मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (17:05 IST)

चटकन बनणारी बटाटा ओव्याची खमंग कचोरी

बटाट्यापासून आपण बरेच स्नॅक्स बनवितो. बटाटा तर घराघरात आढळतो. आज आपण बटाटा आणि ओव्याची खमंग कचोरी करणार आहोत. ओवा असल्यानं ह्याची चव खूप छान येते. ही बनवायला देखील खूप सोपी  आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य-
4 उकडलेले बटाटे, 1 कप गव्हाचं पीठ,1/2 कप मैदा,1 कांदा बारीक चिरलेला,2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,1/4 कप कोथिंबीर बारीक चिरलेली,1/2 लहान चमचा धणेपूड,1/2 लहान चमचा जिरेपूड,1/2 लहान चमचा ओवा, 1/4 चमचा लाल तिखट,1/4 चमचा आमसूलपूड, गरम मसाला पूड, मीठ आणि तळण्यासाठी आणि मोयनसाठी तेल,  
  
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा आणि मीठ घालून मिक्स करा. या मध्ये थोडंसं तेलाचं मोयन घाला आणि लागत लागत पाणी घालत घट्टसर मळून घ्या. आता 10 मिनिटे कणीक तशीच ठेवा.
 
सारण करण्यासाठी - 
दोन बटाटे मॅश करून घ्या. त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा चिरलेल्या हिरव्यामिरच्या, कोथिंबीर, धणेपूड, जिरेपूड, तिखट, गरम मसाला पावडर, ओवा मिसळून मिश्रण तयार करा.   
कणकेचे गोळे करा आणि पुरी प्रमाणे लाटून घ्या. त्यामध्ये बटाट्याचे सारण भरा. मैदा लावून थोडी जाडसर लाटून घ्या आणि कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि गरम तेलात या लाटलेल्या कचोरी सोडा. तांबुसं सोनेरी रंगाची होई पर्यंत तळून घ्या. गरम कचोरी हिरव्या चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.