विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा : मुख्यमंत्री
विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्यातून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत टिकणारा असला पाहिजे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराचे वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामांना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका निर्मित मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल चे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य (ऑनलाइन) पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पणप्रसंगी संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई महानगराच्या तापमानत देखील अलीकडे मोठा फरक दिसून येतो. मुंबई महानगराचा विकास होताना त्याचे रूपांतर जणू काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. विकास नेमका कशासाठी हवा याचा विचार आता फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण जगाने करण्याची वेळ आली आहे. मुंबई महानगराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई पिंजाळ प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यासाठी पाच लाख झाडांची किंमत मोजावी लागणार होती. त्यामुळे तो प्रकल्प रद्द केला. कारण पाणी मिळवण्यासाठी पर्यावरण गमावून चालणार नाही. आरे वनक्षेत्र वाचवणं हे देखील माझं कर्तव्यच होतं. कारण दुर्घटना घडल्यावर अश्रू गाळून उपयोग नाही. जीव वाचवण्यासाठी वेळीच कृती केली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या वातावरण कृती आराखड्यातून ही कृती सुरू झाली आहे. त्याचा आदर्श देशातील इतर शहरे देखील घेतील, अशी अपेक्षा करू या, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, एका बाजूला जगाचा कोविड विषाणूशी लढा सुरू असताना दुसऱ्या बाजूला वातावरणीय बदलाची समस्यादेखील तीव्र होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय करण्याची गरज लक्षात घेऊन जागतिक संस्थांबरोबर मिळून मुंबई आणि महाराष्ट्र काम करीत आहे. महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या शहरांमध्ये वास्तव्यास असून या सर्व शहरांनी मुंबईप्रमाणेच वातावरण कृती आराखडा तयार करून अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी होऊन विस्ताराने काम करावे लागेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.