सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (21:28 IST)

दर्शन सोलंकी : आधी मित्रांबरोबर शॉपिंगचा प्लॅन, मग 'आत्महत्या', चिठ्ठीत लिहिलं – ‘Killed Me...’

darshan solanki
दीपाली जगताप
social media
 देशातल्या सर्वोत्तम इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचं लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. 18 वर्षीय दर्शन सोलंकीनेही हे स्वप्न पाहिलं होतं.
 
यासाठी त्याने आयआयटी बॉम्बेसारख्या एका प्रतिष्ठित केंद्रीय शैक्षणिक संस्थेत प्रवेशही मिळवला.
 
बीटेकच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दर्शनने प्रवेश घेतल्यानंतर चार महिन्यात टोकाचं पाऊल उचललं आणि दर्शनचा मृत्यू 'शैक्षणिक दबावामुळे झाला की जातीय भेदभावमुळे' याची देशभरात चर्चा सुरू झाली.
 
आता याच प्रकरणात तब्बल 42 दिवसांनंतर दर्शनच्या हॉस्टेल रुममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे.  
 
आयआयटी बॉम्बेमध्ये बी.टेक.च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकीच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.
 
दर्शनचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला (SIT) दर्शनच्या हॉस्टेल रुममध्ये 'सुसाईड' नोट मिळाली आहे.
 
या चिठ्ठीत दर्शनसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या नावाचा उल्लेख असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.    
 
12 फेब्रुवारी 2023 रोजी 18 वर्षीय दर्शन सोलंकीने आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती.
 
यात दर्शनचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघाती मृत्यू असल्याचं सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं. परंतु दर्शनसोबत कॅम्पसमध्ये 'जातीवाचक भेदभाव' झाल्याचा आरोप दर्शनाच्या कुटुंबियांनी आणि विविध संघटनांनी केला.
 
या आरोपांनंतर ही केस मुंबई क्राईम ब्रांचच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन (SIT) टीमकडे सोपवण्यात आली.  
 
दर्शनच्या मृत्यूनंतर 'आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांमध्येही कशापद्धतीने दलित विद्यार्थ्यांना जातीय भेदभावाला सामोरं जावं लागतं,' याची देशभरात चर्चा सुरू झाली.
 
या प्रकरणी आयआयटी बॉम्बेने सर्व आरोप फेटाळत आपली स्वतंत्र चौकशी समिती नेमली. या समितीच्या आहवालात दर्शनच्या शैक्षणिक कामगारी खालावल्यावर बोट ठेवण्यात आलं होतं.
 
परंतु आता पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीत दर्शनच्या खोलीत चिठ्ठी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
 
या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं? दर्शनच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत काय म्हटलंय? आणि पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेने सुरू आहे? जाणून घेऊया, 
 
SIT च्या चौकशीत आतापर्यंत काय समोर आलं?
क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्त्वातील मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी दर्शनच्या हॉस्टेलमधील खोलीचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी एक चिठ्ठी सापडल्याचं समोर आलं ाहे. 
 
या चिठ्ठीतील हस्ताक्षर दर्शन सोलंकीचे असल्याचं त्याच्या आईने सांगितलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच या चिठ्ठीत "Killed Me..." असं लिहिल्याचं SIT तील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. 
 
ही बाब उघड व्हायला विलंब झाला कारण चिठ्ठीतील हस्ताक्षर दर्शनचेच असल्याबाबत पडताळणी सुरू होती असंही पोलिसांचं म्हणणं आहे.
 
चिठ्ठी सापडल्यानंतर ती दर्शनच्या कुटुंबियांना दाखवण्यात आली. तसंच पोलीसांच्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडूनही तपास सुरू असल्याचं समजतं.  
 
पोलिसांच्या विशेष पथकातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार,
 
"दर्शन सोलंकीच्या वसतीगृहातील खोलीमधून एक लेटर मिळाले आहे. यातील हस्ताक्षर दर्शनचेच असल्याचं त्याच्या आईने आम्हाला सांगितलं होतं. लेटरमध्ये 'Killed me' असं लिहिलं असून एका विद्यार्थ्याच्या नावाचा उल्लेख आहे. तसंच डिस्प्यूटचाही उल्लेख आहे. आम्ही तपास करत आहोत."
 
या नवीन माहितीमुळे, दर्शनला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं का? याला त्याच्या सोबत शिकणारे विद्यार्थी कारणीभूत आहेत का? दर्शनने चिठ्ठीत उल्लेख केलेल्या विद्यार्थ्यासोबतचे दर्शनचे चॅट्स आणि इतर बाबींचा तपास आता SIT  करत आहे.
 
यापूर्वी दर्शनच्या मृत्यूनंतर पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि नंतर आत्महत्या असल्याचंही स्पष्ट केलं. परंतु या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. राजकीय नेते आणि विविध विद्यार्थी संघटनांनी दर्शनसोबत कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव झाला असल्याची शंका व्यक्त केली.
 
तसंच दर्शनच्या पालकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. यानंतर 28 फेब्रुवारी रोजी ही केस SIT कडे देण्यात आली.
 
दरम्यान, दर्शन सोलंकीचा मृत्यू होऊन 42 दिवस उलटल्यानंतर पोलिसांना चिठ्ठी आढळल्याने काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
ही चिठ्ठी मिळण्यासाठी विलंब का झाला? आयआयटीच्या चौकशी समितीने 79 जणांशी संवाद साधला होता मग त्यांना त्याच्या मित्रासोबतच्या वादाची माहिती का नाही? अशा प्रश्नांची आता चर्चा केली जात आहे.
 
'तो मित्रांसोबत खरेदीला जाणार होता'
दर्शन सोलंकीने 2022 मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला. 20 ऑक्टोबर 2022 पासून आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये त्याचं शैक्षणिक वर्षं सुरू केलं. पण चार महिन्यातच दर्शनचा मृत्यू झाला.
 
12 फेब्रुवारीला दुपारी साधारण 1 वाजता  हॉस्टेलच्या सातव्या  इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सेमिस्टर परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दर्शन सोलंकीने आत्महत्या केली.
 
पण याच दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारीला दर्शनचा प्लॅन वेगळा होता. तो खरं तर आपल्या मित्रांसोबत शॉपिंगला जाणार होता, असं आयआयटी बॉम्बेचा अंतरिम अहवाल सांगतो.
 
तसंच याच दिवशी दर्शनचं आपल्या वडिलांसोबतही फोनवर बोलणं झालं होतं, असं त्याच्या वडिलांनी आयआयटीच्या चौकशी समितीला सांगितल्याचं अहवालात म्हटलं आहे.
 
अहवालानुसार, आयआयटी विद्यार्थ्यांच्या एका वॉट्स अप ग्रुपमध्ये दर्शन होता. या ग्रुपमध्ये सेमिस्टर परीक्षेनंतर शॉपींगला जाण्याचं नियोजन ठरत होतं. यासाठी दर्शनने होकार दिला.
 
त्याच्या वडिलांनी पैसेही ट्रांसफर केले होते. याच दिवशी एका विंगमेटने दर्शनला आपल्या खोलीत पाहिलं होतं. तो बेडवर होता आणि त्याचा लॅपटॉप सुरू होता. हॉस्टेलमध्ये दिवसभर काय करायचं याची चर्चा सुरू होती यावेळीही दर्शन तिथे होतं. दुपारचं जेवण हॉस्टेलमध्ये करून बाहेर जायचं सगळ्या मित्रांचं ठरलं. पण याआधीच अचनाक दर्शनने टोकाचं पाऊल उचललं.
 
'कुटुंबासोबत झालेल्या फोन कॉल्सनंतर आणि आत्महत्येच्या घटनेपूर्वी नेमकं काय झालं की त्याने असं दुर्देवी टोकाचं पाऊल उचललं याची माहिती मिळालेली नाही,' असंही चौकशी अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
आयआयटी बॉम्बेचा अंतिरम चौकशी अहवाल काय सांगतो?
दर्शनच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी आयआयटी बॉम्बेने 12 जणांची अंतरिम चौकशीसाठी समिती नेमली. या समितीने 6 मार्च रोजी आपला अंतरिम चौकशी अहवाल संस्थेकडे दिला.
 
या अहवालात प्रामुख्याने दर्शन सोलंकीची खालावलेली शैक्षणिक कामगिरी नमूद करण्यात आली आहे. तसंच कॅम्पसमध्ये समितीने 79 जणांशी याप्रकरणी संवाद साधला. यात दर्शनसोबत जातीय भेदभाव झाल्याचीही चौकशी केल्याचं समितीचं म्हणणं आहे.
 
'कुटुंबासोबत झालेल्या फोन कॉल्सनंतर आणि आत्महत्येच्या घटनेपूर्वी नेमकं काय झालं की त्याने असं दुर्देवी टोकाचं पाऊल उचललं याची माहिती मिळालेली नाही,' असंही चौकशी अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
अहवालानुसार, दर्शनाच्या वडिलांनी आणि काकांनीही जातीविषयक भेदभाव होत असल्याविषयी दर्शनने काहीही सांगितलं नाही असं समितीला सांगितलं.
 
'दर्शन सोलंकीच्या बहिणीचं म्हणणं वगळता त्याला आयआयटी बॉम्बेमध्ये असताना जातीविषयक भेदभाव झाल्याचं थेट कुठेही सिद्ध होत नाही,' असा दावा समितीने आपल्या अहवालात केला आहे.
 
टेलिफोनीक संवाद, फाॅरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमार्टेम रिपोर्ट या सगळ्याची माहिती हाती नसताना समिती कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाही की नेमक्या कोणत्या कारणाने दर्शनने दुर्देवी टोकाचं पाऊल उचललं, असंही समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. त
 
पंच समितीला मिळालेल्या माहितीच्या आधारे दर्शनचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाला असावा, असं समितीला वाटतं.
 
दरम्यान, दर्शनचे वडील रमेश सोलंकी यांनी या अंतरिम चौकशी अहवालाशी आपण सहमत नसल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी आयआयटी बॉम्बेचे संचालत सुभासीस चौधरी यांना पत्र लिहिलं आहे.
 
'अहवालात माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी त्यालाच जबाबदार धरण्यात आलं आहे. एक दलित विद्यार्थी स्वत: मेहनत करून आयआयटीपर्यंत पोहोचला, पण त्याला संगणकाचे आणि इंग्रजीचे ज्ञान नसल्याचा ठपका त्यावर संस्थेने ठेवला आहे. माझ्या मुलगा आळशी असल्याचं लेबल त्याला संस्थेने लावलं. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणं संस्थेची जबाबदारी नाही का?' असाही प्रश्न त्यांनी या अहवालावर उपस्थित केला आहे.
 
तसंच आयआयटीच्या चौकशी समितीत एकही सदस्य हा संस्थेबाहेरचा नसल्याने या समितीचा अहवाल पारदर्शी कसा मानायचा? समितीतील सर्व सदस्य हे प्रशासनाचेच आहेत आणि यामुळे हा अहवाल नि:पक्षपातीपणे केला नसल्याची टीकाही आंबेडकर-पेरियार-फुले स्टडी सर्कल या संघटनेने केली आहे.