंच, धिप्पाड, आवाजात जरब असलेला आणि सतत नोकरावर हुकूम सोडणारा तांबड्या रंगाचे केस असलेल्या या मारवाड्याच्या मोटर सायकलचा आवाज गावाच्या सीमेपासून यायला लागला की, त्यांच्या कामाचे सगळे मजूर गपगार होऊन कामाला लागायचे. बायकांना यांच्या गाडीच्या आवाजाची फारच धास्ती. त्याच्याच कामावर होती एक सुंदराबाई नावाची प्रौढ विधवा. एका डोळा भेरका, दात पुढे आलेले, बळकट शरीराची, सुंदराबाई म्हणजे त्या मजूर स्त्रियांचा आधार होती. भरदार, स्पष्ट, पुरुषी आवाजात जेव्हा सुंदराबाई बोलायच्या तेव्हा पुरुषही त्यांच्यापासून चार हात दुरूनच बोलायचे. पण सुंदराबाई होत्या स्वभावाने प्रेमळ.

या सुंदराबाईची आठवण होण्याचे कारण म्हणजे, एकदा ज्वारी काढणे सुरू होते. आम्ही पडक्या मारुतीच्या देवळावर खेळत होतो. अगदी समोरच मारवाड्याच्या शेतात बायांचे काम सुरू होते. मध्येच सुंदराबाईंनी 'पडसान जी बाई' म्हणून मला हाळी दिलीच होती. पण आम्ही आपले खेळण्यात दंग.

मारवाड्याच्या शेतावर 10-12 बायका कामावर होत्या. सगळ्या सुंदराबाईपेक्षा लहान. मजू काम करीत होते आणि मारवाडी त्यांच्यावर लक्ष ठेवायला तिथेच हजर होता. हा तरुण मारवाडी जरा अगाऊच. बायकांची छेड काढण्यात आणि जरा बर्‍या दिसणार्‍या पोरीशी कुलूगुलू बोलण्यात त्याला भारीच रस. तर आता या सगळ्या आपल्या कामात दंग असतांना मध्येच म्हणे मारवाड्याला भूक लागली. त्यानी बाकीच्याही बायकांना जेवायची सुट्टी दिली आणि स्वत: झाडाखाली जाऊन डबा खायला बसला. त्या अगोदर त्यानी त्यातल्याच एक मजुराला आवाज दिला.
''वेणू जरा इकडे ये' 'जी मालक' 'जरा तांब्या भरून घेऊन ये'
'जी मालक'
वेणू तांब्या घेऊन आली. आमचा खेळ तिथेच सुरू होता. आम्ही विहिरीमागेच लपलेलो होतो. वेणूनी तांब्या भरून नेलेला आम्ही बघितला होता. पण पुढे काय झाले देव जाणे. सुंदराबाई धावत आल्या। त्यांच्या मागेच बाकी मजूरही धावले. सुंदराबाईंनी एक ढेकूळ उचलले आणि मारवाड्याकडे भिरकावले. नंतर जे हातात येईल ते त्या फेकून मारायला लागल्या। आता बाकीचे मजूरही खवळले. त्यांनी त्याला काठ्यांनी बदडून काढलं. मारवाडी पार मातीत लोळायला लागला. थोडा अवधी मिळताच तो धूम पळाला, आपल्या गाडीला किक मारली आणि तिथून पसार झाला.

ND
सुंदराबाई खरे तर त्या सगळ्या मजुरात प्रमुख होत्या. मारवाड्याजवळ सुंदराबाईच्या शब्दाला मान होता. आपल्याकामाचे मोलही त्यांना मिळत होते. मारवाड्यासोबत दुश्मनी घेणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. पण 'आपण तिथे हजर असतांना, 'माझ्या पोरीच्या अंगाला हात लावण्याची शामत कोणाची हाय?' हा त्यांचा खडा सवाल असायचा.

कुठेही भांडण होऊ दे, नवर्‍याने बायकोला मारू दे, सासूने सुनेला छळू दे, हुंड्यावरून त्रास देणे होऊ दे, दारू पिऊन नवर्‍याचा धिंगाणा सुरू होऊ दे, सुंदराबाई तिथे हजर झाल्याच म्हणून समजा आणि एकदा हजर झाल्या की, तिथून त्या यशस्वी होऊनच माघारी परतणार.

आज आपण रोजच अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या बातम्या वाचतो, त्याची चर्चाही करतो. पण आपण कुणाला मदत करतो? कुणाची समस्या सोडवतो? की, ही बातमी वाचून लगेच आपले लक्ष राशीभविष्य नाहीतर 'करमणूक' वरच स्थिरावते? आपल्या मनात संताप येत नाही का? आपल्यात ममत्व जागृत होत नाही का?

आपण सगळेच समाजाचे घटक आहोत. या समाजाची प्रत्येक समस्या ही आपलीच आहे, पण प्रत्यक्षात आपण काय बघतो? 'मला काय त्याचे?' ही भावनाच आज आपल्यात वाढतेय, अत्याचार कुठेतरी झालेला असतो, अन्याय कुणाच्या तरी घरी घडलेला असतो. आपल्याला त्याची काय आच? या विचारांनीच ही आग फोफावत जाते.

सुंदराबाईला सगळे मजूर आपले वाटतात. म्हणूनच आज आपलेपणा दुरावत चाललेल्या काळात मला एकदम त्यांची आठवण झाली. आपल्या हातात शक्ती असेल आणि मनात जबरदस्त विश्वास असेल, तर अन्यायाच्या परिमार्जनाला अन्य कोणाची मदत हवीच कशाला?