सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जुलै 2022 (09:27 IST)

नैवेद्यासाठी पुरणच का?

puran
अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती यांच्याकडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात. पण पार्वतीला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
 
महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसूये कडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असते.
 
जेवण सुरू होतं आणि अनुसूया एकेक पदार्थ वाढायला सुरू करते. छोटा गणपती खूप आनंदाने जेवतोय पाहून अनुसूयेला ही बरं वाटत. 
 
महादेव आणि पार्वती च जेवण संपतं पण गणेशाचं ताव मारणं सुरू राहतं. पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्ह्णून सांगायचा प्रयत्न करते पण गणपती च सगळं लक्ष जेवणात. अनुसूयाला पण आता काळजी वाटायला लागते कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात. तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत. आणि एकदाचे सगळं जेवण संपतं पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही. मग अनुसूया स्वयंपाक घरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते. आणि गणपतीला सांगते की, "मी माझ्याकडे जे सर्व होतं (पूर्ण) ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर". 
 
गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो. म्हणून त्या पदार्थाला पुरण (जे पूर्ण आहे ते) अस म्हटलं गेलं. आणि ते पुरण मोदक रुपात (श्रध्दा आणि मातृत्वा च्या बंधनात बांधलेलं) गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला.