शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (11:27 IST)

नागपंचमी रेसिपी पुरणाचे दिंड

Puranache Dind
साहित्य - पाऊण वाटी चणाडाळ, पाऊण वाटी गूळ, पाऊण वाटी कणिक, दोन टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, थोडीशी वेलचीपूड किंवा जायफळ पूड.
 
कृती - प्रथम पुरणपोळीसाठी जसे बनवतो तसे पुरण बनवून घ्यावे. त्यासाठी चणाडाळ धुवून मऊसर शिजवून घ्यावी (साधारण चणाडाळीच्या अडीच ते तीनपट पाणी घालावे). डाळ शिजली कि चाळणीत घालून पाणी निथळू द्यावे. डाळीतील पाणी निथळल्यावर डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे. तसे न केल्यास मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात (आवडत असल्यास) वेलचीपूड घालावी. पळीने चांगली घोटून घ्यावी. मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. पुर्ण गार होवू द्यावे. कणकेत मिठ घालावे. त्यावर २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्यावी. कणकेचे ८ ते १० गोळे करावे. जर मोदकपात्र असेल तर त्यामध्ये २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. नाहीतर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करावे. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा.
 
कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटावी, मधोमध १ चमचा पुरण ठेवावे. समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावे. दिंड मोदकाप्रमाणे १५ ते २० मिनीटे शिजवून घ्यावे. गरमागरम दिंडं तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवून खायला द्यावे.