पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या
पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या
गोडा मसाला हा महाराष्ट्रातील पारंपरिक मसालेदार आणि सुगंधित मसाला आहे. आमटी, भाजी किंवा खिचडीची चव वाढवण्यासाठी हा वापरला जातो.
साहित्य:
मुख्य घटक:
सुके खोबरे (किसलेले) - १ कप
धणे - १ कप
पांढरे तीळ - ४ मोठे चमचे
खसखस - २ मोठे चमचे
खडा मसाला:
जीरे - २ मोठे चमचे
शहाजीरे - १ मोठा चमचा
लवंग - १ मोठा चमचा
काळी मिरी - १ मोठा चमचा
दालचिनी - २ ते ३ तुकडे
हिरवी वेलची - ४ ते ५
मोठी (काळी) वेलची - २
तमालपत्र (तेजपत्ता) - ४ ते ५ पाने
दगडफूल - १ मोठा चमचा
चक्रफूल (बाद्यान) - २
नाकेश्र्वर (नागकेशर) - १ लहान चमचा (मिळाल्यास)
इतर:
हिंग - १/२ लहान चमचा
हळद - १ लहान चमचा
तेल - १ ते २ मोठे चमचे (मसाले भाजण्यासाठी)
कृती:
धणे आणि जीरे भाजणे:
कढईत थोडे तेल घालून मध्यम आचेवर धणे छान खमंग तांबूस होईपर्यंत भाजा. नंतर जीरे आणि शहाजीरे स्वतंत्रपणे हलके तळून बाजूला काढा.
उभे मसाले भाजणे:
त्याच कढईत थोडे तेल घालून लवंग, काळी मिरी, दालचिनी, वेलची, तमालपत्र, दगडफूल, चक्रफूल आणि नागकेशर १-२ मिनिटे मंद आचेवर तळून घ्या.
तीळ आणि खसखस भाजणे:
कढईत तेल न घालता (सुके) तीळ आणि खसखस मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजा.
खोबरे भाजणे:
शेवटी किसलेले सुके खोबरे कढईत घालून तेल न घालता मंद आचेवर छान गडद तांबूस (Dark Brown) होईपर्यंत भाजा. खोबरे करपू देऊ नका.
मसाला दळणे:
सर्व भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर त्यात हिंग आणि हळद मिक्स करा.
प्रथम सर्व उभे मसाले आणि धणे-जीरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
त्यानंतर त्यात भाजलेले खोबरे, तीळ आणि खसखस घालून पुन्हा मिक्सर फिरवा. (खोबरे शेवटी घातल्याने मसाल्याला जास्त तेल सुटत नाही).
साठवणूक:
तयार झालेला गोडा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवा. हा मसाला ६ ते ८ महिने उत्तम टिकतो.

