गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 20 डिसेंबर 2025 (15:59 IST)

हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असे चविष्ट हरभरा-गुळाचे लाडू पाककृती

Gram jaggery laddu recipe
साहित्य- 
भाजलेली हरभरा डाळ(फुटाणे डाळ)-२ कप 
गूळ बारीक किसलेला -१ ते १.५ कप 
साजूक तूप- १/२ कप 
वेलची पूड-१ छोटा चमचा
जायफळ पूड- १/४ छोटा चमचा 
सुका मेवा
कृती 
सर्वात आधी फुटाणा डाळ मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक पूड करून घ्या. तयार झालेली पूड चाळणीने चाळून घ्या म्हणजे लाडू मऊ होतात. आता गूळ शक्य तितका बारीक किसून घ्या. गुळाचे खडे राहिल्यास लाडू खाताना ते दाताखाली येतात, त्यामुळे गूळ मऊ असावा. आता एका मोठ्या परातीत फुटाणा डाळ पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करा. त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड टाका. हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करा जेणेकरून गूळ आणि पीठ एकजीव होईल. आता साजूक तूप थोडे गरम करून मिश्रणात थोडे-थोडे घाला. तूप एकदाच सर्व टाकू नका. हाताने मिश्रण दाबून पहा, जर लाडू वळता येत असेल तर तूप घालणे थांबवा. आता मिश्रण हाताने नीट मळून घ्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारात गोल लाडू वळून घ्या. लाडू वळताना त्यावर वरून सुका मेव्याचे काप लावू शकता.
 
काही खास टिप्स
जर तुम्हाला लाडू थोडे कुरकुरीत हवे असतील, तर पीठ जास्त बारीक न दळता थोडे रवाळ ठेवावे.
जास्त काळ टिकण्यासाठी: हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास १५-२० दिवस आरामात टिकतात.
डायटिंगसाठी: जर तुम्हाला तूप टाळायचे असेल, तर तुम्ही गूळ आणि फुटाणे एकत्र मिक्सरला फिरवून घेऊ शकता, त्यामुळे गुळाच्या ओलसरपणानेही लाडू वळता येतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik