आजपासून मुंबई पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासकावर
१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता सर्वपक्षीय २२७ नगरसेवक व ५ नामनिर्देशित नगरसेवक यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पालिकेने राहण्यासाठी दिलेला राणीच्या बागेतील बांगला खाली करून द्यावा लागणार आहे. पालिकेने विविध समिती अध्यक्षांना वापरासाठी दिलेल्या गाड्या पालिका गॅरेजमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे आता आजपासून म्हणजे ८ मार्च रोजीपासून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी ही प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या खांद्यावर येणार आहे. पालिकेशी संबंधित महत्वाचे धोरणात्मक निर्णय तेच घेतील.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिकेवर प्रथमतः १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कालावधीसाठी प्रशासक नेमण्यात आली} होता. या घटनेला आज ३८ वर्षे होत आली. एवढया वर्षांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला साधे एखादे पत्रकही आलेले नसल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, १९९० ते १९९२ या कालावधीत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालिकेचा कार्यकाल वाढविण्यात आलेला होता. यावेळीही पालिकेवर प्रशासक न नेमता पालिकेचा कार्यकाळ वाढविण्यात यावा, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती.