मुंबईतील खळबळजनक स्पा हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. बुधवारी पहाटे वरळी परिसरातील सॉफ्ट टच स्पामध्ये हिस्ट्रीशीटर गुरू सिद्धप्पा वाघमारे ऊर्फ चुलबुल पांडेची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2008 मध्ये आलेल्या 'गजनी' चित्रपटातील आमिर खानच्या व्यक्तिरेखेप्रमाणे वाघमारेनेही आपल्या शत्रूंच्या नावाचे टॅटू अंगावर गोंदवले होते.
गुरु वाघमारे (52) ची बुधवारी सॉफ्ट टच स्पामध्ये 21 वर्षीय कथित प्रेयसीसमोर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. वाघमारेवर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसह किमान 10 गुन्हे दाखल आहेत. त्यात मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.
शत्रुंच्या नावांचे टॅटू गोंदवत होता
रिपोर्ट्सनुसार गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या 'चुलबुल पांडे'ने त्याच्या दोन्ही मांड्यांवर 20 ते 22 लोकांची नावे गोंदवली होती. असे मानले जाते की ती नावे त्याच्या शत्रूंची आहेत. मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही. पण हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांना त्याच नावांच्या यादीतून लीड्स मिळाले. यानंतर मुंबई गुन्हे शाखा युनिट-3 ने खून करणाऱ्या आरोपीला अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे उर्फ चुलबुल पांडे जेव्हाही कोणाशी भांडण करायचा तेव्हा तो त्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर तपशील अंगावर गोंदवून घेत असे. यासोबतच आपल्याला काही झाले तर ते जबाबदार असतील, अशी चिठ्ठीही लिहिली आहे.
वाघमारे रोज डायरी लिहायचा. ती डायरी आणि कागदपत्रे त्याने विलेपार्ले (पूर्व) येथील आंबेडकर नगर येथील त्याच्या घरातील कपाटात ठेवली होती.
सुपारी घेऊन हत्या केल्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सॉफ्ट टच स्पा, वरळीचे मालक संतोष शेरेगर (50), मोहम्मद फिरोज अन्सारी (26, रा. नालासोपारा), साकीब अन्सारी (28, रा. कोटा, राजस्थान) आणि इतर दोघांना अटक केली आहे. तर आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हा स्पा मालकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याविरुद्ध आरटीआय अर्ज करून पैसे उकळायचा. तसेच त्याने शेरेगर आणि अन्सारी यांना लक्ष्य केले होते. दोघेही विरारमध्ये स्पा चालवत होते. वाघमारे यांच्यामुळेच त्यांचा स्पा बंद करण्यात आला असून, याच कारणावरून हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
6 लाखांची सुपारी दिली
शेरगर आणि अन्सारी यांनी वाघमारेचा बदला घेण्याचे ठरवले. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी आरोपी साकिबशी संपर्क साधून वाघमारेला मारण्यासाठी सहा लाख रुपये दिले. घटनेच्या रात्री अडीचच्या सुमारास मोहम्मद अन्सारी आणि साकिब अन्सारी स्पामध्ये घुसले. त्यांनी वाघमारेच्या मानेवर व बोटांवर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी दोघांना अधिकृतरित्या अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघांची या गुन्ह्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. हिस्ट्रीशीटरच्या हत्येप्रकरणी चौघांना नालासोपारा आणि कोटा येथून अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
26 वर्षीय मोहम्मद फिरोज अन्सारी आणि साकिब अन्सारी यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फिरोजला नालासोपारा येथून तर साकिब आणि इतरांना राजस्थानमधील कोटा येथून पकडण्यात आले.
वाढदिवसालाच खून होणार होता
सुपारी घेऊन हत्या केल्याचा हा प्रकार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वाघमारेच्या मारेकऱ्याचाही समावेश आहे. वाघमारेच्या वाढदिवसानिमित्त 17 जुलै रोजी त्याची हत्या करण्याचा प्लॅन होता, मात्र तो प्लान यशस्वी झाला नाही.
मुंबईतील वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गुरु वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा चिरला होता. त्यांच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, यामध्ये वाघमारेला संपवण्यासाठी सहा लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी काय घडले?
मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे काम करणाऱ्या लोकांशी त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या 21 वर्षीय कथित गर्लफ्रेंडने आणि इतर तीन पुरुष मित्रांनी वाघमारेला पार्टीसाठी विचारले. यानंतर हे पाचही जण सायन स्थानकाजवळील अपर्णा बारमध्ये गेले.
रात्री साडेबाराच्या सुमारास ते सर्वजण स्पामध्ये पार्टी करतून परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले तर वाघमारे व त्याची मैत्रीण मागे राहिले. दरम्यान सुमारे दोन तासानंतर मोहम्मद अन्सारी आणि साकीब अन्सारी यांनी स्पामध्ये घुसून वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व त्याचा गळा चिरलेला आढळून आला. वाघमारे हा स्पा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांनी उघड केले. जे त्याच्या हत्येचे प्रमुख कारण मानले जात आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे.